गाय : अतिप्राचीन काळापासून मानवाच्या जीवनात गाईला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. वन्य अवस्थेत मनुष्य ज्या वेळी मांसावर उपजीविका करून राहत असे त्यावेळी सुलभतेने मांस उपलब्ध व्हावे या हेतूने कुत्र्याच्या पाठोपाठ गायींना माणसाळविले असावे असे मानले जाते. पुढे धार्मिक कार्यात पशुबळींना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे त्यांचे पालन करणे आवश्यक होऊ लागले. भटक्या जीवनक्रमाचा त्याग करून स्थायिक होऊन मानवाने कृषिव्यवसायास प्रारंभ केल्यावर तर गाय-बैल यांचे महत्त्व अधिकच वाढले असले पाहिजे. कृषिजन्य उत्पादनातील मानवी आहाराच्या दृष्टीने अखाद्य असणाऱ्या व पदार्थांवर जनावरे उपजीविका करतात आणि दुधाच्या रूपाने प्रथिनयुक्त अन्न मानवाला पुरवून शेतकामास आवश्यक शक्तीही पुरवितात. शिवाय मलमूत्राच्या स्वरूपात जमिनीचा कस वाढविण्यासाठी आवश्यक असे खतही देतात. यामुळे शेती व जनावरे यांचे अतूट नाते जोडले गेले. भारत हा शेतीप्रधान देश असला, तरी यांत्रिकीकरण कमी असल्यामुळे शेतीची सर्व कष्टदायक कामे बैलांच्या साहाय्याने होतात. त्यामुळे भारतीय कृषिव्यवसायात गाय-बैलांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
स्तनी प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या (ज्यांच्या पायावरील खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या गणाच्या, आर्टिओडॅक्टिला गणाच्या) गोकुलातील (बोव्हिडी) बोव्हिनी या उपकुलात गाईचा समावेश होतो. गोकुलात सर्व रवंथ करणाऱ्या, सम खुरी, पोकळ व अस्थिजन्य शिंगे असणाऱ्या शाकाहारी प्राण्यांचा समावेश होतो. गोकुलात गाईखेरीज शेळ्या व मेंढ्या यांचा अंतर्भाव होतो. बोव्हिनी उपकुलात गाईशिवाय गवा (गौर), गयाळ, बानटिंग, याक इ. वन्य प्राणी तसेच बिसोंटिन व महिष (म्हैस) यांचा समावेश आहे. गोकुलातील प्राण्यांच्या शिंगांचा उगम शिरोस्थीपासून होतो व ती डोक्याच्या अग्रभागी असतात. जिवंतपणी त्यांच्या शिंगावर शृंगद्रव्याचे (केराटीन नावाच्या प्रथिनाचे) आवरण असते.
गाईचा देह वजनदार असतो. शिंगे बहुश: गोल किंवा चपटी असून त्यांच्यावरील वलयांची संख्या वयानुसार वाढत असते. नाक-पुड्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना असतात. बैलाचे गळपोळे गाईपेक्षा मोठे असते. गाईच्या वरच्या जबड्यात कृंतक (अन्नाचे तुकडे करण्यास उपयोगी पडणारे) दात नसतात. शेपूट लांब असून टोकाला केसांचा गोंडा असतो. गाय हा रवंथ करणारा प्राणी असल्यामुळे सेल्युलोज व तत्सम अन्नघटकांवर चांगल्या तऱ्हेने उपजीविका करू शकतो.
उत्क्रांती व इतिहास : दोन ते अडीच कोटी वर्षांपूर्वी यूरोप व उत्तर आशियामध्ये गोकुलातील प्राण्यांचा जन्म झाला असावा व तेथून प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळामध्ये उत्तर गोलार्धात त्यांचा प्रसार झाला असे मानतात. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन गोपशू शृंगहीन होते. भारतात व इटलीत आढळून आलेले प्लायोसीन (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवाश्म (शिळारूप अवशेष) तत्कालीन नरांना शिंगे होती व माद्यांना नव्हती असे दर्शवितात. भारतातील प्लायोसीन कालातील बॉस प्लॉनिफ्रॉन्स (चपट्या कपाळाची) या जातीपासून बॉस प्रिमिजेनियस (पश्चिमेकडील भागात स्थलांतर केलेली) व बॉस नोमॅडिकस (आशियात राहिलेली) या जातींची उपपत्ती झाली असे मानतात. बॉस प्रिमिजेनियस ही जाती इतिहासपूर्व काळात यूरोप व उत्तर आफ्रिका खंडात रानटी अवस्थेत सर्वत्र पसरल्याचे जीवाश्मांच्या पुराव्यावरून स्पष्ट होते. गोपशूंच्या उत्क्रांतीच्या काळातील (सु. दहा लक्ष वर्षांपूर्वी) अवशेषांपासून ते १६२७ मध्ये पोलंडच्या प्राणिसंग्रहालयातील शेवटच्या प्राण्याचा मृत्यू होईपर्यंतच्या सर्व अवस्थांसंबंधी पुरावे उपलब्ध आहेत. होल्स्टीन-फ्रिजियन ही पाश्चिमात्य अर्वाचीन अभिजात (अस्सल जात) ह्या प्राचीन जातीशी सर्वांत जवळची आहे असे दिसते.
बॉस नोमॅडिकस या जातीपासून तुर्कस्तान व मेसोपोटेमिया या देशांत बॉस लाँजिफ्रॉन्स किंवा बॉस ब्रॉखिसेरास या जाती तयार झाल्या. बॉस लाँजिफ्रॉन्स जातीच्या भ्रमंतीमधून ती दक्षिण रशिया, पूर्व यूरोप या मार्गाने स्पेन, जर्सी व गर्न्सी बेटे, इंग्लंडपर्यंत पोहोचली. या मार्गावरील आज आढळणाऱ्याल ब्राऊन स्विस, जर्सी इ. अर्वाचीन अभिजातींचे परस्परांशी विलक्षण साम्य आहेच परंतु उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता, रक्ताचे गट, हीमोग्लोबिनाचे (रक्तातील तांबड्या पेशीतील प्रथिनयुक्त रंगद्रव्याचे) प्रकार इ. बाबतींत अन्य अर्वाचीन यूरोपीय जातींपेक्षा भारतीय वशिंडधारी गाईशी अधिक जवळचे नाते आहे. भारतीय उपखंडात व आफ्रिकेत सर्वत्र आढळणाऱ्या बॉस इंडिकसची (वशिंडधारी) उपपत्ती बॉस नोमॅडिकस जातीपासून झाली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मतानुसार त्यांच्या निर्मितीत गवा, बानटिंग इ. अन्य गोपशूंच्या संकराच्या साहाय्याने हातभार लागला असावा. बॉस टॉरस (वशिंडरहित) आणि बॉस इंडिकस ह्या जातींमध्ये वशिंडाच्या बाबीखेरीज अनेक मूलगामी फरक आहेत. वशिंड हे केवळ त्यासाठीच प्रकर्षाने निवड करून प्रजनन (पैदास) केल्याने निर्माण झाले असावे. भारतात वशिंडरहित गTई-बैल होते हे महाबळीपुरम येथील देवळातील शिल्पावरून दिसून येते. गेल्या दोन-तीन शतकांपासून वाहतुकीच्या वाढत्या सोयीमुळे स्थानिक गरजेनुसार जगातील एका भागातील गुरे दुसऱ्या भागात नेऊन संकराने वैशिष्ट्यपूर्ण गट तयार होत आहेत. वरील विवेचनावरून आजच्या भारतीय अभिजातींचे पूर्वज बॉस इंडिकस ही जातीच होती असे दिसून येते.
आर्थिक महत्त्व : सोन्याला अर्थव्यवस्थेत महत्त्व प्राप्त होण्यापूर्वी किंवा मुद्राचलन रूढ होण्यापूर्वी संपत्तीची मोजदाद गुरांच्या संख्येवरच होत असे व संपत्तीची देवघेवही गुरांच्या रूपाने होत असे. संस्कृत भाषेतील ‘पशु’ ह्या शब्दाचे जसे ‘पैसा’ ह्या संपत्तीविषयक मराठी शब्दाशी साम्य आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेतील ‘पेक्युनियरी’ ह्या संपत्तीविषयक शब्दाचे मुळ पेकस (पशु) ह्या लॅटिन शब्दात आहे. ‘पेकोरा’ (रवंथ करणारे प्राणी) हा शब्दही वरील लॅटिन मुळापासून निर्माण झाला आहे. भारतीय समाज कृषिप्रधान असल्यामुळे अर्थव्यवस्थाही कृषि-आधारित म्हणजे पर्यायाने पशुव्यवसायावर अवलंबून आहे. जागतिक उत्पादनाचा विचार करता जगातील मांसोत्पादनातील ५० टक्के, दुधातील ९५ टक्के व कातड्यापैकी ८० टक्के उत्पादन गाय व तिच्या वंशातील प्राण्यांपासून मिळते. भारतात शेतीची बहुतेक सर्व कामे बैलाकडूनच केली जातात. ह्या कामाकरिता वापरण्यात आलेल्या चलशक्तीची अदमासे किंमत ३०० ते ५०० कोटी रूपयांच्या घरात आहे.
धार्मिक स्थान : ज्योतिषशास्त्रात राशिचक्रातील दुसरे स्थान वृषभ राशीचे आहे. ईजिप्तमध्ये एपिस देवाची पूजा वृषभ रूपात करीत असत. प्राचीन काळी भारतात वळू सोडणे (वृषोत्सर्ग) हे धार्मिक महत्त्वाचे कृत्य मानीत असत. ह्यासाठी वळू कसा निवडावा ह्याचे वर्णन गृह्यसूत्राच्या टीकेमध्ये केले आहे ते असे : जो वळू पाण्यात शेपूट बुडवून लीलेने पाणी उडवतो (असे लांब शेपूट असणारा) व शिंगाने सहजपणे माती उडवतो (पौरूषदर्शक), त्याचप्रमाणे आपल्या संततीच्याद्वारे कळपही सुधारतो असा वळू निवडावा.
