कोलरिज, सॅम्युएल टेलर : (२१ ऑक्टोबर १७७२–२५ जुलै १८३४). स्वच्छंदतावादी इंग्रज कवी, तत्त्वज्ञ आणि टीकाकार. जन्म डेव्हनशरमधील ऑटरी सेंट मेरी येथे. शिक्षण प्रथम लंडन येथील ‘ख्राइस्ट-हॉस्पिटल’ ह्या प्रसिद्ध शाळेत आणि केंब्रिजच्या जीझस कॉलेजात. ⇨ चार्ल्स लँब हा त्याचा ख्राइस्ट हॉस्पिटलमधील सहाध्यायी. लँबने आपल्या एका निबंधात कोलरिजचे सुरेख शब्दचित्रही काढले आहे. केंब्रिज येथे शिकत असतानाच लंडनला येऊन वेगळ्या नावाने त्याने सैन्यात प्रवेश केला. त्याच्या भावाने पैसे भरून त्याला लष्करातून सोडवून आणले आणि तो पुन्हा केंब्रिजला आला. पदवीधर मात्र झाला नाही. सुप्रसिद्ध इंग्रज कवी रॉबर्ट साउदी आणि विल्यम वर्ड्स्वर्थ हे त्याचे मित्र. साउदीबरोबर ‘पँटिसोक्रसी’ हे सर्वांच्या समानतेवर अधिष्ठित असलेले एक यूरोपियन जीवनविषयक तत्त्वज्ञान
अमेरिकेतील सस्क्वेहॅना नदीच्या तीरावर साकार करण्याची योजना त्याने आखली होती ती कधीच कार्यान्वित होऊ शकली नाही. साउदीच्या मेहुणीशी त्याचा विवाह झाला (१७९५). त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे ठरले नाही. काही काळ (१७९८–९९) जर्मनीत असताना तेथील तत्त्वज्ञांचा आणि स्वच्छंदतावाद्यांचा प्रभाव त्याच्यावर पडला. संधिवाताच्या वेदना विसरण्यासाठी त्याने अफूचे व्यसन लावून घेतले. मॉर्निंग पोस्टमध्ये तो नियमितपणे राजकीय लेखन करीत असे. नेमस्त व उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार त्याने केला. स्वत:ची वर्ड्स्वर्थबरोबर तुलना करीत राहिल्याने तो सतत असंतुष्ट व दु:खी असे. प्रकृतिस्वास्थ्यासाठी मॉल्टा येथे तो गेला (१८०४). तेथे असताना मॉल्टाच्या गर्व्हनरचा सचिव झाला. १८०६ मध्ये इंग्लंडला परतला. प्रकृती मात्र ढास्ळलेलीच होती. लवकरच पत्नी व मुले ह्यांच्यापासून फारकत झाली. त्यानंतरचा बराचसा काळ मित्रांच्या घरीच व्यतीत केला. काही मित्रांकडून आर्थिक मदतही झाली. हायगेट ह्या लंडनच्या एका उपनगरात तो निधन पावला.
कोलरिजच्या आरंभीच्या कविता मॉर्निंग क्रॉनिकल ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाल्या. कोलरिज आणि वर्ड्स्वर्थ ह्या दोघा मित्रांनी आपल्या कविता लिरिकल बॅलड्स (१७९८) प्रसिद्ध केल्या. ह्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत कोलरिजच्या एकूण तीन कविता होत्या. दुसऱ्या आवृत्तीत त्यांत आणखी दोन कवितांची भर घालण्यात आली. ह्या एकूण पाच कविता अशा : ‘द एन्शंट मरिनर’, ‘द फॉस्टर मदर्स टेल’, ‘द नाइटिंगेल’ ‘द डंजन’ आणि ‘लव्ह’. लिरिकल बॅलड्सच्या प्रकाशनाबरोबरच इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादी युगाचा उदय झाला, असे मानले जाते.
