कृष्णन कुट्टी: (२५ जुलै १९२०     ). एक प्रसिद्ध कथकळी नर्तक. केरळ राज्यातील कुन्नमंगलम् येथे जन्म. वयाच्या सातव्या वर्षापासून कथकळी शिकण्यास सुरुवात केली. राघवन पिळ्ळै आशान, कत्चू पिळ्ळै पणिक्कर व गुरू शंकरन नंब्रुदी हे त्यांचे नृत्यशिक्षक होत. शिक्षण चालू असतानाच दहाव्या वर्षापासून त्यांनी नृत्यप्रयोग सादर करण्यास सुरुवात केली. १९३६ मध्ये शंकरन नंबुद्रींच्या नृत्यपथकाबरोबर त्यांनी भारताचा दौरा केला. १९३७ मध्ये त्रावणकोर संस्थानच्या कथकळी पथकाचे ते सदस्य झाले. मेनकेच्या नृत्यपथकात कथकळी शिक्षक व प्रमुख नर्तक म्हणून सहभागी झाले (१९३९–४४). नंतर मुंबईत नृत्याच्या अध्यापनासाठी स्थायिक झाले व तेथे ‘कृष्णनर्तकालयम्’ ची स्थापना केली (१९४४). तसेच प्रल्हाद चरितम्, बर्थ ऑफ अवर नेशन, इन्स्पिरेशन्स, फॉल्स प्राइड, द टेरिबल बून  इ. नृत्यनाट्ये सादर केली. शिरीन बझिफ्दार ह्यांच्या समवेत ‘नृत्यदर्पण सोसायटी’ ची स्थापना करून तिच्यामार्फत बर्थ ऑफ उर्वशी, ट्राएंफ ऑफ लाइफ, ट्राम्सपोझ्ड हेड्स, चित्रलेखा  ह्या नृत्यनाट्यांचे दिग्दर्शन केले व त्या संस्थेतर्फे भारतात, यूरोपात व श्रीलंकेत दौरे काढले. १९५५ मध्ये चीनला भेट देणाऱ्या भारत सरकारच्या सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळाचे ते एक सदस्य होते. ‘डान्सर्स गिल्ड’ चे कार्याध्यक्ष तसेच‘नृत्यश्री’ ह्या नृत्यलेखनाच्या, नृत्यदिग्दर्शनाच्या आणि नृत्यशिक्षणाच्या संस्थेचे संचालक अशी पदेही त्यांनी भूषविली आहेत.

इनामदार, श्री. दे.