गार्‌रॅ, आल्मैदा : (४ फेब्रुवारी १७९९–९ डिसेंबर १८५४). पोर्तुगीज कवी, कादंबरीकार आणि नाटककार. जन्म ओपोर्तो येथे. कोईब्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर तो लिस्बनला गेला. पोर्तुगालमध्ये झालेल्या उदारमतवाद्यांच्या बंडात (१८२०) भाग घेतल्याबद्दल त्याला हद्दपार करण्यात आले. हद्दपारीचा काळ त्याने इंग्लंड आणि फ्रान्स ह्या देशांत काढला. इंग्लंडमध्ये स्वच्छंदतावादी संप्रदायाचा त्याच्यावर प्रथम प्रभाव पडला. पॅरिसमध्ये प्रसिद्ध झालेली कामाँइश (१८२५) आणि दॉना ब्रांका (१८२६) ही त्याची काव्येस्वच्छंदतावादी प्रकृतीची आहेत. या काव्यांमुळे पोर्तुगालमधील स्वच्छंदतावादी चळवळीचा तो अध्वर्यू ठरला. १८२६ मध्ये पोर्तुगालला परत येण्याची परवानगी त्यास देण्यात आली. परत आल्यावर त्याने पत्रव्यवसाय पतकरला परंतु उदारमतवादी तत्त्वांचा पुरस्कार आणि प्रचार केल्याबद्दल त्याला तुरुंगात टाकण्यात आले. १८२८ मध्ये त्याला पुनश्च देश सोडावा लागला. पुढे ओपोर्तो काबीज करण्यासाठी झालेल्या लढाईत तो उदारमतवाद्यांच्या बाजूने लढला. १८३४-३५ मध्ये ब्रूसेल्स येथे पोर्तुगालचा कौन्सल जनरल आणि राजदूतावासाधिकारी म्हणून त्याने काम केले. १८३७ मध्ये तो पोर्तुगीज संसदेत गेला. तेथे वक्ता म्हणून तो चमकला. १८५२ मध्ये त्यास उमरावपद देण्यात आले.

राष्ट्रीय रंगभूमी उभी करण्यासाठी त्याने खूप परिश्रम घेतले. अनेक नट-नाटककारांवर त्याचा प्रभाव पडला. त्याने लिहिलेल्या नाटकांपैकी फ्रेइ लुईज द सौझा (१८४४) हे नाटक एकोणिसाव्या शतकातील एक श्रेष्ठ अशी पोर्तुगीज नाट्यकृती होय. त्याशिवाय फोल्यश काईदश (१८५३, इं. शी. फॉलन लीव्ह्‌ज) व फ्लोरिश सँ फ्रूतु (१८४५) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. व्हिआझ्येंश ना मीन्या तॅरा (१८४६, इं. शी. ट्रॅव्हल्स इन माय लँड) ह्या त्याच्या कादंबरीतील ताज्या आणि उत्स्फूर्त शैलीने आधुनिक पोर्तुगीज गद्यावर परिणाम घडवून आणला. उ आर्कु द सान्ताना (२ खंड, १८४५, १८५० इं. शी. द बो ऑफ सांत आना) ही त्याची कादंबरी वॉल्टर स्कॉटचा प्रभाव दर्शविते. त्याच्या अनेक कवितांना स्वच्छंदतावादी संप्रदायातील उत्कृष्ट भावकवितांत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. लिस्बन येथे तो मरण पावला.

देसाई, स. शं.