गार्बो, ग्रेटा : (१८ सप्टेंबर १९०५ – ). सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री. ग्रेटा लूव्हिसा गस्टाव्हसॉन हे तिचे मूळ नाव. स्वीडनमधील स्टॉकहोम येथे जन्म. वयाच्या चौदाव्या वर्षी पदवीधर. वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या गरिबीमुळे तिला अनेक प्रकारची कामे करावी लागली. पुढे एरिक पेटशलर या दिग्दर्शक-अभिनेत्याशी तिची योगायोगाने गाठ पडली. त्याच्या प्रयत्नामुळेच तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
पीटर द ट्रॅम्प या चलत्चित्रपटात प्रथमच तिने १९२२ मध्ये काम केले. पुढे १९२२ ते १९२४ या कालावधीत स्टॉकहोम येथील रॉयल ड्रॅमॅटिक थिएटरमध्ये तिने अध्ययन केले, याच काळात तिचा मॉरिटस स्टीलर या स्वीडिश दिग्दर्शकाशी परिचय झाला. त्याने तिला दि स्टोरी ऑफ गोस्टा बर्लिंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली. याच वेळी तिचे मूळ नाव बदलून ग्रेटा गार्बो असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये ती स्टीलरसमवेत अमेरिकेला गेली.
अमेरिकेमध्ये तिने मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या २४ चित्रपटांतून काम केले. त्यांपैकी द टॉरंट (१९२६), फ्लेश अँड द डेव्हिल (१९२७), लव्ह (१९२७), वाइल्ड ऑर्किड्स (१९२९), ॲना ख्रिस्ती (१९३०), माताहारी (१९३१), ग्रँड हॉटेल (१९३५), ॲना कॅरेनिना (१९३५), कॅमिल (१९३७) व निनोत्च्का (१९३९) हे तिचे प्रमुख व नावाजलेले चित्रपट होत. त्यांतही द टोरंट हा तिचा पहिला अमेरिकन चित्रपट आणि ॲना ख्रिस्ती हा तिचा पहिला बोलपट होता. टू फेसेड वुमन (१९४१) या चित्रपटानंतर ग्रेटा गार्बो चित्रपटक्षेत्रातून निवृत्त झाली.
ग्रेटा गार्बोच्या भूमिकांमुळे चित्रपटातील स्त्रीभूमिका अधिक नैसर्गिक, प्रगल्भ व उज्ज्वल बनली. स्त्रीभूमिकांना एक प्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला. आकर्षक शरीरयष्टी, पिंगट केस, निळसर डोळे, गूढ पण मधुर हास्य व अभिनयकुशलता या गुणांमुळे चित्रपटसृष्टीत तिला ‘डिव्हाइन गार्बो’ म्हणत असत. कॅमेऱ्यासमोर विलक्षण सहजतेने काम करण्याच्या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे दिग्दर्शकांनी व चित्रपटसमीक्षाकांनी विशेष कौतुक केले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ चित्रपटअभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला जातो.
निवृत्तीनंतर १९५१ मध्ये तिने अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले व ती न्यूयॉर्क शहरात एकांतवासात राहू लागली. बुद्धिमत्तेची चमक, विलोभनीय सौंदर्य आणि कलात्मक अलिप्तता या सर्व गुणांमुळे ती एक अनन्यसाधारण अभिनेत्री ठरली.
संदर्भ : Bainbridge, J. Garbo
जोशी, चंद्रहास
“