प्राचीन इराणमधील जरथुश्त्री धर्माचे लोक मिथ्र (सूर्यदेव) नावाच्या देवाची पूजा करीत. या देशाच्या अनेक शिल्पाकृतीत मिथ्र बैलाची शिंगे धरून त्याला पराभूत करीत आहे व ज्या ठिकाणी कट्यार मारीत आहे त्या ठिकाणाहून रक्त न निघता धान्याची कणसे बाहेर पडत आहेत असे दाखविले आहे. यात ‘बैल’ हे समृद्धीचे प्रतीक आहे असा हेतू असावा असे मानले जाते. भारतात सर्व धर्मामध्ये वृषभाला आगळे महत्त्व देण्यात आले आहे. भागवत पुराणात पाऊस पडणाऱ्यास इंद्र देवाचा उल्लेख वृषभ म्हणून केला जातो. भगवान बुद्धांचा जन्म वृषभा लग्नात झाला असल्यामुळे वृषभाला अशोक स्तंभावर स्थान देण्यात आले. लिंगायत पंथामध्ये त्या पंथाचे संस्थापक बसव यांना नंदीचेच अवतार मानतात. मोहें-जो-दडो येथील उत्खननामध्ये (इ. स. पू. सु. २७५०-२२५०) सापडलेल्या राजमुद्रांवर व मातीच्या शिल्पांवर वृषभाची चित्रे आहेत. ‘गो’ म्हणजे गाय. संस्कृतमध्ये ‘गो’ शब्दाने गाय व बैल ह्या दोहोंचाही निर्देश होतो. ‘गो’ शब्दाचे इंद्रिय, किरण, वाणी, डोळा इ. अनेक अर्थ संस्कृतमध्ये आहेत. मुख्य अर्थ मात्र गाय वा बैल. वेदांत, विशेषत: ऋग्वेदात, गाईचा महिमा वर्णन करणारे अनेक मंत्र आहेत. ऋग्वेदातील प्रार्थनेमध्ये ‘मला माझ्या लोकांतील वृषभ होऊ दे’ असे आहे. गायीच्या संबंधात ‘ती अमृताची नाभी आहे’ ‘देवाचे यजन (हवन) करण्याचे ती एक साधन आहे’ ‘ती रूद्राची माता, वसूंची दुहिता व आदित्याची बहीण आहे’ असे ऋग्वेदात अनेक उल्लेख आहेत. कृष्णाच्या गोवर्धनोद्धार कथेतही गाईचा महिमा सूचित होतो. कृष्णाचे ‘गोपाल’ हे एक पवित्र नाम म्हणून हिंदू मानतात. गाय हिंदूंना अत्यंत पवित्र असून अनेक धर्मकृत्यांत तिचा व तिच्या गोरसाचा समावेश करणे हे हिंदूधर्माचे एक वैशिष्ट्य आहे. वैदिकांच्या यज्ञसंस्थेत गायीला विशेष महत्त्व होते. प्रत्येक यज्ञकर्त्या यजमानाची गोशाळा असे. यज्ञाला लागणारे दूध,दही व तूप गायीचेच असावे लागे. याउलट यज्ञप्रसंगी गायीची हत्या होत असावी. मधुर्पक पूजेच्या वेळी गोवध करण्याची पद्धत होती असे गृह्यसूत्रावरून दिसते. त्याकाळी गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नव्हते. ‘अहन्या’ म्हणजे अवघ्या गाय असा उल्लेख ऋग्वेदात येतो तथापि तो फक्त दुभत्या गाईसच अनुलक्षून असावा. पुढे पुराणकाळात अगदी उलट प्रतिक्रिया होऊन गाय मारू नये, तिचे मांस खाऊ नये असा विचार दृढभूल झाला. हिंदूंना गोमांसभक्षण निषिद्ध मानले गेले व गोवध हे पंचमहापातकांसारखेच एक महापातक ठरले. गायीलाच नव्हे तर गायीचे मूत्रादी पंचगव्यही पवित्र मानले नेले. पंचगव्य (म्हणजे गाईचे शेण, मूत्र, दूध, दही व तूप हे पाच पदार्थ एकत्र मिसळून) कोणत्याही पापक्षालनाच्या वेळी किंवा प्रायश्चित्ताचे अंग म्हणून हिंदू व्यक्तीला प्राशनार्थ दिले जाते. पंचगव्यप्राशन हा हिंदूंचा एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे. आयुर्वेदात गोमूत्राचे औषधी गुण वर्णिले आहेत.
ताटके, म. बा.
गोरक्षण : गाय हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व पूज्य मानली जाते म्हणूनच तिचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे आद्य व परम कर्तव्य समजले जाते. आर्थिक दृष्ट्याही गाईची उपयुक्तता मोठी आहे.
सामाजिक दृष्ट्या पुरातन काळापासून गोरक्षणास महत्त्व प्राप्त झाले. चक्रवर्ती राजे व ऋषिमुनी हे गोधन बाळगीत व त्याचे पवित्र कर्तव्य म्हणून रक्षण करीत. ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी बिरुदावली शिवाजी महाराजांनी धारण केली होती.
गेल्या सु. शंभर वर्षांत भारतात गोरक्षणाची चळवळ सुरू झाली व विकास पावली. तथापि तिला यावे तसे व्यवस्थित स्वरूप आले नाही. भारतात गोधनाकडे विशेष लक्ष पुरविले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.
गोरक्षणाचे व्रत घेतलेल्या गोवर्धन संस्था, गोरक्षण संस्था व पांजरपोळ ह्यांद्वारे मुख्यत्वे गोरक्षण-संवर्धनाचे कार्य चालते. अखिल भारतीय पातळीवर गोरक्षण परिषदाही आयोजित केल्या जातात. महाराष्ट्रात कै. बाळकृष्णबुवा चौंडे महाराजांचे गोरक्षणाबाबतचे कार्य या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण आहे.
कायद्याने संपूर्णपणे गोवधबंदी करावी म्हणून अलीकडे पुरीच्या श्री शंकराचार्यानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तसेच जनसंघ ह्या राजकीय पक्षाने उग्र आंदोलन केले. त्यांना कम्युनिस्ट पक्षाने तसेच प्रा. अ. भि. शाह प्रभृतींनी कडवा विरोध केला. कायद्याने संपूर्णपणे गोवधबंदी व्हावी असे प्रतिपादणाऱ्यांपैकी काही जणांनी तसेच श्री शंकराचार्यांनी त्यासाठी उपोषणांदिद्वारे आंदोलन केले. कायद्याने संपूर्णपणे गोवधबंदी होऊ नये, असे प्रतिपादन करणाऱ्यांनी स्वमत समर्थनार्थ वैचारिक दृष्ट्या चांगली बाजू मांडली.
धार्मिक, सामाजिक, आर्थिक इ. बाजूंनी गोरक्षणाचा विचार कुठलाही अभिनिवेश न बाळगता होणे आवश्यक वाटते.
करंदीकर, ना. स, सुर्वे. भा. ग.
संख्या : भारतातील गायी आणि बैल यांची संख्या १९६६ च्या गणनेप्रमाणे १७·५ कोटी आहे व त्यांपैकी गायींची संख्या ५·५ कोटी अहि. ह्यांतील निम्म्याहून अधिक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार व प. बंगाल ह्या राज्यांत आहेत. जागातील संख्येच्या (म्हशी धरून) संदर्भात ही संख्या एक सप्तमांश आहे.
वर्गीकरण : गायी-बैल यांचे वर नमूद केल्याप्रमाणे वशिंडधारी व वशिंडरहित असे दोन प्रमुख प्रकार पडतात. वशिंडधारी गाय भारतीय उपखंडात निर्माण झाली व तेथून प्राचीन काळात खुष्कीच्या मार्गाने आफ्रिका खंडापर्यंत तिचा प्रसार झाला. वशिंडरहित गायींचा प्रसार प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधांत झाला.
वशिंडधारी : या प्रकारच्या गायी-बैलांत बहुश: लांबट डोके, अरुंद कपाळ, लोंबते किंवा टवकारलेले अणकुचीदार टोकांचे कान व पाठीवर मानेच्या बाजूला किंवा जरा मागील बाजूला वशिंड असते. पाठ खांद्याजवळ उंच असून वशिंडामागे तिला उतार लागतो आणि कंबरेजवळ पुन्हा उंची वाढते.कंबरेपासून शेपटापर्यंतचा भाग उतरता असतो. शरीर अरुंद असून त्याचा व्याप कमी असतो. कास अर्धगोलाकार असून तिचा पायापर्यंत विस्तार असतो. सर्व सड समाकार नसतात व एकमेकांशी समांतरही नसतात. वजन मंदगतीने वाढते. रोजच्या वाढीचे प्रमाण अर्ध्या किग्रॅ. पेक्षा अधिक नसते. उत्तम पालनपोषण केल्यास कालवडी २७ ते ३० महिन्यांच्या झाल्यावर वयात येतात व गाभण राहू शकतात आणि ३६ ते ४२ महिन्यांच्या सुमारास पहिल्यांदा वितात. दुग्धोत्पादन साधारण प्रतीचे असून हवेचे तापमान ३५° से. च्या वर गेल्यावरच दुधातील प्रथिने व शर्करा ह्या घटकांचे प्रमाण कमी होते. मातृभावना उत्कट असल्याने वासरू जवळ असल्याखेरीज पान्हावत नाहीत. मानेखाली, छातीखाली व पोटाखाली त्वचेला भरपूर झोळ असतो आणि त्वचेत घर्मग्रंथींची संख्या भरपूर असून त्या विकसित असतात. त्यामुळे घाम भरपूर येतो. केस साधारण लांब असून त्यांच्याखाली वेगळी लव नसते व ऋतुमानानुसार त्यात बदल होत नाहीत. केस रंगहीन असले तरी त्या भागातील त्वचा नेहमीच रंगीत असते. त्वचेच्या वरील वैशिष्ट्यांमुळे उन्हाळ्यात शरीराच्या तापमानापेक्षा हवेचे तापमान अधिक असतानाही शरीरात निर्माण होणारी उष्णता घाम येऊन व त्याचे बाष्पीभवन होऊन सहजतेने निघून जाते. त्वचेतील तैलग्रंथींच्या वैशिष्ट्यपूर्ण स्रावामुळे व त्वचेच्या अन्य गुणधर्मांमुळे गोचिड्या, गोमाश्या इ. उपद्रवी कीटकांचा प्रतिकार होतो. सर्वसाधारणपणे रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
वशिंडरहित : या प्रकारात डोके आखूड असून कपाळ रुंद असते. कानांची टोके गोलाकार असून ते डोक्याला आडवे दिसतात. वशिंड नसल्यामुळे पाठ सरळ पातळीत असते आणि कंबरेपासून शेपटाच्या मुळापर्यंतचा भाग पाठीच्याच पातळीत असतो. शरीर व्यापक व रुंद असते. कास मोठी व लांब असून तिचा विस्तार पायांच्या पलीकडेही असतो. सर्वसड समाकार असून एकमेकांशी समांतर असतात. गायी जोमाने वाढतात व रोजच्या वाढीचे प्रमाण एक किग्रॅ. पर्यंत असते. कालवडी १४ ते १६ महिन्यांच्या वयात माजावर येतात व गाभण राहू शकतात. पहिले वेत २४ ते ३० महिने वयाच्या सुमारास होते. दुग्धोत्पादन चांगल्या प्रतीचे असते व हवेचे तापमान २४° से.च्या वर गेल्यास दुधातील प्रथिने व शर्करा ह्या घटकांचे प्रमाण कमी होते. मातृभावना विशेषत्वाने नसल्यामुळे वासराशिवाय पान्हावतात. त्वचा अंगालगत घट्ट चिकटलेली असते व मानेखाली, छातीखाली व पोटाखाली तिला विशेष झोळ नसतो. त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो. त्वचेत घर्मग्रंथींची संख्या कमी असते व त्या अविकसित असतात. त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण माफक असते. केस लांब असून मऊ असल्यामुळे अंगाबरोबर चोपून बसलेले दिसतात. केसांच्या खाली आखूड लव असते. हिवाळ्यात केस लांब वाढतात व खरखरीत दिसतात. वसंत ऋतूच्या प्रारंभी ते गळून मऊ आखून केस उगवू लागतात. शरीराच्या रंगहीन भागात केस व त्वचा रंगहीन असते. त्वचेच्या वरील वैशिष्ट्यांमुळे उन्हाळ्यात शरीराच्या तापमानापेक्षा भोवतालचे तापमान अधिक झाल्यावर घाम कमी येत असल्यामुळे शरीरातील उष्णतेचा सहजपणे व्यय होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गोचिड्या, गोमाश्या इ. कीटकांचा प्रतिकार चांगल्या रीतीने करता येत नाही. रोगप्रतिकारक शक्ती अगदीच साधारण असते.
वशिंडरहित व वशिंडधारी असे गायींचे दोन प्रमुख प्रकार असले, तरी जगातील बहुतेक सर्व भागांत त्यांच्या शारीरिक गुणधर्मांनुसार अनेक अभिजाती निर्माण झाल्या आहेत. ह्या अभिजातींचे वर्गीकरण त्यांच्या उत्पादनक्षमतेनुसार करता येते. पाश्चात्त्य देशांत दुधाळ, मांसोत्पादक व उभयांगी (दुधाळ व मांसोत्पादक) आणि भारतात दुधाळ, शेतकामास उपयोगी व उभयांगी (दुधाळ व शेतकामास उपयोगी) असे वर्गीकरण करतात. गोमांसाच्या वापराला विरोध असल्यामुळे भारतात खास मांसोत्पादक जाती निर्माण झाल्या नाहीत. तथापि भारतीय जातींपासून अमेरिकेत निर्माण केलेल्या ब्राह्मण ह्या मांसोत्पादक जातीचा व भारतीय गीर जातीचा ब्राझीलमध्ये उत्कृष्ट मांसोत्पादक जात म्हणून होणारा वापर ध्यानात घेण्यासारखा आहे.
