ख्रिसमस बेट : हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या ताब्यातील बेट. क्षेत्रफळ १३५ चौ. किमी. लोकसंख्या २,७४१ (१९७२ अंदाज). पैकी ७५ टक्के चिनी. लांबी सु. १८ किमी. रुंदी ७ किमी. हे ९० २५’ २२” द. १०५ ३९’ ५९” पू. यांच्या दरम्यान फ्रीमँटलच्या उत्तरेस २,६०८ किमी. जावाच्या दक्षिणेस ३५८ किमी. व सिंगापूरच्या दक्षिण – आग्नेयीस १,३०५ किमी. आहे. बहुतेक सर्व किनारा ३०० किमी. पर्यंत उंच, तीव्र उताराच्या कड्यांनी बनलेला आहे. फ्लाइंग फिशिंग कोव्ह या ठिकाणाहूनच फक्त किनाऱ्यावर उतरता येते. हे बेट समुद्रतळापासून १,८०० मी. उंच आहे व सर्वोच्च ठिकाण समुद्रसपाटीपासून ३५७ मी. उंच आहे. म्हणजे हे बेट सागरमग्न पर्वतांचा पठारी शिरोभाग आहे. काही भागात प्रवाळयुक्त किनारा आहे.

१६१५ मध्ये रिचर्ड रॉवी याने बेटाचा शोध लावला. डचांनी या बेटाला मोनी नाव दिले पण नंतर १७७७ मध्ये कॅप्टन कुक याने दिलेले ख्रिसमस हेच नाव रूढ झाले. १८८६ साली फ्लाइंग फिश या जहाजाने बेटाची पाहणी केली. तेव्हा हे बेट वनस्पती व प्राणी यांनी समृद्ध असल्याचे आढळून आले. १८८८ मध्ये येथे फॉस्फेटचे साठे आढळून आले. त्यानंतर हे बेट ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. येथून प्राणी व वनस्पती यांचे बरेच नमुनेही गोळा करण्यात आले. फॉस्फेटच्या खाणींमुळे बरेच प्राणी व वनस्पती नष्टप्राय झाले. १८९७ पासून फॉस्फेटच्या खाणी रॉस व मरे कंपनीने कराराने १९४८ पर्यंत चालविल्या त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सरकारांनी या कंपनीचे हक्क खरेदी केले. १ ऑक्टोबर १९५८ पासून ह्या बेटाची शासनव्यवस्था इंग्लंडने ऑस्ट्रेलियाकडे सोपविली. १९४२ साली जपानने हे बेट व्यापले होते.

१९७० – ७१ मध्ये ८,८३,१८९ टन फॉस्फेट ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडे निर्यात झाले. तसेच फॉस्फेटचुरा १,०३,७९६ टन सिंगापूरला व ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला. जून १९७१ अखेर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांतून ६४८ विद्यार्थी शिकत होते. ब्रिटिश फॉस्फेट कमिशनतर्फे येथील लोकांस वैद्यकीय साहाय्य मोफत मिळते. ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यांच्याशी येथून रेडिओ दळणवळण आहे. विमानवाहतूक नाही.

डिसूझा, आ. रे.