क्लेमेंट्स, फ्रेड्रिक एडवर्ड : (१६ सप्टेंबर १८७४—२६ जुलै १९४५). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतींचे ⇨परिस्थितिविज्ञान आणि तदंतर्गत अनुक्रमण (विकासक्रियेत एका वनस्पतींच्या गटाच्या ठिकाणी दुसरा गट येण्याची क्रिया) यांसंबंधीचे त्यांचे संशोधन प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म लिंकन (नेब्रॅस्का) येथे झाला. १८९८ साली नेब्रॅस्का विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर तेथेच १८९९ मध्ये साहाय्यक प्राध्यापक व १९०६ साली वनस्पतिरोगविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. मिनेसोटा विद्यापीठात वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुखपद १९०७-१७ पर्यंत भूषविल्यानंतर ते वॉशिंग्टनमध्ये १९१७ पासून कार्नेगी संस्थेत संशोधन सहयोगी झाले. उ. अमेरिकेतील परिस्थितिविज्ञानाच्या अभ्यासाच्या विकासातील त्यांच्या प्रभावाबद्दल ते सुप्रसिद्ध होते तसेच वनश्रीच्या अनुक्रमणासंबंधी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानतात. कार्नेगी संस्थेतून त्यांनी वनस्पतिभूगोल, शरीरक्रियाविज्ञान व परिस्थितिविज्ञान यांसंबंधी अनेक लेख लिहिले. त्यांच्या प्लँट सक्सेशन (१९१६) या ग्रंथात जगातील अनेक प्रदेशांतील अनुक्रमणासंबंधीच्या संशोधनांचे निष्कर्ष संकलित केले आहेत. उ. अमेरिकेतील परिस्थितिविज्ञानाच्या शिक्षणात प्लँट अँड अकॉलॉजी (१९०७) आणि रिसर्च मेथड्स इन प्लँट इकॉलॉजी (१९०६) या त्यांच्या ग्रंथांचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. जेनेरा ऑफ फंजाय (१९०९) हा त्यांचा ग्रंथ कवकविज्ञानात (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींच्या शास्त्रात) महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. ते सांता बार्बरा येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.