भारतातील दुधाळ अभिजाती : बहुतेक दुधाळ जातींच्या गायी धिप्पाड असून त्यांचे गळपोळे लोंबते असते. पुढून गायीची ठेवण त्रिकोणाकृती दिसते. पोट विस्तृत असते. कास उठावदार असून सड सारख्या लांबीचे व समांतर असतात.
गीर : गुजरात राज्यातील दक्षिण काठेवाड व गीर जंगलात आढळणारी दुधाळ अभिजाती. जवळजवळ पांढऱ्या व रंगापासून संपूर्ण तांबड्यापर्यंत पांढऱ्या तांबड्या रंगाच्या छटT त्याचप्रमाणे काळ्या तांबड्या रंगांच्या छटा , उठावदार रुंद कपाळ, मागे वळलेली शिंगे, लांबरुंद पर्णाकृती, टोकाला खाच असलेले लोंबते कान अशी ह्या अभिजातीतील गायींची ठेवण असते. कास व्यापक असून सड समांतर असतांत. गायी ४०० किंग्रॅ. वजनाच्या असून ३२५ दिवसांच्या दुग्धकालात सु. ३,१७५ लि. दूध देतात. मंदगतीने भारी वजनाची कामे करण्यास बैल उपयुक्त असतात. सौराष्ट्रात ह्या अभिजातीची अस्सल जनावरे सर्वत्र आढळतात. पुणे येथील लष्करी गोशाळा व पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील ह्या अभिजातीचे कळप महशूर आहेत.
देवणी : आंध्र प्रदेशाच्या पश्चिम व वायव्य भागात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद, नांदेड व परभणी या जिल्ह्यांत ह्या अभिजातीच्या गाई आढळतात. महाराष्ट्रातील उदगीर येथील अभिजनन प्रक्षेत्रात (पैदास केंद्रावर) ह्या अभिजातीची अस्सल जनावरे आहेत. या अभिजातीच्या जनावरात काळ्या पांढऱ्या रंगाचे निरनिराळ्या आकारांचे ठिपके वा तांबड्या पांढऱ्या रंगाचे मिश्रित ठिपके आढळतात. ही अभिजाती आकाराने गीरसारखीच आहे. गायी वजनाने ३५० किग्रॅ. असून ३०० दिवसांच्या दुग्धकालामध्ये १,१५० लि. दूध देतात. बैल भारी शेतकामास उपयुक्त असतात.
शाहिवाल : मूळची पाकिस्तानातील मंगमरी जिल्ह्यातील अभिजाती. भारतात पंजाबमध्ये ह्या अभिजातीची जातिवंत जनावरे सर्वत्र आढळतात. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार व इतर अनेक राज्यांतील शहरांतून दूध पुरविण्यासाठी ह्या अभिजातीच्या गायी पाळण्यात आल्या आहेत कारण भारतातील कुठल्याही हवामानात त्या चांगल्या कार्यक्षम राहतात. रंग तांबडा बदामी असून त्यावर कधीकधी पांढऱ्या रंगाचे पट्टे दिसतात. गाय भरदार, लांबट आकाराची व मांसल असून पाय आखूड असतात. गळपोळे मोठे व लोंबते असते. गायीचे वजन सु. ४०० किग्रॅ. असून ३०० दिवसांच्या दुग्धकालात २,७०० ते ३,२०० लि. दूध देतात. बैल सुस्त असतात पण मंद गतीच्या कामाला उपयुक्त आहेत.
सिंधी : पाकिस्तानातील कोहिस्तान येथील ही मुळची अभिजाती भारतातील आसाम, ओरिसा, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये गोविकास कार्यासाठी वापरली जात आहे. सिंध प्रांताला लागून असलेल्या भारतीय भागातही ह्या अभिजातीची अस्सल जनावरे आढळतात. गडद लाल रंगापासून फिकट पिवळ्या रंगापर्यंतच्या सर्व छटांची जनावरे या अभिजातीत दिसतात. ही जनावरे आकाराने मध्यम चणीची, आटोपशीर ठेवणीची असून त्यांची शिंगे बुंध्यात बाजूस वळलेली पण पुढे वरती चढणारी असतात. कास उठावदार असून गोलाकार असते. दुधाच्या बाबतीत सर्वात उत्तम प्रतीच्या गायी ह्या अभिजातीत सापडतात. या गायी ३०० दिवसांच्या दुग्धकालामध्ये ५,५०० लि. दूध देतात व वजन सामान्यत: ३००किग्रॅ. चे आसपास असते. बैल शेतकामासाठी तसेच गाड्या ओढण्याच्या कामी उपयुक्त आहेत. ब्रह्मदेश, श्रीलंका, जपान, ब्राझील, क्यूबा आणि मलेशिया या देशांतून यांना चांगली मागणी आहे. भारतात होसूर येथील सरकारी अभिजनन प्रक्षेत्र, कर्णाल येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था त्याचप्रमाणे हैदराबाद व बंगलोर येथील लष्करी कृषी क्षेत्रे व अलाहाबाद येथील कृषी संस्था यांमध्ये ह्या अभिजातीचे उत्कृष्ट कळप आहेत.
शेतकामास उपयुक्त अभिजाती : ह्या अभिजातींच्या गायी दूध फार देत नाहीत परंतु बैल शेतीच्या कामाला, वाहतुकीसाठी व तदनुषंगिक कामासाठी अत्यंत उपयुक्त असतात. १९६१ साली केलेल्या अंदाजाप्रमाणे भारतातील अशा बैलांची संख्या सात कोटीच्या आसपास होती. या जनावरांचे चार प्रकार वर्णिले आहेत : (१) पांढऱ्या किंवा फिकट करड्या रंगाची, आखूड शिंगांची व उठावदार चेहऱ्या)ची (२) आतल्या बाजूस वळलेली शिंगे असलेली, पांढऱ्या रंगाची, रुंद कपाळाची, डोळ्याच्या खोबणीची हाडे स्पष्ट दिसणारी (३) म्हैसुरी प्रकाराची, उठावदार कपाळाची, लांब अणकुचीदार धनुष्याकृती वळणाची व बुडाशी जुळूक (जवळजवळ) असलेल्या शिंगांची ताकदवान जनावरे (४) छोट्या पाठीची, लाल अगर लालसर रंगाची किंवा मोठे पांढरे ठिपके असणारी आखूड शिंगांची जनावरे.
नागोरी : जोधपूरच्या आग्नेय भागात आढळणारी राजस्थानमधील ही अभिजाती, दुडक्या चालीने जलद काम करणाऱ्यान बैलांविषयी प्रसिद्ध आहे. रंग पांढरा किंवा करडा असतो. बैलांचे वजन ४०० किग्रॅ. च्या आसपास असते व ते खोलवर वालुकामय असलेल्या जमिनींच्या कामासाठी उपयुक्त असतात. गायी दिवसाला ३ ते ३·५ लि. दूध देतात.
माळवी : मध्य भारतामधील माळव्यातील अभिजाती. बैल मध्यम आकाराचे असून त्यांचा रंग करड्यापासून कोशा (काळसर) ते काळपट रंगापर्यंतच्या छटा असलेला असतो. बैलाचे वजन ५o o किग्रॅ. च्या आसपास असते. बैल शेतीच्या तसेच रस्त्यावरील हलक्या किंवा मध्यम भारी ओढकामासाठी उपयुक्त असतात. गायी पांढऱ्या रंगाच्या असून एका दुग्धकालामध्ये १,००० लि. दूध देतात.
म्हैसुरी : हळ्ळीकर, अमृतमहाल व खिलार ह्या अभिजाती म्हैसुरी म्हणून प्रसिद्ध आहेत. या अभिजाती कामाच्या बाबतीत अतिशय काटक, चपळ व दमदार आहेत. गायी मात्र दूध कमी देतात.
हळ्ळीकर : कर्नाटक राज्यातील तुमकूर, हसन व म्हैसूर आणि तमिळनाडूमधील अर्काट हे जिल्हे या अभिजातीचे माहेरघर आहे. प्रामुख्याने रंग कोशा पण खांद्यापाशी व पुठ्ठ्यावर गर्द कोशा. बैल अतिशय काटक, चिवट, डौलदार चालीचे, स्वभावाने तापट व खुनशी असतात. गायी दूध फारच कमी देतात. बैलांचे वजन ४५० किग्रॅ. च्या आसपास असते व ते शेतकामासाठी आणि वाहतुकीसाठी अत्यंत उपयोगी पडतात.
अमृतमहाल : ही अभिजाती कर्नाटक राज्यात सर्वत्र अाढळते. सर्वसाधारण रंग कोशा पण डोके, मान, वशिंड, खांदे व पुठ्ठे गर्द कोशा रंगाचे असतात. डोके रेखीव, प्रमाणबद्ध व लांबट असते. कपाळ फुगीर असून मध्यभागी पन्हळ असते. शिंगे वैशिष्ट्यपूर्ण असून लांब (२५ ते ४० सेंमी.) उभी, जुळूक व अणकुचीदार असतात. बैल काटक असून त्यांचे वजन ५०० किग्रॅ. च्या आसपास असते व ते स्वभावाने तापट, दिसण्यास उग्र असून जलद वाहतुकीसाठी उपयुक्त असतात. गायींचे दुधाचे सरासरी प्रमाण दर दिवशी १–६ लि. पडते.
खिलार : मुख्यत्वे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील अभिजाती. हळ्ळीकर व अमृतमहाल या अभिजातींशी मिळतीजुळती असून जलद वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. अंगाबरोबर कातडी, उठावदार कपाळ, माथ्यावर अगदी वरच्या बाजूस दोन्ही शिंगांचे बुंधे अगदी एकमेकांशेजारी असतात व मागील बाजूस थोडा बाक घेऊन सरळ रेषेत वर जातात. बैल काटक, दुष्काळी चारापाण्याच्या परिस्थितीशी तोंड देणारे तरीपण ताकदवान व दमदार असतात. खोलवर काळ्या चिकट मातीच्या जमिनीत शेतकामासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतात. बैलाचे वजन सु. ५०० किग्रॅ. असते.
कंगायम : तमिळनाडू राज्यातील कोईमतूर जिल्ह्यातील ही अभिजाती म्हैसुरी अभिजातींशी मिळतीजुळती आहे. बैल मध्यम आकाराचे असून त्यांचा रंग पांढरा ते कोशा या रंगांतील छटांचा असतो. छोटी भरदार गर्दन, थोडे उठावदार कपाळ, लहान गळपोळे, शिंगे क्रमश: बाजूला वर व आत वळलेली असतात. जलद वाहतुकीसाठी व शेतीसाठी बैल फार उपयोगी पडतात म्हणून श्रीलंकेमध्येही या कामासाठी वापरतात. गायी सरासरीने एका दुग्धकालामध्ये ८०० लि. दूध देतात. बैलाचे वजन सु. ३०० किग्रॅ. असते.
पोनवार : उत्तर प्रदेशातील पीलीथीत व खेरी जिल्ह्यांच्या वायव्य भागात ही अभिजाती आढळते. बैल द्रुतगती दौडीसाठी व दमदारपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. बैल रंगाने काळे व काळेपांढरे असतात व त्यांचे वजन ३०० किग्रॅ, च्या आसपास असते. गायी फारच कमी दूध देतात.
सिरी : दार्जिलिंग, सिक्कीम व भूतानच्या आसपासच्या टेकड्यांत आढळणारी अभिजाती. अंगावर लांब केसांचा थर असतो. डोंगरी भागात ४०० ते ६०० किग्रॅ. वजनाची ने-आण करण्याकरिता उपयुक्त. बैलाचे सरासरी वजन ४५० किग्रॅ. असते.
