कृष्णन, राप्पल संगमेश्वर: (२३ सप्टेंबर १९११ –   ). भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्‌सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.

त्यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे. स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति  प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते.

 भदे, व. ग.