‘द एन्शंट मरिनर’, ‘क्रिस्टॅबेल’ (अपूर्ण) आणि ‘कुब्लाखान’ (अपूर्ण) ह्या कोलरिजच्या सर्वश्रेष्ठ कविता होत. त्याने केवळ ह्या तीन कविता रचिल्या असत्या, तरी इंग्रजी काव्येतिहासातील त्याचे स्थान अढळ राहिले असते. ‘द एन्शंट मरिनर’ ही तर इंग्रजी साहित्यातील एकूण स्वच्छंदतावादी कालखंडामधील एक सर्वोत्कृष्ट कविता होय. स्वराघातावर आधारलेल्या छंदाचा उपयोग ‘क्रिस्टॅबेल’साठी करून कोलरिजने ⇨ हॉपकिन्झच्या ‘स्प्रंग-ऱ्हीदम’च्या प्रणालीची पार्श्वभूमी निर्माण करून ठेविली, असे काही अभ्यासकांना वाटते. त्याचप्रमाणे ‘कुब्लाखान’ मधील अबोध मनाचा वेध घेणारी प्रवृत्ती आणि तिच्यामागील मानसशास्त्रीय कुतूहलाची प्रेरणा विसाव्या शतकातील अतिवास्तववादाचे स्मरण करून देते. यावरून कोलरिजच्या काव्यात उत्तरकालातील काही महत्त्वाच्या काव्यविशेषांची पूर्वरूपे होती, असे म्हटले जाते. ‘फ्रान्स’, ‘ॲन ओड’ आणि ‘डिजेक्शन’ ह्या आणखी काही उल्लेखनीय कविता. त्याने वापरलेल्या अनेक प्रतिमा दीपनाशी आणि निसर्गातील गतिचित्रांशी निगडित आहेत. उदा., आकाशावर पसरणारा चंद्रप्रकाश, अज्ञान आणि अंधश्रद्धा ह्यांचे धुके नाहीसे करणारा सूर्य, धबधबे आणि वाऱ्याबरोबर वाहत जाणारी झाडांची पाने इत्यादी. ⇨ मिल्टनच्या व अंशत: मिल्टनच्या काव्यपरंपरेशी नाते सांगणाऱ्या ⇨ग्रे आणि ⇨कॉलिझ ह्यांच्या काव्यातील उदात्तता ही कोलरिजच्या काव्यामागील एक प्रेरक शक्ती होय. त्याच्या अनेक कवितांतून आढळणारी भावनिक तात्त्विकता समकालीन ⇨ विल्यम ब्लेकच्या कवितांशी नाते सांगते. वर्ड्स्वर्थप्रमाणेच कोलरिजलाही निसर्गाविषयी उत्कट प्रेम वाटत होते. तथापि वर्ड्स्वर्थसारखे निसर्गाशी केवळ जिव्हाळ्याचे सान्निध्य त्याला पुरेसे वाटत नव्हते, तर त्यातूनही उदात्ततेचा शोध घेण्याची त्याची धडपड होती. चराचरेश्वरवादाने (पॅनथिइझम) भारलेले त्याचे मन, हेही त्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकेल.
द फॉल ऑफ रॉबेस्पेअर (१७९४, रॉबर्ट साउदीच्या सहकार्याने), ओसोरिओ (१७९८ पूर्वी कधीतरी लिहिलेले) आणि झोपोल्या (१८१७) ही कोलरिजची नाटके. शिलरच्या व्हालस्टाइन ह्या मूळ जर्मन नाटकाचे त्याने इंग्रजी भाषांतर केले आहे. त्याच्या बायोग्राफिआ लिटरारिआ (१८१७, इं. शी. लिटररी ऑटोबायग्राफी) मध्ये त्याचे वाङ्मयीन जीवन व मते त्याने सादर केली आहेत. त्याची पुष्कळशी वाङ्मयीन समीक्षा ह्याच ग्रंथात अंतर्भूत झालेली आहे. वर्ड्स्वर्थच्या कवितांच्या समीक्षेस त्यात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे, तसेच कांट, फिक्टे आणि शेंलिंग ह्यांच्या तत्त्वज्ञानाचा त्यात बराच परामर्श घेण्यात आला आहे.