उभयांगी अभिजाती :ओंगोल : आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि गुंतूर जिल्ह्यांत आढळणारी अभिजाती. भारतातील एक चांगल्यापैकी उभयांगी अभिजाती म्हणून ही ओळखली जाते. रंग बहुश: पांढरा असून डोक्यावर गर्द करड्या रंगाचे पट्टे असतात. गाय-बैल आकाराने मोठी व मांसल असतात. बैल ताकदवान असून खोलवर नांगरटीच्या कामासाठी व अवजड वाहतुकीसाठी उपयुक्त असतात. बैलाचे वजन ५५० किग्रॅ. च्या आसपास असते. गायी दुधाळ असून ३०० दिवसांच्या दुग्धकालात १,४०० लि. दूध देतात.
कांक्रेज : भारतातील सर्वांत भारी वजनदार अभिजाती. वळूचे वजन ६०० किग्रॅ. च्या आसपास असते. रंग कोशा पण मान, वशिंड खांदे व पुठ्ठा यांचा काळपट. शेपटीची लांबी मध्यम असून गोंडा काळा असतो. गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्हा, कच्छचा आग्ने्यीकडील भाग आणि बनास व सरस्वती नद्यांच्या काठांवरील प्रदेश हे या अभिजातीचे माहेरघर आहे. चारोडी व आणंद येथील अभिजनन प्रक्षेत्रांमध्ये निपज केलेल्या जातिवंत वळूंच्या वापरामुळे आसपासच्या खेडोपाडी उत्तम नसलीची जनावरे शेतकरी पाळीत आहेत. बैल जलद व ताकदीच्या कामासाठी उपयोगी आहेत. गायी एका दुग्धकालामध्ये सरासरीने १,३५० लि. दूध देतात.
कृष्णाकाठी : कर्नाटक व आंध्र राज्यांच्या सीमेवरील कृष्णाकाठच्या प्रदेशात ह्या अभिजातीची जनावरे आढळतात. ओंगोल व म्हैसुरी अभिजातींच्या मिश्रणाने ही अभिजाती उत्पन्न झाली असावी असा अंदाज आहे. जनावरांचा रंग फिका कोशा असून ती भरदार व धिप्पाड असतात. डोके शरीराच्या मानाने लहान असते. बैलाचे वजन ५०० किग्रॅ.च्या आसपास असते. गायी एका दुग्धकालामध्ये ९०० लि. दूध देतात. काळ्या जमिनीतील शेतीची व वाहतुकीची अवजड कामे मंदगतीने करण्याबद्दल बैल प्रसिद्ध आहेत.
डांगी : गीर आणि स्थानिक गुरांच्या मिश्रणापासून ही अभिजाती निर्माण झाली असावी असे मानतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका, गुजरातेतील सोनगढ तालुका, नाशिक जिल्ह्याचा डोंगराळ भाग, ठाणे व कुलाबा जिल्हे या परिसरात ह्या अभिजातीची जनावरे आढळतात. ही जनावरे मध्यम चणीची (बांध्याची), तांबड्या रंगावर पांढरे फटकारे किंवा पांढऱ्याव रंगावर काळे फटकारे असलेल्या रंगाची, लहान डोक्याची, आखूड शिंगांची असून जास्त पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात चांगल्या रीतीने तग धरून राहतात. डोंगराळ प्रदेशातील शेतीची व वाहतुकीची कामे ह्या अभिजातीचे बैल उत्तम रीतीने करतात. गायी सरासरीने रोज सु. १·५ लि. दूध देतात.
थरपारकर : मूळची पाकिस्तानातील ईशान्य सिंध भागातील अभिजाती. भारतात गुजरातेतील कच्छ, राजस्थानातील जोधपूर व जैसलमीर या भागांत या अभिजातीची जनावरे आढळतात. कर्णाल येथील केंद्र सरकारच्या दुग्धशाळेमध्ये ह्या अभिजातीच्या जातिवंत गुरांचा कळप आहे. ही उभयांगी अभिजातीतील सर्वांत उत्कृष्ट असून जनावरांचा रंग पांढरा किंवा कोशा असतो. मध्यम आकाराची, सुडौल बांध्याची, रुंद व सपाट किंवा किंचित फुगीर कपाळाची ही जनावरे असून शेपटी चांगलीच लांब असून तिचा गोंडा काळा असतो. बैल शेतकामास उपयुक्त असून गायी दुधाळ आहेत. त्या सरासरीने ३०० दिवसांच्या एका दुग्धकालात १,३०० लि. दूध देतात.
हरियाणा : हरियाणा राज्यातील रोहटक, कर्णाल, गुरगाव हे जिल्हे आणि दिल्लीच्या आसपासचा प्रदेश या ठिकाणी ह्या अभिजातीच्या जनावरांची पैदास होते. ह्या अभिजातीची जनावरे आखूड व पातळ शिंगांची, पाणीदार मोठ्या डोळ्यांची, लांब व लोंबते कान असलेली व फिका ते गर्द कोशा रंग असलेली असतात. शेपटीचा गोंडा काळा असतो. बैल शेतीच्या कामासाठी तसेच जलद वाहतुकीसाठी उपयुक्त असतात. गायी साधारण दुधाळ असून ३०० दिवसांच्या दुग्धकालात १,४०० लि. दूध देतात.
नेमाडी : महाराष्ट्र राज्यातील जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यांत ह्या अभिजातीची जनावरे आढळतात. ह्या जनावरांचा रंग तांबडा असून त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे अथवा मोठाले ठिपके असतात.फुगीर कपाळ व शिंगे गीर अभिजातीप्रमाणे मागे झुकलेली असतात. ही जनावरे आकाराने मध्यम असून बैल गरीब व शेतकामास उपयुक्त असतात. गायी एका दुग्धकालात सरासरीने ९०० लि. दूध देतात.
राठी : राजस्थानाच्या अलवर जिल्ह्याच्या आसपासच्या प्रदेशातील अभिजाती. नागोरी आणि हरियाणा यांच्या संकरातून निर्माण झाली असावी असे मानतात. मध्यम आकाराची, बंदिस्त बांध्याची ही जनावरे रंगाने सफेत पांढरी किंवा कोशा रंगाची असून मान व खांदे काळसर असतात. मध्यम प्रतीच्या शेतीच्या वाहतुकीच्या कामासाठी बैलांचा चांगला उपयोग होतो. गायी दिवसाला ४·५ लि. दूध देतात.
पाश्चात्त्य अभिजाती : ब्रिटिश अमदानीत लष्कराला दुधाचा पुरवठा करण्यासाठी आणि पर्यायाने स्थानिक अभिजातींचे संकराने दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी भारतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीस पाश्चात्त्य दुधाळ अभिजातींच्या गायी व वळू आयात करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने डेअरी शॉर्टहॉर्न, आयर्शर व होल्स्टीन फ्रिजियन यांचा समावेश होता. १९५० सालानंतर जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डॅनिश ह्या दुधाळ अभिजातींच्या गायींची निरनिराळ्या राज्यांतील दुग्धविकास योजनांमार्फत आयात करण्यात आली. भारतातील दुधाळ अभिजातींमधील दुधात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने वरील पाश्चात्त्य जातींच्या संकराने संकरित गायींची पैदास सुरू झाली आहे व या संदर्भात पाश्चात्त्य अभिजातींची माहिती खाली दिली आहे. सर्व पाश्चात्त्य अभिजाती वशिंडरहित आहेत.
आयर्शर : स्कॉटलंडमध्ये ही अभिजाती निर्माण झाली. ह्या अभिजातीतील काही जनावरे शृंगहीन असतात. तांबड्या रंगाच्या तपकिरीपर्यंतच्या सर्व छटा ह्या अभिजातीच्या गुरांच्या रंगात दिसतात. गायीचे वजन ४५० किग्रॅ.पर्यंत असते व एका दुग्धकालात ती सरासरीने ४,९०० लि. दूध देते. बंगलोर येथील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट व पुण्याशेजारी इंदूरी येथे ह्या अभिजातीपासून संकर पैदास चालू आहे.
डेअरी शॉर्टहॉर्न : ग्रेट ब्रिटनमध्ये सर्वत्र आढळणारी अभिजाती. इंग्लंडमधील डरॅम येथे निवड करून पैदाशीचे तंत्र वापरून निर्माण केलेली मांसल अभिजाती. त्यांतील काही विभेद दूध उत्पादनात उत्कृष्ट असल्याचे दिसून आल्यावर त्यांतूनच ही अभिजाती जन्माला आली. ह्या अभिजातीतील गायी एका दुग्धकालात सरासरीने ३,७५० लि. दूध देतात.
होल्स्टीन फ्रिजियन : ही मूळची हॉलंडमधील अभिजाती. भारतामध्ये संकरासाठी व्यापक प्रमाणात हिचा वापर होत आहे. गायी भरपूर दूध देतात. गायींचा रंग काळा-पांढरा असून त्या एका दुग्धकालामध्ये ६,५०० लि. दूध देतात.
मांसल अभिजाती : ही जनावरे झपाट्याने वाढतात. अशा जनावरांची गुजराण प्रामुख्याने कुरणात उपलब्ध होणाऱ्या चराईवर होत असल्याने त्यांच्यात ह्या अन्नाचा उपयोग करून अल्पावधीत वजनात भरपूर वाढ होण्याचे क्षमती असावी लागते. ही वाढ शरीराच्या मांसल भागात होते. भारतात खास मांसल अभिजाती निर्माण झाल्या नसल्या, तरी भारतातील कांक्रेज, गीर, ओंगोल इ. अभिजातींची गुरे आयात करून निरनिराळ्या मांसल अभिजाती निर्माण करण्याचे प्रयत्न अमेरिकेत चालू आहेत. अशा तऱ्हेने निर्माण झालेल्या जनावरांना ब्राह्मण म्हणून संबोधले जाते. जवळ जवळ सर्व मांसल अभिजातींच्या बैलांची वजने ८०० ते १,१०० किग्रॅ. असतात तर गायींची वजने ५५० ते ८५० किग्रॅ.पर्यंत असतात. या प्रकारच्या अभिजातींमध्ये ॲबर्डीन अँगस (ब्रिटन), शार्लोटा (फ्रान्स) व ब्राह्मण (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ह्या अभिजाती प्रसिद्ध आहेत. चियानिना या इटलीतील अभिजातीचा नर २ मी. उंच असू शकतो व त्याचे वजन १,८०० किग्रॅ. च्या आसपास असते. इंग्लंडमध्ये मांसल अभिजातींचे नर खच्ची करून वाढविण्याची प्रथा आहे. याउलट यूरोपमध्ये ते खच्ची न करता वाढवतात.
(अ) संकरित गाई लवकर वयात येऊन सामान्यतः साडेतीन वर्षांच्या झाल्या म्हणजे उत्पादनास प्रारंभ करतात. पाश्चात्त्य अभिजातीचे रक्त १/४ असणाऱ्या गायीतही ही सुधारणा आढळते आणि ५/८ असणाऱ्या तर सव्वातीन वर्षांतच उत्पादन सुरू करतात.
(आ) पाश्चात्त्य रक्त १/४ असणाऱ्या गाई वेतात सरासरी १,९०० लि. हून अधिक दूध देतात, तर १/२ असणाऱ्या सरासरी २,२५० लि. दूध देतात आणि ५/८ असणाऱ्या २,७५० लि. दूध देतात.
(इ) संकरित गाई नियमितपणे प्रजोत्पादन करतात. त्यांच्या दोन वेतांत सव्वा वर्षाहूनही कमी अंतर असते. ही सुधारणा फक्त १/४ पाश्चात्त्य रक्त असणाऱ्या गाईमध्ये आढळून येते. पाश्चात्त्य रक्त १/२ असणाऱ्या गायींच्या दोन वेतांमधील अंतर सव्वा वर्षाहून निश्चित कमी होते व ५/८ असणाऱ्यांत ते आणखी एक महिन्याने कमी होते.
