गॅडोलिनियम: धातुरूप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Gd. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ६४ अणुभार १५७·२६ आवर्तसारणीतील (मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) गट ३ मधील विरल मृत्तिका धातू (आवर्त सारणीतील क्र. ५७–७१ मधील मूलद्रव्ये) वि. गु. ७.८६८ वितळबिंदू १,३२५० (?) से. उकळबिंदू २,७२५० से. स्थिर समस्थानिक (एकाच अणुक्रमांकाचे भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) १५२, १५४, १५५, १५६, १५७, १५८ व १६० विद्युत् विन्यास (अणुतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, २५, ९, २ संयुजा (संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३. रंग रूपेरी. ही धातू समचुंबकीय (चुंबकीय पार्यता निर्वातापेक्षा जास्त असलेली) आहे पण १६० से. तापमानापेक्षा कमी तापमानास ती लोहचुंबकीय (चुंबकीय पार्यता निर्वातापेक्षा पुष्कळच जास्त असलेली) होते.
पृथ्वीच्या कवचात हिचे प्रमाण ७ × १०-५ टक्के आहे. नॉर्वेतील पिटरस्पारच्या काही प्रकारांत, त्याचप्रमाणे गॅडोलिनाइट, समर्स्काइट व मोनाझाइट या खनिजांत ती असते.
जे. सी. जी. मारीन्याक यांनी १८८० साली ही धातू शोधून काढली. जे. गॅडोलिन या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ १८८६ मध्ये तिला गॅडोलिनियम हे नाव देण्यात आले. १९०० मध्ये दमार्से यांनी हिची बरीचशी शुद्ध अशी लवणे मिळविली. गॅडोलिनियम ट्रायक्लोराइडाचे कॅल्शियमाने ⇨ क्षपण केले असता ही धातू मिळते. पूर्वी विरल मृत्तिकांपासून त्यांच्या लवणांचे भागात्मक स्फटिकीकरण (स्फटिक वेगळे करून उरलेल्या विद्रावावर अशीच क्रिया पुनःपुन्हा करणे) करून गॅडोलिनियम विलग करीत, पण १९४५ नंतर ⇨ आयन-विनिमय पद्धतीने ती समॅरियम व यूरोपीयम या निकटवर्ती धातूंपासून वेगळी करणे सुसाध्य झाले आहे.
या धातूचे १५५ व १५७ हे समस्थानिक अणुगर्भीय विक्रिया शृंखलेचे नियंत्रण करण्यासाठी वापरता येण्यासारखे आहेत परंतु ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाहीत. या धातूची लवणे चुंबकीय शीतलीकरणाने तापमान -२७२० से. च्या खाली नेण्यासाठी प्रथम वापरण्यात आली.
ठाकूर, अ. ना.