कल्पनाशक्ती ही सार्वभौम सर्जनशक्ती असून सकल व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची द्योतक आहे, हा विचार इंग्लंडमधील कोणत्याही समकालीन स्वच्छंदतावाद्यापेक्षा अधिक आग्रहीपणाने मांडून त्याने इंग्रजी समीक्षाविचारात क्रांती घडवून आणली. कोणत्याही साहित्यकृतीच्या आकलनासाठी ती निर्माण करणाऱ्या मनाचे गुणधर्म समजून घेण्याची आवश्यकता त्याने प्रतिपादन केली. प्रत्येक साहित्यकृतीला तिचे असे एक पृथगात्म व्यक्तिमत्त्व असून तिचे नियम त्या व्यक्तिमत्त्वातूनच निर्माण झालेले असतात, अशी त्याची भूमिका होती. ॲरिस्टॉटलप्रणीत वा ॲरिस्टॉटलच्या प्रभावातून निर्माण झालेल्या नव-अभिजाततावादी समीक्षाविचाराशी ही भूमिका विरोधी आहे. समीक्षेची व्यापक आणि मूलभूत स्वरूपाची मूल्ये त्याला निश्चितच मान्य होती. तथापि सामान्य व विशिष्ट ह्यांच्यातील तोल साहित्यकृतीच्या मूल्यमापनाच्या संदर्भातही नेमका साधता आला पाहिजे, अशी त्याची धारणा जाणवते. त्याच्या मनावरील चराचरेश्वरवादाच्या प्रभावाचा एक जाणवणारा परिणाम म्हणजे जिवंत व एकात्म साकल्याची त्याची संकल्पना. ह्या संकल्पनेच्या अनुरोधाने मांडलेल्या त्यांच्या टीकाविचारामुळे कोलरिजपूर्व इंग्रजी समीक्षेतील मूलभूत विसंवाद बऱ्याच प्रमाणात नाहीसे होऊ शकले. निसर्ग व कला, प्रतिभा आणि कलात्मक निर्णयक्षमता, भावना व विचार हे एकाच जिवंत साकल्याचे विविध घटक होत, असे विचार त्याने मांडले. शेक्सपिअरची प्रतिभा त्याच्या कलात्मक निर्णयक्षमतेइतकी समर्थ होती, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ह्याच विचारांच्या आधाराने मांडला. विसाव्या शतकातील ⇨ आय्.ए. रिचर्ड्ससारख्या समीक्षकांवर कोलरिजचा प्रभाव आहे. तत्त्वज्ञ म्हणून कांट आणि शेलिंग ह्यांच्या विचारांचा त्याच्यावर प्रभाव आहे. एड्स टु रिफ्लेक्शन (१८२५) मध्ये कोलरिजची तात्त्विक भूमिका पहावयास मिळते. त्यात मुख्यत: विवेक आणि ग्रहणशक्ती ह्यांतील भेद स्पष्ट केला आहे. अंतिम आध्यात्मिक सत्ये जाणून घेण्यासाठी विवेकाचीच कास धरली पाहिजे, असे सांगून ग्रहणशक्तीचा उपयोग बाह्य अथवा ऐहिक जगाच्या ज्ञानापुरताच मर्यादित आहे, असे त्याचे प्रतिपादन आहे.
कोलरिजचे तात्त्विक विचार आणि दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीने एच्. एन्. कोलरिज ह्याने १८४० मध्ये संपादित केलेला कन्फेशन्स ऑफ ॲन इंक्वायरिंग स्पिरिट हा त्याच्या पत्रांचा संग्रहही महत्त्वाचा आहे. त्याने वेळोवळी आपल्या टिपणवह्यांतून नोंदविलेले विचार ॲनिमा पोएटा (१८९५) ह्या नावाने संकलित करण्यात आले आहेत.
तत्त्वज्ञान आणि धर्म ह्यांत समन्वय घडवून आणण्यासाठी त्याने लाँगोसोफिया नावाच्या एका प्रचंड गद्यग्रंथाचे काम हाती घेतले होते. तथापि त्याच्या अनेक योजनांप्रमाणे हीही साकार होऊ शकली नाही.
राजकीय विचारात तो स्वत:ला बर्कचा वारसदार म्हणवून घेई. तथापि ह्या क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी त्याच्या हातून झालेली नाही.
संदर्भ : 1. Appleyard, y3wuoeph A. Coleridge’s Philosophy of Literature, Cambridge, 1965.
2. Beer, John Bernard, Coleridge the Visionary, New York, 1959.
3. Campbell, J. D. Samuel Taylor Coleridge : A Narrative of Events in His Life,
London, 1894.
4. Chambers, E. K. Samuel Taylor Coleridge : A Biographical Study, New York and
London, 1938.
5. Coburn, Kathleen, Ed. The Philosophical Lectures, London, 1949.
6. Coleridge, Ernest H. Ed. The Complete Poetical Works of Samuel Taylor Coleridge, 2
Vols., Oxford, 1912.
7. Colmer, J. Coleridge : Critic of Society, New York and London, 1959.
8. Fogle, Richard H. Idea of Coleridge’s Criticism, Berkley, 1962.
9. House, Coleridge, London, 1953.
10. Muirhead, John H. Coleridge As Philosopher, London, 1930.
11. Richards, I. A. Coleridge and Imagination, London, 1934.
12. Shawcross, John, Ed. Coleridge’s Biographia Literaria, 2 Vols., Oxford, 1907.
13. Shedd, William G. T. Ed. The Complete Works of Samuel Taylor Coleridge, 7 Vols.,
New York, 1884.
कुलकर्णी, अ. र.
“