क्लॅमिडोबॅक्टिरिएलीझ : सूक्ष्मजंतूंच्या शीझोमायसीटीज या विभागातील दहा गुणांपैकी हा एक गुण आहे. या गणातील सूक्ष्मजंतूंचे वैशिष्ट्य कोशिका-आवरणाच्या (पेशीच्या आवरणाच्या) निर्मितीत आहे. यांचे कोशिका-आवरण मृदू, लवचिक व पापुद्र्यासारखे नाजूक असून बहुधा लोह व मँगॅनीजयुक्त असते. हे सूक्ष्मजंतू रंगहीन, शैवालासारखे, ग्रॅमरंजक अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजक क्रियेमध्य तयार होणारा जांभळटसर रंग टिकून राहत नाही असे) व तंतूसारख्या मांडणीत असतात. या सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व पाण्यात असून त्यांच्यामुळे मैलाच्या तसेच कागद गिरण्यांतील व साखर कराखान्यांतील मळीच्या विल्हेवाटीत अडचणी निर्माण होतात. पाणीपुरवठ्याच्या नळातसुद्धा त्यांच्यामुळे अडथळा येतो. हे सूक्ष्मजंतू वाढीस लागताना तंतुमय असतात, पण पूर्ण वाढीनंतर शलाकाकार (दंडासारखे) होतात. शलाकेच्या टोकावर कशाभिकांचा (कोशिकेपासून निघणाऱ्या व तिच्या हालचालीस उपयोगी पडणाऱ्या नाजूक धाग्यांचा) गुच्छ असतो. यांची वाढ विभाजनाने होते व चल (गतिमान) शलाका कोशिकाआवरणाच्या टोकाद्वारे अथवा आवरण फोडून बाहेर पडतात. कित्येकदा शलाका आवरणास चिकटून राहिल्यास शाखायुक्त भासतात.
कोशिका-आवरणातील लोहसंचय व लोहयुक्त पाण्यातील अस्तित्वामुळे हे जंतू वाढीसाठी लोहाच्या ऑक्सिडीकरणाने [→ ऑक्सिडीभवन] ऊर्जा मिळवीत असावेत, असे समजून, त्यांना ‘लोहजंतू’ असे म्हटले जाते. परंतु लोहघटकांचा त्यांचा चयापचयाशी (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक बदलांशी) संबंध कसा येतो, याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध नाही. बिनोग्रॅडस्की या शास्त्रज्ञांच्या मतानुसार ‘खरे लोहजंतू’ अकार्बनी लोहसंयुगाच्या ऑक्सिडीकरणाने ऊर्जा मिळवतात आणि जे कार्बनी लोहयुक्त पदार्थातून लोहघटकाचे ऑक्सिडीकरण न करता ऊर्जा घेतात ते खरे लोहजंतू नाहीत.
या गणामध्ये क्लॅमिडोबॅक्टिरिएसी, पेलोप्लॉकॉसी व क्रेनोट्रिकॉसी ही तीन कुले आहेत.
(१) क्लॅमिडोबॅक्टिरिएसी : या कुलामध्ये एकूण तीन वंश आहेत. (अ) स्फीरोटिलस, (आ) लेप्टोथ्रिक्स, (इ)टॉक्सोथ्रिक्स.
स्फीरोटिलस वंशात स्फी. नाटान्स व स्फी. डिस्कोफोरा या जाती महत्त्वाच्या आहेत. स्फी. नाटान्स हे सांडपाण्यात, विशेषतः कागद व साखर कारखान्यांतील सांडपाण्यामध्ये आढळतात.
(२) पेलोप्लॉकॉसी : या कुलात पेलोप्लॉका व पेलोनेमा हे दोन वंश आहेत.
(३) क्रेनोट्रिकॉसी : या कुलामध्ये त्वकरोमिका (बाह्य आवरणावरील केसासारख्या वाढी) माध्यमास चिकटलेल्या असून त्यांचे मूळ व मुख स्पष्ट असते. यामध्ये क्रेनोथ्रिक्स, फॅग्मिडिओथ्रिक्स व क्लोनोथ्रिक्स हे तीन वंश आहेत.
केनोथ्रिक्स वंशातील सूक्ष्मजंतू नळाच्या पाण्यात आढळतात व त्यांच्या वाढीमुळे नळातील पाण्याच्या प्रवाहात अडथळा येतो.
संदर्भ : 1. Frobisher, M. Fundamentals of Microbiology, Tokyo, 1967.
2. Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, 1961.
कुलकर्णी, नी. बा.