गउडवहो : महाराष्ट्री प्राकृतातील एक प्रबंध काव्य. कनौजचा राजा यशोवर्मा ह्याच्या दिग्विजयाचे व त्या अनुषंगाने त्याने केलेल्या गौड राजाच्या वधाचे वर्णन ह्या काव्यात आले आहे. ह्या काव्यात १,२०९ गाथा असून काव्याच्या पोटविभागास ‘सर्ग’ किंवा ‘आश्वास’ न म्हणता ‘कुलक’ म्हणून संबोधिले आहे. ह्या काव्यातील सर्वांत लहान कुलक केवळ ५ गाथांचा असून सर्वांत मोठ्या कुलकात १५० गाथा आहेत. ⇨ प्रवरसेनाच्या रावणवहोवरून–ह्याचेच दुसरे नाव ⇨ सेतुबंध  ह्या काव्याचे नाव सुचले असावे. ह्या काव्याची रचना सु. ७२५ मध्ये झाली असावी.

मंगलाचरणात ब्रह्मदेव, नृसिंह, महावराह, कूर्म, शिव, गौरी इ. देवदेवतांना वंदन केले आहे. कविप्रशंसेत भवभूती, भास, कालिदास इ. कविश्रेष्ठांच्या स्तुतीबरोबच प्राकृत भाषेची महती सांगितली आहे. उरलेल्या भागांत दिग्विजयाचे वर्णन आहे. ह्या काव्यात सुंदर निसर्गवर्णने आलेली आहेत. उपमा, उत्प्रेक्षादी अलंकार व सुभाषिते ह्यांनी हे काव्य नटलेले आहे. कवीचे पांडित्य आणि संस्कृत-प्राकृत भाषाप्रभुत्व ह्या काव्यातून स्पष्टपणे प्रत्ययास येते. तथापि ज्या गौड राजाच्या वधावरून ह्या काव्याला गउडवहो  (गौडवध) हे शीर्षक दिले गेले, त्या राजाचा ह्या काव्यात नामोल्लेखही नाही. त्याच्या वधाचा प्रसंगही केवळ दोन गाथांमध्ये आटोपता घेतला आहे त्यामुळे हे काव्य अपूर्ण राहिले असावे किंवा त्याचा उरलेला भाग अनुपलब्ध असावा, असे एक मत आहे. तथापि हेर्मान याकोबीसारख्या विद्वानांना ते मान्य नाही. हरिपालाने ह्या काव्यावर गौडवधसार  ही संस्कृत टीका लिहिली आहे.

तगारे, ग. वा.