(२) आहार : पशुपोषणशास्त्रात विसाव्या शतकात मोठी प्रगती झाली आहे. प्रत्येक जातीच्या पशूला त्याच्या उपजीविकेसाठी व उत्पादनाच्या गरजा भागविण्यासाठी अन्नाचे कोणते घटक किती प्रमाणात उपलब्ध असावे लागतात संबंधीची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.
गायींच्या खाद्याचे खुराक व चारावैरण असे दोन भाग पडतात. खुराकामध्ये खाद्यसत्त्वे अधिक प्रमाणात असतात. तर चारावैरणीत तंतुमय भाग बराच असून सत्त्वांश कमी असतो. जनावराला किती आहार द्यावा याचे निश्चितीकरण त्याच्या वजनावर तर अवलंबून असतेच पण खुराकामध्ये कोणत्या पदार्थांचा अंतर्भाव किती प्रमाणात केला आहे यावरही ते ठरवावे लागते. याशिवाय गायींच्या बाबतीत दुग्धोत्पादनाचा आणि त्यातील घृतांशाचा (स्निग्धांशाचा) तर बैलाच्या बाबतीत त्याच्याकडून करवून घेण्यात येत असलेल्या कामाचा विचार करावा लागतो. गोशाळेच्या एकूण खर्चाच्या ७५ ते ८० टक्के खर्च आहारावर होत असतो. दुधाळ जातीच्या गायींना सकस व पुरेसा आहार मिळाल्याशिवाय त्या त्यांच्या उत्पादनक्षमतेनुसार इष्टतम दुग्धोत्पादन करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे निकृष्ट जातींच्या गायींना कितीही सकस आणि भरपूर आहार दिला, तरी त्या विशिष्ट मर्यादेहून अधिक दुग्धोत्पादन करू शकणार नाहीत हे दुग्धोत्पादनातील महत्त्वाचे तत्त्व आहे. अलीकडे गुरांच्या पोषणासाठी अप्रचलित खाद्यपदार्थांचा विचार होऊ लागला आहे. उदा., मोहाची फुले, मोलॅसिस (उसाच्या रसातील ज्या भागापासून साखरेचे स्फटिक साध्या प्रक्रियांनी करता येत नाहीत असा भाग), आंब्याच्या कोयी इ. निरनिराळ्या पदार्थात असणारी अशुद्ध प्रथिने, पिष्टमय अंश, पचनीय सत्त्वे, खनिजे व जीवनसत्त्वे यांचे पृथक्करण करून कोणते पदार्थ मिश्रणात किती प्रमाणात घालावयाचे हे ठरवितात [→ पशुखाद्य].
(३)संगोपन व संवर्धन : वासराच्या जन्मापासून पुढे गायीत व बैलात रूपांतर होईपर्यंत व नंतर या ना त्या कारणांनी कळपातून बाहेर पडेपर्यंत संगोपन आदर्श झाले असेल, तर अशा गाई-बैलापासून इष्टतम उत्पादनाची अपेक्षा करणे योग्य ठरेल. ऊन-पावसापासून आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण मिळेल असे प्रशस्त व योग्य मोजमापाचे गोठे असावे लागतात. गुरांना कुरणात चरावयास पाठवणे शक्य नसल्यास गोठ्यालगत मोकळे आवार राखून ठेवतात. गुरांना फक्त धारेच्या वेळी बांधतात आणि एरवी मोकळेपणाने फिरू देतात. अशा वेळी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करतात. गोठा स्वच्छ करण्यास अडचण होणार नाही अशा प्रकारचे साहित्य गोठा बांधताना वापरतात. उपलब्ध कुरणाची योग्य काळजी घेतल्यास वर्षभर चराईची सोय होऊ शकते. कुरणाचे भाग पाडून आळीपाळीने ते वापरात आणतात. म्हणजे एका भागातील गवत उपयोगात येत असताना आधी वापरलेल्या भागात ते वाढत राहते.
(५) रोगनिवारण : जनावरांच्या बहुतेक महत्त्वाच्या साथीच्या रोगांवर परिणामकारक लसी उपलब्ध आहेत. भारतातील बहुतेक सर्व राज्यांत पशुसंवर्धन खात्यामार्फत अशा लसी फुकट टोचल्या जातात. जनावरांच्या नैमित्तिक रोगराईवर उपाय करण्यासाठी जनावरांचे दवाखाने वा प्रथमोपचार केंद्रे ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. कुठल्याही खेडेगावातील जनावरांना दहा किमी. अंतराच्या आत प्रथमोपचार केंद्र तरी उपलब्ध व्हावे या दृष्टीने त्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत
गायींना होणारे जवळजवळ सर्व संसर्गजन्य रोग बैल, म्हशी आणि रेडे ह्या जनावरांत दिसून येतात. ह्या रोगांत विषाणुजन्य (व्हायरसजन्य), जंतुजन्य, प्रजीवजन्य (एकाच पेशीच्या बनलेल्या जीवांपासून होणाऱ्या), कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणाऱ्या) आणि कृमिजन्य रोगांचा समावेश होतो. रोगलक्षणे, चिकित्सा व प्रतिबंधक उपाय यांचा संक्षिप्त उल्लेखच ह्या ठिकाणी केला आहे. तसेच भारतात आढळणाऱ्या रोगांना विशेष प्राधान्य दिले आहे.
गाईच्या देवी : जरी या रोगास गाईच्या देवी असे नाव असले, तरी हा रोग होणाऱ्या विषाणूमुळेच बैलांनाही रोग होतो. घोडे, बकऱ्यात, मेंढ्या, म्हशी, कोंबड्या आणि मानव या सर्वांत आढळणाऱ्या देवीचा रोगाचा उगम गाईच्या देवी ह्या रोगामध्येच आहे असे मानतात. गाईच्या देवीच्या रोगविषाणूंनी त्या त्या प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश मिळविल्यावर त्या प्राण्यांच्या प्रकृतिधर्माच्या अनुषंगाने विषाणूंच्या कार्यात थोडासा बदल झाला व विषाणूंची त्या त्या प्राण्यात रोग उत्पन्न करणारी उपजाती निर्माण झाली. अशा रीतीने विविध प्राण्यांच्या देवी रोगांतील विषाणूंच्या भिन्न उपजाती निर्माण झाल्या. प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या संदर्भात ह्या उपजातीतील प्रतिजनेही (ज्या पदार्थाचा शरीरात प्रवेश झाला असताना प्रतिरोधक पदार्थ, म्हणजे प्रतिपिंडे, तयार होतात तेही) भिन्न आहेत. देवीच्या विषाणूंचा उपकलेवर (शरीराच्या बाह्य व अंतर्भागातील पृष्ठभागांच्या आवरणांवर) परिणाम होऊन त्वचेवर फोड (देवी) येतात. त्याच्या प्रारूपिक (नमुनेदार) विकार अवस्था निश्चित स्वरूपाच्या दिसतात. रोगाचा परिपाक काल (विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर रोगलक्षणे दिसेपर्यंतचा काळ) ३ ते ५ दिवस असतो. देवीच्या फोडाच्या प्रथमावस्थेत त्वचेवर लाली आलेले ठिपके दिसू लागतात, तेव्हा रक्तिमा-अवस्था म्हणतात. लाली आलेल्या भागाच्या मध्यभागी टाचणीच्या टोकाएवढी पुटकुळी आल्यासारखी दिसते (पीटिका-अवस्था). त्यानंतर सात आठ दिवसांत त्यात लस जमत जाते व बारीकसा फोड तयार होतो (पुटिका-अवस्था). नंतर फोडातील लस पू झाल्याप्रमाणे दाट बनत जाते. ह्यावेळी फोडावरील त्वचा नाजूक होत जाते (पूयिका-अवस्था). यानंतरच्या शेवटच्या अवस्थेत पूयिका फुटून त्यातील दाट द्रव सुकून पिवळट गुलाबी खपली तयार होते (खपली-अवस्था). प्रथमावस्थेनंतर साधारण तीन आठवड्यांनी खपली पडते. ह्या खपल्यांमध्ये रोगकारक विषाणू वर्षभरसुद्धा जिवंत राहू शकतात. गाईच्या देवी सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाच्या असतात. बैलांना क्वचितच येतात. गाईच्या देवीचे फोड बहुधा कास व स्तनाग्रांवर येतात. मांड्यांच्या आतील बाजूस जांघेमध्ये व ओठावरही केव्हा केव्हा फोड दिसतात. वासरांच्या ओठावर व नाकावर येतात तर वळूत मुष्कावर (वृषण, म्हणजे प्रतोत्पादक ग्रंथी, ज्यात असतात त्या पिशवीवर) फोड येतात. कासेवरील फोड गोलाकार तर स्तनाग्रांवरील लांबोळे असतात. दूध काढतेवेळी निरनिराळ्या अवस्थांत असलेले फोड फुटून त्यांतील लसीतील विषाणूंमुळे दूध काढणाऱ्याच्या हातावर आणि त्याच्याद्वारे एका गाईपासून दुसरीला देवी येतात. देवीचे फोड आलेला भाग जंतुनाशक औषधांच्या विद्रावाने स्वच्छ धुवून त्यावर प्रतिजैव (अँटिबायॉटिक) मलम लावतात. प्रतिबंधक उपाय म्हणून दूध काढणाऱ्यांचे हात जंतुनाशक विद्रावाने दूध काढण्याआधी व नंतर धुण्याचा परिपाठ ठेवतात. देवी आलेल्या गाईचे दूध शक्य तर नष्ट करतात किंवा उकळून वासरांना वा डुकरांना पाजतात, पण लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत देत नाहीत. प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. जेन्नर ह्या शास्त्रज्ञांनी गाईच्या देवीच्या फोडातील लस उपयोगात आणून ती माणसाला टोचली असता माणसांना देवी येत नाहीत हे दाखवून दिले.
जंतुजन्य रोग : चिरकारी अतिसार : (जोन्स रोग). ह्या रोगाने पछाडलेल्या जनावरांना कित्येक दिवस मधून मधून जुलाब होत राहतात व जनावर दिवसेंदिवस खंगत जाऊन मृत्यू येतो. मायक्रोबॅक्टिरियम पॅराटयुबरक्युलोसीस जंतूमुळे हा रोग होतो. क्षयाच्या जंतूशी ह्या जंतूचे बरेच साम्य आहे. जनावरे आजारी होण्याआधी कित्येक दिवस रोगजंतू आतड्यात आणि तेथील लसीका ग्रंथीमध्ये (ऊतकातून रक्तमध्ये जाणारा आणि रक्ताशी साम्य असणारा पदार्थ म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील ग्रंथीसद्दश पुंजक्यांमध्ये) वास करतात. रोग परिपाक काल सहा महिने ते एक वर्ष आहे. आजारी जनावरांच्या शेणातून रोगजंतू बाहेर पडतात. अशी जनावरे कुरणात चरावयास गेल्यावर तेथील चारा दूषित होतो व त्याच्या सेवनाने इतर जनावरे आजारी होतात. रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे पोटात कळ आल्याचे चिन्ह न जिसता जुलाब होणे. शेण पातळ व दुर्गंधीयुक्त असते आणि त्यात हवेचे बुडबुडे दिसतात. जनावरे काही दिवस चारा खात नाहीत, तर कधीकधी अधाशीपणाने खातात. एखाद्या अंशानं ताप वर खाली होत असतो. म्हणजेच बारीक ताप येत राहतो. खंगण्यामुळे हाडे उठावदारपणे दिसतात. अशा स्थितीत जनावर खाली बसते व उठण्याचा प्रयत्न करूनही न उठता तसेच पडून राहते आणि मृत्यू येतो. गाभण जनावरे व्याल्यानंतर एकदमच आजारतात व थोड्या आठवड्यांतच मृत्यू पावतात. गुदांत्रातील (आतड्याच्या शेवटच्या भागातील) सुक्ष्मदर्शकाने तपासल्यास त्यात रोगजंतू सापडतात. औषधोपचार उपयोगी पडत नाही. ज्या शेतवाडीवर रोगाचा प्रादुर्भाव होतो तेथील गुरांची ‘जोनीन’ नावाचे प्रतिजन टोचून चाचणी करतात आणि पछाडलेली जनावरे मारून टाकतात. हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स इ. देशांत प्रतिबंधक लस टोचतात. लस प्रायोगिक अवस्थेत आहे पण उपयुक्त आहे असे दिसते.
