गालगुंड : अतिसूक्ष्म विषाणूंच्या (व्हायरसांच्या) संसर्गामुळे निरनिराळ्या लाला ग्रंथींचा, विशेषतः कानाच्या पुढच्या व खालच्या बाजूंस असणाऱ्या सर्वांत मोठ्या लाला ग्रंथींचा (म्हणजे अनुकर्ण ग्रंथींचा), शोफ (द्रवयुक्त सूज) होऊन त्यांची वृद्धी होणाऱ्या रोगास गालगुंड असे म्हणतात. पुष्कळदा या रोगाची साथ येते. रोग विशेषतः शिशुवयातील मुलांना होतो. ग्रंथी सुजण्यापूर्वी पुष्कळ दिवस रोगविषाणू रक्तात व लाला ग्रंथीमध्ये असतो व गालगुंड झाल्यानंतरही दहा दिवस लाळेत असतो, म्हणून रोग्याला सूज बरी होईपर्यंत वेगळे ठेवावे. शहरी लोकांत ९०% रोगसंक्रामण (रोगाचा संसर्ग होण्याची क्रिया) आढळते, तर खेड्यातील फक्त १०% लोकांना गालगुंड होते. रोग्याच्या लघवीतून विषाणू अलग करता येत असल्यामुळे मूत्रही रोगसंक्रामणाचा मार्ग असणे शक्य असल्याचे दिसते.
रोगविषाणू श्वसनमार्गातून दाखल होऊन वाढतो. रोगाचा परिपाककाल (रोगविषाणू शरीरात शिरल्यापासून रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ८ ते २८ दिवस (सरासरी १८ दिवस) असतो.
लक्षणे : सुरुवातीला डोके दुखणे, बेचैनी, घसा दुखणे किंवा मान अवघडणे अशी लक्षणे होतात. नंतर मानेची, कानाखालची व पुढची बाजू सुजलेली दिसते आणि त्या बाजूची लालोत्पादक ग्रंथी सुजते. एकदोन दिवसांत दुसऱ्या बाजूची ग्रंथी सुजते. वेदना नसतात आणि लालीही नसते. ज्वर ३८·५० से. किंवा त्यापेक्षा जास्त चढतो. ग्रंथीत क्वचितच पू होतो. सूज आल्यामुळे तोंड पूर्णपणे उघडता येत नाही व गिळण्यासही त्रास होतो. सुजलेल्या ग्रंथी ४–६ दिवसांत पूर्ववत होतात. ताप असेपर्यंत पूर्ण विश्रांती घेतली पाहिजे.
या रोगात निरनिराळे उपद्रव संभवतात. लाला ग्रंथिशोथ (लाल स्रवणाऱ्या ग्रंथीची दाहयुक्त सूज), मस्तिष्कावरणशोथ (मेंदूवरील आवरणाची दाहयुक्त सूज), वृषणशोथ (पुं-जनन ग्रंथीची दाहयुक्त सूज), अग्निपिंडशोथ [→ अग्निपिंड] व क्वचित अंडाशय, स्तन, अवटू (मुख्य श्वासनलिकेच्या पुढच्या बाजूस व दोन्ही बाजूंस असणारी अंतःस्रावी ग्रंथी), यौवनलोपी ग्रंथी (छातीच्या पोकळीत पुढील बाजूस असलेली व बाल्यावस्थेतच पूर्ण वाढ होणारी अंतःस्रावी ग्रंथी), हृदय, यकृत व मस्तिष्कतंत्रिका (मेंदूच्या पृष्ठापासून निघणाऱ्या मज्जा) यांचेही रोग होतात.
वृषणशोथ हा पुष्कळ वेळा आढळणारा उपद्रव असून सातव्या दिवसाचे सुमारास किंवा नंतर होतो. सामान्यतः एकाच बाजूची वृषणविकृती होते. त्यामुळे कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. स्त्रियांत स्तनशोथ किंवा अंडाशयशोथ होतो व नंतर पुन्हा ताप चढतो.
चिकित्सा : विशिष्ट अशी काहीही चिकित्सा नाही. तथापि कॉर्टिसोनाचा उपयोग करतात. रोग्याचे तोंड वारंवार स्वच्छ करणे, सुजलेल्या ग्रंथीवर ग्लिसरीन बेलाडोना (बेलाडोना नावाच्या वनस्पतीच्या अर्काचा पाणी आणि ग्लिसरीन यांतील विद्राव) लावणे, वेदना होत असल्यास शेकणे वगैरे उपचार करतात. पातळ आहार देतात.
रानडे, म. अ.