गाजर : (क. गज्जरी सं. शिखामूल, शिखाकंद, गृंजन इं. कॅरट लॅ. डॉकस कॅरोटा कुल-अंबेलीफेरी). ही वनस्पती मूळची यूरोप, आफ्रिका व आशिया खंडांतील असून समशीतोष्ण प्रदेशांत ती एक त्रासदायक तण आहे. हिमालयात ती सु. १,५००–२,८०० मी. उंचीपर्यंत आढळते व तेथे सु. १·८० मी. उंच वाढते. ती केसाळ द्विवर्षायू (दोन वर्षे जगणारी) ⇨ ओषधी असून तिला दोनदा किंवा तीनदा विभागलेली, पिच्छाकृती संयुक्त पाने आणि छदयुक्त, सपाट, चामरकल्प [→ पुष्पबंध] पांढरे फुलोरे येतात. मुळे बारीक, लांब, उग्र वासाची व कटू स्वादाची असतात. फळे हलकी, सुवासिक, तिखट आणि कडवट असतात. मुळे व बी औषधी आहेत. या रानटी जातीपासून हल्ली सर्वत्र पिकविलेल्या गाजराचा प्रकार काढलेला आहे. त्याला डॉ. कॅरोटा, प्रकार सॅटायव्हा म्हणतात.
हिचे शाखायुक्त खोड सरळ ०·३–१·२५ मी. उंच व प्रधानमूळ जाडजूड, मांसल आणि शंकूसारखे, पिवळसर, शेंदरी, लालसर व ५–३० सेंमी. लांब असते. पाने वरच्याप्रमाणे, फुलोरे तसेच पण गोलसर व शाखायुक्त फुले पांढरी किंवा पिवळसर, फळे लांबट गोल, ०·३ सेंमी. लांब असून त्यांवर केसाळ कंगोरे असतात. बी लहान, हिरवट किंवा भुरकट, सुवासिक, स्तंभक (आकुंचन करणारे), पाचक व कामोत्तेजक, मज्जातंतूंना शक्तिवर्धक, उत्तेजक व वायुनाशी असते. मूत्रपिंडाचे विकार, गर्भाशयाच्या वेदना, जलसंचय इत्यादींवर उपयुक्त. मुळे प्रशीतकर यूरोपमध्ये काविळीवर गाजराचा काढा देतात. गाजरात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे, शर्करा व लोह ही असतTत. गाजरे कच्ची किंवा उकडून खातात ती यकृत, फुप्फुस, श्वासनलिका व छातीच्या विकारांवर चांगली असतात. जनावरांच्या वैरणीसाठी मुळे व पाला या दोहोंचाही उपयोग करतात.
पहा: अबेलेलीझ.
जमदाडे, ज. वि.
लागवड : गाजराची लागवड भारतातील बऱ्याच राज्यांत करतात. या वनस्पतीच्या जमिनीत पोसून जाड बनलेल्या १० ते १६ सेंमी. पर्यंत लांबीच्या आणि एका टोकाला निमुळत्या असलेल्या मुळालाच गाजर म्हणतात. गाजराचे भारतातील देशी गाजर, परदेशी, नान्टेस, स्कार्लेट हॉर्न, डॅन्व्हर्स, ऑक्सहार्ट वगैरे अनेक उपप्रकार आहेत. उपप्रकारांप्रमाणे गाजरांत आकारमान, रंग व चव याबाबतींत बरीच तफावत आढळते. लाल रंगाची गाजरे भारतीयांना व पिवळसर तांबूस रंगाची पाश्चात्त्यांना आवडतात. या उपप्रकारात लांब, मोठ्या आकाराची, मध्यम लांबीची आणि तोकडी गाजरे असतात.
जमीन : लांब व मोठ्या गाजरासाठी जमीन ६० सेंमी. पेक्षा जास्त खोल आणि भुसभुशीत असावी लागते. मध्यम लांब गाजरांसाठी यापेक्षा जरा कमी खोलीची जमीन चालते. तोकड्या प्रकारच्या गाजरांसाठी २५–३० सेंमी. खोलीची जमीन चालते पण तिच्यात दगडगोटे असू नयेत.
मशागत : नांगरून, कुळवून, ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करतात. लांब गाजरांसाठी जमीन ३०–३५ सेंमी. पर्यंत, मध्यम प्रकारच्या गाजरांसाठी २०–२५ सेंमी. व तोकड्या गाजरांसाठी १५–२० सेंमी. पर्यंत खोल नांगरतात. ढेकळे फोडून, कुळवून चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घेतात. शेणखत चांगले कुजलेले असावे लागते. नाहीतर गाजरांना टोकाकडे फाटे फुटून गाजरांचा आकार वेडावाकडा होतो आणि अशा गाजरांना गिऱ्हाईक मिळत नसल्यामुळे नुकसान होते. त्याचप्रमाणे जमिनीत दगडगोटे असतील तरीही गाजरांचा आकार बिघडून नुकसान होते, म्हणून मशागत करताना दगडगोटे वेचून घेण्याची काळजी घ्यावी लागते. साधारणतः मध्यम प्रकारच्या गाजरांना गिऱ्हाईक चांगले मिळते.