सांसर्गिक नेत्रश्लेष्मशोथ : (डोळ्यातील अस्तरत्वचेची स्रावयुक्त सूज). हीमोफायलस बोव्हिस नावाच्या जंतूमुळे तीव्र स्वरूपात होणारा सांसर्गिक नेत्रशोथ. नेत्रश्लेष्म (डोळ्यातील अस्तरत्वचा) व स्वच्छमंडल (बुबुळाच्या पुढील बाजूस असलेला पारदर्शक भाग) यांचा शोथ हे मुख्य लक्षण असते. अमेरिका, आफ्रिका व भारत या भागांत हा रोग आढळला आहे. उन्हाळ्यात ज्यावेळी हवेत धूळ उडते अशा दिवसांत रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होते. हीमोफायलस बोव्हिस ह्या जंतूशिवाय आणखी इतर जंतूंचा हा रोगात दुय्यम प्रतीचा संबंध असावा असे दिसून आले आहे. त्यात कॉरिनिबॅक्टिरियम पायोजेनीस या जंतूचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. जनावराला उजेडाकडे पाहता येत नाही. पापण्या सुजतात व दुखऱ्या बनतात. डोळ्यांवाटे पाणी वाहते व पुढे पुवासारखा स्राव वाहतो. स्वच्छमंडळ अपारदर्शक होते, त्यावर व्रण होतो व कधीकधी भोक पडते आणि दृष्टीही जाते. काळजी घेऊनसुद्धा ५० ते ६० प्रतिशत जनावरांमध्ये रोगाची लागण होते. अंधाऱ्या जागी गुरे बांधली असता व सल्फाथायोझॉल मलम लावले असताना रोग लवकर बरा होतो.
ॲक्टिनोबॅसिलोसीस : ॲक्टिनोबॅसिलस लिग्नेरसी नावाच्या जंतूमुळे होणारा सांसर्गिक रोग. रोगाची लक्षणे ⇨ किरणकवक रोगाशी बरीच मिळतीजुळती आहेत. प्रायः जखमांतून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात व पुढे लसीका ग्रंथीपर्यंत पोहोचतात. घशाजवळील लसीका ग्रंथींना सूज येते, पुढे त्यांत पू होतो व गिळण्याला त्रास होतो. जिभेपर्यंत संसर्ग पोहोचला तर जिभेला सूज येते. चर्वितचर्वणाला अडथळा येतो आणि जीभ अर्धवट बाहेर लोंबकळती राहून लाळ गळत राहते. जिभेमध्ये टणक गाठी तयार होतात.
कवकजन्य रोग : कासेची सांसर्गिक सूज : (सांसर्गिक स्तनशोथ). हा पुष्कळ दूध देणाऱ्या अस्सल जातीच्या गाई-म्हशींना होणारा महत्त्वाचा सांसर्गिक रोग आहे [→ स्तनशोथ].
ॲक्टिनोमायकोसीस : ॲक्टिनोमायसी बोव्हिस नावाच्या कवकामुळे जनावरांना होणारा सांसर्गिक रोग आहे [→ किरणकवक रोग].
रोगाला कारणीभूत असणाऱ्या गोचिडीचे वास्तव्य काही चराऊ कुरणांत कायमचे असते. पावसाळा व हिवाळा ह्या ऋतूंमध्ये गोचिड्या झाडाझुडपांच्या सांदीफटीतून तग धरून राहतात व उन्हाळ्यात त्यांची झपाट्याने वाढ होते. अशा कुरणात नेहमी चरणाऱ्या जनावरांना थोडीफार प्रतिकारशक्ती आल्यामुळे त्यांना तीव्र स्वरूपाचा रोग होत नाही. नवीन आलेल्या जनावरांना मात्र तीव्र स्वरूपात आजार होतो. अशा जनावरांना ४०° ते ४१° से. ताप येतो, ती मलूल होतात, कळपातून लांब उभी राहातात, दात खातात, प्रथम मलावरोध व नंतर अतिसार अशी लक्षणे आढळतात. चालताना अडखळतात, खाली पडतात. श्वासोच्छ्वास जलद व कष्टमय असतो. एक दोन दिवसांत तापाशिवाय बाकीची लक्षणे थोडीथोडी कमी होतात पण मूत्र मात्र काळपट लाल कॉफीच्या रंगाचे असते. तीव्र स्वरूपात रोग झाल्यास पाचसहा दिवसांत जनावरे दगावतात. सौम्य प्रमाणात रोग झाल्यास ती मलूल दिसतात व त्यांना रक्तक्षय झाल्याचे स्पष्ट दिसते. सर्व साधारणपणे दोनतीन आठवड्यांत ती बरी होतात. लहान वयाच्या जनावरांपेक्षा पंधरा महिन्यांवरील जनावरांना हा रोग जास्त प्रमाणात होतो. बऱ्या झालेल्या जनावरांच्या रक्तात रोगकारक प्रजीव कायमचे असतात. रोगी जनावरांना इतर जनावरांपासून बाजूस काढून त्यांस उत्तेजक व पौष्टिक औषधे देतात. ट्रिपॅन ब्ल्यू हे औषध शिरेतून टाेचतात. त्याचप्रमाणे सोमल (आर्सेनिक), निओसालव्हरसान व सल्फाथायोझॉल ही औषधेही टाेचतात. या औषधांचा परिणामकारकपणे उपयोग होतो. रोग गोचिड्यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे त्यांचा नाश करणे हाच एक प्रतिबंधक उपाय परिणामकारक ठरतो. आजारी जनावरांच्या अंगावरील गोचिड्या काढून जाळून टाकतात. बऱ्याच जनावरांच्या अंगावर गोचिडी दिसल्यास एका विशिष्ट तऱ्हेने बांधण्यात आलेल्या हौदात गौचिडनाशक औषधांचा विद्राव तयार करतात व त्या विद्रावातून अशा जनावरांना जावयास लावतात म्हणजे त्यांना अनायासे आंघोळ घडते व अंगावरील सर्व गोचिड्याही मरतात. यूरोप व अमेरिका येथून भारतात आणलेली जनावरे ह्या रोगाला जास्त ग्रहणशील आहेत.
कृमिजन्य रोग :पर्णकृमिजन्य : (फॅसिओलामुळे होणारे). पर्णकृमीमुळे जनावरांना होणारे रोग घातक असतात. ह्यांतील यकृतपर्ण कृमी चपटे व पर्णाकृती असतात आणि ते जनावरांच्या यकृत व पित्तवाहिनीमध्ये राहतात. यकृत-पर्णकृमी भारताप्रमाणेच सर्व देशात आढळतात. भारतात फॅसिओला हेपॅटिका व फॅसिओला जायगँटिक ह्या कृमींमुळे विकार होतात. लिम्निेया ॲक्युमिनेटा ही गोगलगाय मध्यस्थ पोषक (कृमीच्या मध्यंतरीच्या अवस्थांचे पोषण करणारी) आहे. यकृत-पर्णकृमीमुळे पित्तवाहिन्यांचा क्षोभ होतो व त्या जाड होतात. त्याचप्रमाणे यकृताचा क्षोभ होऊन त्याचे सूत्रण (तंतुमय ऊतकाची वाढ) व अपक्षय (ऱ्हास) होतो. काही अप्रौढ कृमींमुळे यकृतामध्ये रक्तस्राव होतो. यकृत-ऊतकाची क्रियाशक्ती नष्ट होते. चारा कमी खाणे, रवंथ कमी करणे, गळ्याखाली व पोटाखाली शाेफ (द्रवयुक्त सूज), अतिसार, रक्तक्षय झाल्यामुळे कातडी व श्लेश्मकला फिकट दिसू लागणे व मारक पांडुरोग (ॲनिमिया) ही सर्वसाधारण लक्षणे दिसतात. रोगाच्या प्राथमिक अवस्थेत जेव्हा पर्णकृमी यकृतामध्ये शिरतात तेव्हा यकृत उत्तेजित होते व भूक वाढते. त्यामुळे जनावरांची प्रकृती सुधारल्यासारखी वाटते. रोग बळावल्यावर यकृत काम करेनासे होते व मृत्यू येतो. कार्बन टेट्राक्लोराइड हे औषध चांगले परिणामकारी आहे असे आढळून आले आहे. ते दुधातून अगर मॅग्नेशियम सल्फेटाच्या विद्रावामधून देतात. तेलातून देत नाहीत. हेक्झॅक्लोरेथीन हेही ह्या रोगावर परिणामकारी औषध आहे. पाणथळ जमिनीतील गवताच्या पानावर ह्या कृमींच्या जीवनचक्रातील संसर्गी अवस्था राहते. म्हणून अशा ठिकाणी जनावरांना चरायला व पाणी पिण्यास सोडत नाहीत. ज्या तळ्यामध्ये मध्यस्थ पोषक गोगलगाई आहेत अशा तळ्यावर पाणी पाजण्यास जनावरांना नेत नाहीत. याशिवाय गोगलगाईंचा नाश करण्यासाठी दूषित तळी व कुरणे मोरचुदाच्या योग्य प्रमाणातील विद्रावाने फवारतात.
खंडितकायी कृमिजन्य : (शिस्टोसोमा कृमिजन्य). शिस्टोसोमा नेझॅलीस या खंडितकायी कृमीमुळे जनावरांत ‘नाकातील मांसल फोड’ नावाचा रोग होतो. गाई-बैलांना हा रोग जास्त प्रमाणात होतो. हे कृमी गाई-बैलांच्या नाकाच्या श्लेष्मकलेच्या शिरांमध्ये राहतात व तिथेच अंडी घालतात. अंडी ऊतकांना भोके पाडीत नासिकास्रावातून बाहेर पडतात. इंडोप्लेनोर्बिस एक्झॉस्टस व आणखी काही गोगलगाई ह्या कृमींच्या मध्यस्थ पोषक आहेत. गोगलगाईतील विशिष्ट अवस्थांची वाढ पूर्ण झाल्यावर त्या संसर्गी अवस्थेमध्ये तळ्याच्या पाण्यात तरंगत राहातात व जनावरे पाणी पिण्यास आल्यावर त्याच्या पोटात किंवा पाय पाण्यात असल्यास कातडीला भोक पाडून शरीरात प्रवेश मिळवितात. नाकातील श्लेष्मकलेचा क्षोभ होतो व त्यामुळे कणार्बुदीय (कणात्मक ऊतकाच्या गाठीची) वाढ होत राहते. ही वाढ बरीच झाली म्हणजे श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये अडथळा उत्पन्न होतो आणि घोरल्यासारखा आवाज होतो. नाकातून रक्तमिश्रित स्राव येत राहतो. पूर्व व दक्षिण भारतात हा रोग मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हशींमध्ये हा रोग फारसा आढळलेला नाही. परंतु काही वेळा त्यांच्या नाकातील स्रावात कृमीची अंडी सापडतात. अँटिमोसान हे परिणामकारक औषध शिरेतून टोचतात. कृमीची संसर्गी अवस्था पाण्यावर चोवीस तासच तरंगत जिवंत राहू शकते. त्यामुळे ४८ तास साठविलेले पाणी जनावरांना पाजले तर होग होत नाही. गोगलागाईचा नाश केल्याने रोगाचा प्रतिबंध होऊ शकतो.
