गाडगीळ, नरहर विष्णू : (१० जानेवारी १८९६–१२ जानेवारी १९६६). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, लेखक व प्रभावी वक्ते. जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथे. शिक्षण मल्हारगढ, पुणे, बडोदे आणि मुंबई येथे. बी. ए., एल्एल्.बी. झाल्यावर पुण्यात वकिली. १९२० पासून राजकारणात पदार्पण. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे अनेक पदांवर व अनेक पातळ्यांवर कार्य केले. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारगृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली. पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस (१९२१–२५), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष (१९३७–४५), काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सभासद (१९५२–५४) या विविध पदांवर त्यांनी कार्य केले. केंद्रीय कायदेमंडळातही ते सदस्य होते (१९३४–३७). संसदीय काँग्रेस पक्षाचे प्रतोद व चिटणीस म्हणून त्यांनी १९४५–४७ ह्या काळात कार्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदेही भूषविली (१९४७–५२). अनेक सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केले. वेतन-आयोग (१९४६), वेतन-भत्ता आयोग (१९५२), संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समिती (१९५३), राष्ट्रकुल परिषद (१९५४ व १९६५) वगैरे समित्यांवर त्यांनी काम केले. १९५८–६२ या काळात ते पंजाबचे राज्यपाल होते. पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते (१९६४).
केंद्रीय मंत्री असताना गाडगीळांनी अनेक धरण-योजना तातडीने कार्यवाहीत आणण्यात पुढाकार घेतला. सोमनाथाच्या ऐतिहासिक मंदिराचा पुनरुद्धार करण्यात त्यांचाच पुढाकार होता. औद्योगिक उत्पादन खात्याचे मंत्री असतानाही अनेक कारखाने सुरू करण्यास त्यांनी हातभार लावला. अत्यंत कार्यक्षम व तडफदार मंत्री म्हणून ते प्रसिद्ध होते.
सार्वजनिक जीवनाच्या धकाधकीत आपला विद्याव्यासंगही त्यांनी चालूच ठेवला होता. एक सडेतोड आणि निर्भीड विचारवंत म्हणून ते ओळखळे जात. काँग्रसपक्षीय ध्येयधोरणाचेही ते मार्मिक व निःस्पृह टीकाकार होते. महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या नेतृत्वाचे संगोपन त्यांनी केले.
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विधी, इतिहास इ. विषयांवरील व इतर ललित स्वरूपाची त्यांची ग्रंथनिर्मिती सु. पंचवीसहून अधिक आहे. हिंदी अंदाजपत्रके (१९४२), राज्यशास्त्रविचार (१९४५), विधिशास्त्र विचार (१९५८), आधुनिक राज्य व स्वातंत्र्य (१९६२) ही त्यांची पुस्तके विचारप्रवर्तक आहेत. ग्यानबाचे अर्थशास्त्र हे १९४३ मधील पुस्तक अर्थशास्त्राची सुबोध मराठीत चर्चा करणारा उल्लेखनीय ग्रंथ होय. सभाशास्त्र (१९४७), वक्तृत्वशास्त्र (१९५८) ही त्यांची पुस्तके आजही उपयुक्त ठरतील. आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे माझे समकालीन (१९५९) व काही मोहरा काही मोती या ग्रंथांत त्यांनी रेखाटली आहेत. त्यांनी लिहिलेला शीखांचा इतिहास (१९६३) अभ्यासपूर्ण आहे. पथिक (२ भाग – १९६४-६५) हे त्यांचे आत्माचरित्र. गाडगीळांच्या ललित स्वरूपाच्या लेखनात माझा येळकोट (१९६१), लाल किल्ल्याच्या छायेत (१९६४), मुठा ते मेन (१९६५), अनगड मोती, सालगुदस्त इ. पुस्तके उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अनेक ग्रंथांचे अनुवाद गुजराती, हिंदी, पंजाबी व कन्नड भाषांत झालेले आहेत. गाडगीळांची शैली खास मराठी आहे.
जाधव, रा. ग.
“