गाजराचे पीक दोन उद्देशांनी लावतात. एक पोसलेली मुळे म्हणजे गाजरे उत्पादन करण्यासाठी आणि दुसरा बी मिळविण्यासाठी. मुळांच्या (गाजरांच्या) उत्पादनासाठी लावलेल्या पिकापासून बी मिळत नाही. पण ते पीक उत्पन्न करण्यासाठी मात्र बीच पेरावे लागते. बियांचे उत्पादन करण्यासाठी पक्क गाजरांचे बुडखे लावून स्वतंत्र पीक करावे लागते. त्याकरिता आधी नमूद केल्याप्रमाणे जमिनीची मशागत करून तिच्यामध्ये गाजरांचे बुडखे लावतात. त्यांमधून तुरे निघतात. ते ६०–९० सेंमी. इतके उंच वाढतात. त्यांच्या माथ्यावर फुलांचे स्तबक असते. फुले उमलून बीजधारणा होते. बीज पूर्ण तयार झाले म्हणजे फुलांचे स्तबक काढून घेऊन वाळवून त्यांच्यामधील बी काढतात.
मुळासाठी पीक बी पेरून घेतात. वरीलप्रमाणे जमीन तयार करतात. तिच्यामध्ये केलेल्या वाफ्यांत बी मुठीने फोकतात आणि मातीत मिसळून घेतात किंवा सपाट जमिनीत बी फोकून ते कुळवाने मातीत मिसळून नंतर वाफे करतात. पेरल्यानंतर लगेच पाणी देतात. दुसरी पद्धत म्हणजे तयार केलेल्या जमिनीत ४५–६० सेंमी. अंतरावर सऱ्या पाडून त्यांतील वरंब्यांच्या दोन्ही कुशींवर हाताने बी टोकतात आणि लगेच सऱ्यांमधून पाणी सोडतात. बी उगवून यावयाला १५–२० दिवस लागतात. बी चोवीस तासांपर्यंत पाण्यात भिजत घालून कोरडे करून पेरल्यास उगवण लवकर होते. गाजराचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांत लावतात. एक हेक्टर क्षेत्राला ५–७ किग्रॅ. बी पुरे होते.
पाणी : उन्हाळी हंगामात ७-८ दिवसांनी आणि हिवाळी हंगामात ८–१० दिवसांनी पिकाला पाणी देतात. तिसऱ्या महिन्यापासून पाणी बंद करतात व त्यामुळे गाजरांची गोडी वाढते.
आंतर मशागत : बी उगवून आल्यानंतर काही दिवसांनी जरूरीप्रमाणे पिकाची रोपे उपटून घेऊन ते योग्य प्रमाणात विरळ करतात कारण पीक दाट झाल्यास गाजरे चांगली पोसत नाहीत. उपटून काढलेली रोपे गुरांना चारतात. पिकातील तण काढण्याकडे लक्ष द्यावे लागते.
वरखत : दर हेक्टरला ४५–५६ किग्रॅ. नायट्रोजन, ४५–५६ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ९०–११२ किग्रॅ. पोटॅश वरखत दिल्यास उत्पन्न वाढते.
काढणी : हळवे (लवकर तयार होणारे) उपप्रकार बी पेरल्यापासून ७०–८० दिवसांत आणि गरवे (उशीरा तयार होणारे) उपप्रकार १००–१२० दिवसांत तयार होतात. गाजरे चांगली पोसून चवदार व्हावी म्हणून पीक काढण्याआधीच्या दोन पाण्याच्या पाळ्या देत नाहीत. त्यामुळे गाजरे खणून काढताना त्यांना माती चिकटून राहत नाही. ती साफ करणे सोपे जाते. खणून काढताना त्यांना इजा होणार नाही अशी काळजी घेतात. दर हेक्टरमधून ११–१६ टन गाजरे निघतात.
इंडियन ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली या संस्थेने देशी गाजर आणि नान्टेस हाफ लाँग या विदेशी गाजराच्या संकरापासून एक नवीन तांबड्या गाजराचा प्रकार तयार केला आहे.
पाटील, ह. चिं.
कीड : गंभीर स्वरूपाचा कीटक उपद्रव या पिकाला होत असल्याची नोंद नाही.
रोग: (१) कूज : हा सूक्ष्मजंतुजन्य रोग गाजरांची ने-आण करताना होतो. जंतू कुजलेल्या पाल्यात जगतात व इजा झालेल्या जागेतून गाजरात प्रवेश करतात. हवेतील आर्द्रतेमुळे रोगाची वाढ होऊन, गाजरे लिबलिबीत होऊन कुजू लागतात. यासाठी गाजरे खांदून काढताना त्यांना इजा होऊ देऊ नये.
(२) भुरी : हा कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे होणारा) रोग आहे. त्याच्यामुळे पाने पिवळी पडतात व वाळतात. रोगप्रसार हवेतून होतो. रोग नियंत्रणासाठी दर हेक्टरला २५ ते ३० किग्रॅ. गंधकाची भुकटी पिकावर पिस्कारतात.
(३) करपा : हाही कवकजन्य रोग असून त्याच्यामुळे पानांवर अनियमित आकाराचे काळसर डाग पडतात. रोगप्रसार रोगट पाला व बियांमधून होतो. रोग नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण (३:३:५०) फवारतात.
पाटील, पां. ल.
“