गोलकृमिजन्य : या कृमींच्या बहुतेक जातींत व उपजातींमध्ये माद्या पोषकाच्या शरीरात असंख्य अंडी घालतात व तेथे त्यांची पूर्ण वाढ होते. ह्या कृमींच्या अनेक जाती व उपजातींमुळे जनावरांत रोग होतात. त्या जनावराच्या पोटाच्या चौथ्या भागात, काही लहान आंत्रात तर काही मोठ्या आंत्रात राहतात. सर्व जाती रक्तपिपासू आहेत व ज्या ठिकाणी असतात तेथील रक्त शोषतात. बऱ्याच जाती पचन तंत्राच्या कोणत्या ना कोणत्या भागात राहत असल्यामुळे पचनात बिघाड उत्पन्न होतो. अतिसार, बद्धकोष्ठ, खालच्या जबड्याखाली सूज, पोटाखाली सूज इ. रोगलक्षणे दिसतात. जनावरे हळूहळू कृष होत जातात व उपचार केले नाहीत तर मृत्यू ओढवतो. कृमींच्या काही जातींमुळे कातड्याखाली बारीक फोड येतात. मोरचूद व फिनोथायाझीन कृमिबीज तेल (चिनोपोडियम तेल) ही गुणकारी औषधे आहेत असे आढळून आले आहे.
पट्टकृमिजन्य : (चपट्या कृमीमुळे होणारे). या कृमीचे जीवनचक्र पाहता ते पुरे करण्यासाठी एक किंवा दोन मध्यस्थ पोषक असतात. जनावरांत एकिनोकॉकस नावाची द्रवार्बुदे (पाण्यासारखा पदार्थ असलेल्या त्वचेच्या पिशव्या) आढळतात. ही द्रवार्बुदे म्हणजे मोठ्या पिशवीत अनेक लहान पिशव्या व प्रत्येक पिशवीत भावी होणाऱ्या पट्टकृमीची अनेक डोकी असतात. जनावरांत पट्टकृमीपासून फारच थोडे व किरकोळ रोग होतात. तंबाखू व मोरचूद ही औषधे वापरतात व ती गुणकारी आहेत असे आढळून आले आहे [→ पट्टकृमि].
कीटक व अष्टपाद : अनेक प्रकारच्या कीटकांमुळे जनावरांच्या स्वास्थ्याला हानी पोहोचते. यात गोचिड्या, तांबवा, माश्या व इतर कीटकांचा समावेश होतो. या कीटकांच्या त्रासामुळे गुरे अस्वस्थ होतात व त्यांच्या खाण्यावर परिणाम होऊन ती तगडी राहत नाहीत. यांतील काही कीटक विषाणू, जंतू, प्रजीव, कृमी यांमुळे होणाऱ्या रोगांचा प्रसार करणारे आहेत. कीटकांच्या चाव्यामुळे कातड्यांना भोके पडतात व अशी कातडी योग्य किंमतीस विकली न गेल्याने आर्थिक नुकसान होते. कीटकांचा नाश करण्यासाठी डीडीटी सारखी कीटकनाशक औषधे विविध स्वरूपांत वापरतात [→ गोचीड गोमाशी माइट].
इतर विकार : जनावरांमध्ये नैमित्तिक असे पुष्कळ आजार उद्भवतात. त्यांतील काहींमुळे मृत्यू ओढवतो तर काहींमुळे उपयुक्तता कमी होते. त्यात दूध कमी होणे, गाडी वा नांगर ओढण्याची शक्ती कमी होणे इ. परिणाम घडतात. त्यातील महत्त्वाच्या विकारांचा खाली निर्देश केला आहे.
पोटफुगी : जनावरांच्या रोमंथिकेत (पोटाच्या चार कप्प्यांपैकी ज्यात रवंथ करण्याची क्रिया होते त्यात म्हणजे पहिल्या कप्प्यात) वायू साठून ती फुगते व बाहेरून पोटाचा फुगीरपणा दिसतो. तीवर हाताच्या बोटांनी थापडले असता नगाऱ्यासारखा आवाज येतो. सर्व ऋतूंत व सर्व वयाच्या जनावरांना हा रोग होऊ शकतो. पण विशेषतः पावसाळ्यात ओले कोवळे गवत आधाशीपणाने खाण्यामुळे पुष्कळ जनावरे आजारतात.
आधाशीपणाने भराभर चारा वैरण जास्त प्रमाणात खाणे, खाल्ल्यानंतर रवंथ करण्याला विश्रांती न देता कामास जुंपले जाणे या कारणांनी अन्नाचे नीट पचन होत नाही व ते पोटात कुजून त्यापासून जास्त प्रमाणात वायू उत्पन्न होतो व त्यामुळे पोट फुगते. कुजलेला चारा आणि अंबोण खाण्यामुळे तसेच अतिथंडगार पाणी पिण्यामुळेही हा आजार संभवतो. आजारलेले जनावर चारा खाणे, रवंथ करणे बंद करते. दूध देत नाही. डाव्या बाजूची कूस फुगलेली दिसते, श्वासोच्छ्वास जलद होऊ लागतो, उठबैस करते, कण्हते, दात करकर वाजवते, पाय पसरून पडते, मागचे पाय झाडते व वरचेवर थोडे थोडे मलमूत्र विसर्जन करते. कधीकधी नाकावाटे चारा बाहेर येतो. उपचार म्हणून गोड्या तेलात टर्पेंटाइन तेल योग्य प्रमाणात घालून पाजतात. कार्बॉकॉल किंवा ॲड्रेनॅलीन टोचतात.
नाळीचा रोग : (सांध्याचा रोग). वासरू जन्मल्यावर नाळ कापतात. ती कापल्यानंतर जखम आठवडाभरात बरी होते. परंतु काही वेळा ती बरी न होता आजूबाजूच्या घाणीमुळे जखमेत सूक्ष्मजंतू शिरतात आणि परिणामी जंतुरक्तता (रक्तात मोठ्या प्रमाणात जंतूंचे अतिक्रमण होणे) होते. जंतूंपैकी एका अगर अनेक जातींचे जंतू रोगकारक म्हणून आढळले आहेत. एश्चेरिकिया कोलाय व कॉरिनिबॅक्टिरियम पायोजेनीस हे नेहमी आढळणारे जंतू आहेत. नाळ कापलेल्या जागी रोगजंतूंमुळे सूज येते, पू होतो व जंतू रक्तावाटे शरीरात सर्वत्र पोहोचतात. अस्थींच्या सांध्यांत पोहोचले म्हणजे सांधे सुजतात, गरम लागतात व दुखतात. म्हणून या रोगास सांध्याचा रोग असेही नाव आहे. चिरकारी स्वरूपाच्या आजारात परिहृदशोथ (हृदयावरील आवरणाची सूज), परिफुप्फुसशोथ इ. आजार उद्भवतात. वासरू कृश होत जाते व शेवटी मरते. रोग झालेल्यांपैकी साठ ते सत्तर टक्के वासरे मरतात. नाळेच्या टोकावरील विद्रधी (गळू) चाकूने कापून जंतुनाशक औषधाच्या विद्रावाने धुवून त्यावर सल्फानामाइड औषधे लावतात. जरूरीप्रमाणे प्रतिजैव औषधेही वापरतात.
अपरा (वार) अडकणे : प्रसूतीमध्ये वासरू नैसर्गिक रीत्या गर्भाशयाबाहेर पडते त्याचप्रमाणे त्याच्या शरीराभोवतीची वेष्टने किंवा वार बाहेर पडलीच पाहिजे कारण तो प्रसूतीचाच एक भाग आहे. परंतु काही वेळा वार गर्भाशयातच अडकून राहते, त्यास वार अडकणे असे म्हणतात. निरनिराळ्या जनावरांत वारेचा आकार आणि तिचे गर्भाशयाला चिकटणे (आसंजन) यांत विविधता आढळते. गाई-म्हशींच्या गर्भाशयात वार पुष्कळ ठिकाणी चिकटलेली असल्यामुळे प्रसूतीनंतर साधारणपणे सहा तासांत बाहेर पडते, परंतु ती तशी बाहेर न पडली तर विकार झाला असे समजतात. वार गर्भाशयात जास्त वेळ राहिली तर ती सडते. तीत पू होतो व पूयरक्तता (पू उत्पन्न करणारे जंतू रक्तात मोठ्या प्रमाणात आल्याने शरीरात ठिकठिकाणी गळवे होणे) हा रोग होतो. वार अडकण्याची कारणे बहुधा कष्टप्रसूती, आनुवंशिकता अगर गाभण असताना निःसत्त्व आहार असणे, गर्भशयाची आकुंचन व प्रसरण पावण्याची शिथिलता ही असतात. अडकलेली वार सडण्यामुळे गर्भाशयाचा शोथ होतो आणि गाय कुंथून ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते, सडलेले तुकडे बाहेर पडताना दिसतात व सडण्याची घाणही येते. अडकलेली वार घाईने ओढून काढीत नाहीत. अरगट वा स्टिल्बेस्ट्रॉल टोचून शक्य तर योनिमार्गात हात न घालता वार पाडण्याचा प्रयत्न करतात. हे साधले नाही तर योनिमार्गात हात घालून वार कौशल्याने सर्व आसंजने सोडवून बाहेर काढतात. वार काढून टाकल्यावर विविध प्रतिजैवांच्या गोळ्या गर्भाशयात बसवितात त्यामुळे जंतूंचा नाश होऊन पूयरक्तता, जंतुरक्तता इ. विकार होत नाहीत.
शेपटीचा कोथ : (शेपटीचा भिरूड). [शरीरातील विवक्षित भागाच्या रक्त पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे होणारा त्या भागाचा मृत्यू, → कोथ]. या विकारात जनावराचे शेपूट टोकापासून वाळत जाते व शेवटी गळून पडते. दाटीदाटीने बांधलेल्या जनावरांत एका जनावराचा पाय जवळ बसलेल्या जनावराच्या शेपटीवर पडतो. टणक खुराने शेपटी चिरडते व शेपटीच्या कातडीस जखम होते व आतील रोहिण्या, शिरा, हाडे व तंत्रिका तंतू (मज्जातंतू) यांना अपाय होतो. त्यामुळे दुखावलेल्या भागातील रक्तप्रवाह व संवेदना बंद होऊन त्याखालील भाग निर्जीव होऊन वाळू लागतो. जनावर जलद चालावे म्हणून शेपटी पिरगळण्यामुळेही असाच परिणाम घडतो. निर्जीव भाग लाकडासारखा टणक लागतो. वाळलेल्या व संवेदना नसलेल्या भागाच्या थोड्या वरच्या बाजूस शेपटी कापून टाकतात. शेपटी कापण्याची शल्यक्रिया विशिष्ट तंत्र वापरून करतात व जखम बरी होईपर्यंत औषधोपचार चालू ठेवतात.
शिंगे भिरडणे : प्रामुख्याने गाई-बैलांच्या शिंगांना होणारा चिरकारी रोग. म्हशींच्या शिंगांना क्वचित होतो. शिंग बहुधा शिंगाच्या बुडाशी अगर मध्यावर मऊ होऊन वाकते व गळून पडते. गळल्यामुळे झालेल्या जखमेतून दुर्गंधीयुक्त रक्तमिश्रित घट्ट मांसल स्राव येतो. काही वेळा ललाटीय कोटरापर्यंत रोग पोहोचला, तर हा स्राव नाकावाटेही येतो. जनावर बेचैन होते. उपचार चालू असताना सुद्धा जखम बरी न होता त्याठिकाणी वरचेवर फुलकोबीसारखे दिसणारे मांस वाढते यामुळे ह्या विकाराला शिंगाचा कर्करोग असे म्हटले जाते. जाड, मोठी व वजनदार शिंगे असणाऱ्या भारतातील कांक्रेज जातीच्या जनावरांत हा रोग पुष्कळ प्रमाणात आढळतो. शिंगावर काठीने मारल्याने वा गुरांच्या टकरीत शिंग दुखावले असताना हा विकार होतो. शिंगाच्या वरील टणक आवरणावर काही अपाय झाल्याचे दिसत नाही परंतु मुक्या मारामुळे शिंगातील गाभ्यात सूज येते. ती वाढून आतील भाग पिकून नासतो व हळूहळू सूज बाहेरच्या भागापर्यंत येऊन शिंग मऊ होते, वाकते व गळून पडते. मागील पायाने दुखावलेल्या शिंगाच्या बुडाशी मारणे, गव्हाणीच्या काठावर शिंग आपटणे, चालताना दुखावलेल्या शिंगाच्या बाजूला डोके खाली वळवून चालणे इ. लक्षणे दिसतात. लक्षणे दिसू लागताच शिंग बुडापाशी कापून सडलेला भाग काढून टाकून जखम कार्बॉलिक अम्ल आणि फॉर्मॅलीन यांच्या मिश्रणाने धुतात व जखम सुकण्यासाठी औषधे लावतात. शिंग मुळापर्यंत नासले, तर मात्र त्यावर काही उपाय लागू पडत नाही.
खूरखूत : खुराच्या दोन गेळ्यांमधील व मागील मांसल भागास सूज येऊन होणारा विकार. सूज वाढत जाऊन फुटते आणि त्यातून पू येतो. बेचक्यातील मांस सडून जखम मोठी होते, दुखरी होते व जनावरे लंगडू लागतात. कडाक्याच्या थंडीत गार पाण्यातून अगर चिखलातून चालण्याने गेळ्यामधील कातडीस अपाय होतो. त्यातच काटा अगर अणकुचीदार खडा रुतल्यामुळे सूज येते व जखम होते. जखमेत ॲक्टिनोमायसीज नेक्रोफोरस कवके शिरतात व त्यामुळे जखम चिघळत राहते. मागील पाय मलमूत्रामुळे घाण होतात म्हणून मागील पायांत हा विकार जास्त प्रमाणात आढळतो. जनावरे लंगडतात, पायात काही रुतले आहे असे वाटून वरचेवर पाय झाडतात. तसेच गेळ्याचा भाग वरचेवर चाटतात. गेळ्यातील जखमा जंतुनाशक औषधाच्या विद्रावाने स्वच्छ करतात, सडलेला मांसल भाग कापून जखम बांधून ठेवतात व जखम कोरडी झाल्यावर त्यावर डांबर लावतात.
आघातजन्य परिहृदयशोथ : काही संसर्गजन्य रोगांत परिहृदयशोथ होतो त्यावेळी जंतू अगर विषाणू हे कारणीभूत असतात. जनावरांमध्ये परिहृदयास जखम झाल्यामुळेही हा रोग होतो. गाई-म्हशींच्या वैरणीबरोबर एखादी तीक्ष्ण वस्तू पोटात जाते. तेथून जालिकेत (पोटाच्या दुसऱ्या कप्प्यात) व पुढे मध्यपटलात (पोट व छाती यांना अलग करणाऱ्या पटलात) घुसून हृदयावरील आवरणास दुखापत करते. याप्रमाणे तीक्ष्ण वस्तूच्या मार्गक्रमणातील सर्व भागास अपाय होऊन सूज येते, इतकेच नव्हे तर जनावराची प्लीहा व यकृत यांनाही इजा पोहोचते. या रोगाने दरवर्षी अनेक जनावरे दगावतात. जनावरे चारा-वैरण प्रथम अर्धवट चावून गिळतात आणि नंतर रवंथ करतात. अधाशीपणाने खाताना चाऱ्याबरोबर पत्र्याचे तुकडे, सुया, तीक्ष्ण तारेचे तुकडे, स्त्रियांचे केसांतील आकडे, कातड्याचे तुकडे, वाटोळे खडे असे अनेक पदार्थ त्यांच्या पोटात जातात. त्यांतील सुया, तीक्ष्ण खिळे व तारेचे तुकडे अशा स्वरूपाचे तीक्ष्ण पदार्थ आजाराने मेलेल्या गुरांच्या फुप्फुसात व हृदयात सापडतात. रोगी जनावरे चारा खात नाहीत, सुस्त होतात, त्यांचे पोट फुगते, एका जागी सतत उभी राहतात, वरचेवर खोकतात व थोड्याशा श्रमामुळेही धापा टाकू लागतात. परिहृदयाला अपाय झाला म्हणजे जनावर लवकरच मरण पावते. गळ्याखाली, छातीवर, गळपोळ्यावर पोकळ सूज दिसते. तीक्ष्ण पदार्थांची दिशा बदलल्यास उजव्या बाजूच्या बरगडीत कोपरामागे सूज येऊन ती फुटून त्यातील पुवाबरोबर तो तीक्ष्ण पदार्थ बाहेर निघू शकतो. प्रभावी लोहचुंबकाच्या साहाय्याने रोगनिदान झाल्यावर शल्यक्रिया करून तीक्ष्ण पदार्थ बाहेर काढतात. ह्या रोगावरील शल्यक्रिया करण्याचे तंत्र आता सुधारले आहे. चारा-वैरण तपासून देणे हाच यावरील प्रतिबंधक उपाय होय.
ग्रसिकेत अटकाव : या विकारात ग्रसिकेत (घशापासून पोटापर्यंतच्या अन्ननलिकेच्या भागात) अडथळा निर्माण झाल्यामुळे ती बंद होते व जनावराला खाद्य खाणे दुरपास्त होते. गाई-म्हशी रवंथ करणारी जनावरे असल्यामुळे त्यांच्यात स्वभावतः मोठा घास न चावता घेण्याची प्रवृत्ती असते. जनावरातील ग्रसिका घशाकडील भागात अरुंद असते म्हणून त्या भागात अटकाव होतो. आहारातील गाजरे, इतर कंद, बटाटे, आंब्याच्या कोयी, कमी भिजविलेला भुसा, कोंडा हे पदार्थ भराभर खाण्याने ग्रसिकेत गच्च बसतात. लाळेमुळे फुगून अटकाव पक्का होतो. या अटकावामुळे ग्रसिका अर्धवट वा पूर्ण बंद होते. ग्रसिकेच्या स्नायूंचे आकुंचन-प्रसरण वेगाने चालू होते व अटकाव करणारा पदार्थ तीक्ष्ण असेल, तर ग्रसिकेस जखम होते व जनावराला वेदना होतात. जनावर खाणे बंद करून मान खाली वाकवून डोके वर उंच करून अडकलेला पदार्थ बाहेर फेकण्याची पराकाष्ठा करते. तोंडातून लाळ गळत राहते. पुष्कळ वेळा अटकाव दोन तीन तासांत नाहीसा होतो. कधीकधी ग्रसिकेवर सूज वाढत जाते व तीत विषारी पदार्थ किंवा वायू निर्माण होतात व विषरक्तता होऊन (रक्तात विष भिनून) गुरे मरतात. गाई-म्हशींमध्ये ग्रसिकेतील अटकाव हा बहुधा तीव्र स्वरूपाचा आजार असतो. ग्रसिका बंद झाल्याने रोमंथिकेत वायू कोंडून राहतात व ती फुगते. शिवाय अन्नाची घुसळण करणारे स्नायू निष्क्रिय बनतात व त्यामुळे अन्न सडत जाते व वायू शीघ्रगतीने तयार होतात. अटकाव वर सरकवून, निरनिराळ्या युक्त्या योजून, हातांनी वा चिमट्यांनीच काढावा लागतो.
मूत्राश्मरी : (मुतखडा). मूत्रमार्गामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेटे व फॉस्फेट ही साचण्यामुळे जनावरांच्या मूत्रमार्गामध्ये मूत्राश्मरी तयार होतात. ह्यामुळे कधीकधी मूत्रनलिका मार्ग पूर्णपणे बंद होतो व पर्यायाने मूत्राशयामध्ये मूत्र साठत राहते. शल्यकर्म करून मूत्राश्मरी बाहेर काढावा लागतो. जनावरांना भरपूर व स्वच्छ पाणी पिण्यास देतात व वर उल्लेखिलेली खनिजे आहारात संतुलित प्रमाणात ठेवतात. भारतात हा रोग बऱ्याच प्रमाणात आढळतो [→ अश्मरी].
फ्ल्युओरीन विषबाधा : हा एक चिरकारी विकार आहे. भारतातील बऱ्याच ठिकाणी हा विकार आढळतो. ह्या विकारामुळे जनावरांची वाढ खुंटते, ती लंगडतात, त्यांच्या दातांवर ठिपके दिसतात, जबड्याची, बरगड्यांची व पायांची हाडे जाड होतात. आहारात जास्त प्रमाणात फ्ल्युओराइड व कमी प्रमाणात फॉस्फर, असल्यामुळे हा विकार जडतो. खाद्यमिश्रणात हाडाची पूड तसेच पिण्याच्या पाण्यात कळीचा चुना देण्याने व लोह, तांबे व मँगॅनीज ह्यांचा खाद्यात अंतर्भाव केल्याने रोगाला आळा बसतो.
दुग्धरोग : अमेरिकेच्या अलेघनी डोंगराळ प्रदेशात गायींमध्ये स्थानिक स्वरूपात आढळणारा विशिष्ट चमत्कारिक रोग. रोगी जनावरांचे दूध, लोणी वा मांस खाणाऱ्या प्राण्यातून रोगप्रसार होतो. पूर्वी न कापलेल्या जंगलात रोग विशेषेकरून आढळतो. रोगी जनावर स्थिर उभे असताना शरीरातील सर्व स्नायू थरथरणे व कंप सुटणे हे विशेष लक्षण आहे. खाणेपिणे व रवंथ करणे बंद होऊन जनावर खाली पडून राहते. उभे केले तर चालताना अडखळते. झटका येऊन मृत्यू ओढवतो. पण त्यापूर्वी नाडी व श्वासोच्छ्वास मंद असतो, तापमान नेहमीपेक्षा कमी असते. आठ ते दहा दिवसांत जनावर मृत्युमुखी पडते.
वर निर्दिष्ट केलेल्या रोगांव्यतिरिक्त लाळरोग, सांसर्गिक काळपुळी (अँथ्रॅक्स), गळसुजी, बुळकांड्या, फऱ्या रोग ह्या प्रामुख्याने जनावरांना होणाऱ्या रोगांची माहिती त्या त्या रोगाच्या स्वतंत्र नोंदीत दिली आहे. याशिवाय इतर प्राण्यांबरोबरच जनावरांनाही होणाऱ्या क्षय, धनुर्वात, अलर्क इ. रोगाची माहिती त्या त्या रोगाच्या स्वतंत्र नोंदीमध्ये पहावी. (चित्रपत्रे ४७ व ४८).
पहा : दुग्धव्यवसाय दूध मांस उद्योग.
संदर्भ : 1. Briggs, H. M. Modern Breeds of Livestock, New York, 1958.
2. CSIR, The Wealth of India, Supplement to Vol. VI-Livestock including Poultry, New Delhi, 1970.
3. Harbans Singh and others, Cattle-Keeping in India, New Delhi, 1967.
4. Harbans Singh Moore, E. N. Livestock and Poultry Production, New Delhi, 1972.
5. Kulkarni, L. B. The Cow and Cow Breeds of India, Bombay, 1953.
6. Merchant, I. A. An Outline of the Infectious Diseases of Domestic Animals, Minneapolis 1953.
7. Rice, V. A. and others, Breeding and Improvement of Farm Animals, New York, 1962.
8. Shah, A. B. Ed., Cow-Slaughter:Horns of Dilemma, Bombay, 1967.
9. White, R. O. Mathur, M. L. The Planning of Milk Production in India, New Delhi, 1968.
10. Gosamvardhan-Special Number, Indian Breeds of Cattle, New Delhi, Oct-Nov., 1958.
ताटके, म. वा. खळदकर, त्रिं. रं. गद्रे, य. त्र्यं.
“