गळवाला मासा : (अँगलर फिश). मासे पकडण्याकरिता जसा गळ वापरतात तशा तऱ्हेचा गळ काही माशांच्या डोक्यावर असतो म्हणून त्यांना गळवाले मासे म्हणतात. या प्रकारच्या माशाला ‘बडिशमीन’ असेही नाव दिलेले आहे. हे मासे लोफिइफॉर्मिस गणातील आहेत. या गणातील लोफियस  वंशात अनेक जाती आहेत, पण जिची बरीच माहिती आहे अशी सामान्य जाती लोफियस पिस्केटोरियस  ही होय. यूरोपचा सर्व किनारा आणि अमेरिकेचा पूर्व किनारा या लगतच्या समुद्रांत हा मुबलक आढळतो. हा समुद्राच्या तळाशी राहणारा आहे. याचे डोके मोठे वगळवाला मासा बसके, तोंड फार मोठे आणि दात मागे वळलेले असतात. याचे अंसपक्ष (छातीच्या भागावरील पर पर म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्‍नायुमय घड्या) रूपांतरित असून त्यांच्या मदतीने हा समुद्राच्या तळावर चालू शकतो. याच्या अग्र पृष्ठपक्षातील (पाठीवरील परातील) पहिले तीन अर (पक्षाला आधार देणारे कंटक) लांब असून डोक्यावर असतात, त्यातला पहिला जास्त लांब आणि शलाकेसारखा असून त्याच्या टोकावर त्वचेचा झोल असतो. इतर माशांना अमिष दाखविण्याकडे याचा उपयोग होतो. हा मासा आपली शलाका (झोलासहित) सर्व बाजूंना फिरवीत असतो आणि भुरळ पडून जवळ आलेले मासे खातो. याचे तोंड व आमाशय (जठर) इतका मोठा असतो की, दोन मी. लांबीचा मासा हा सहज गिळतो.

लोफिइफॉर्मिस गणात अँटेनॅरियस  या वंशाच्या (अँटेनॅरिइडी कुल) गळवाल्या माशांचाही समावेश होतो. हे उष्ण समुद्रांच्या उथळ पाण्यात राहतात. लोफियस  वंशाच्या माशांपेक्षा हे लहान असून यांच्या डोक्यावरही मासे पकडण्याचे साधन असते. भारताच्या भोवतालच्या समुद्रात गळवाल्या माशांच्या अँटेनॅरियस हिस्पिडस आणि अँ. न्यूमिफर या दोन जाती आढळतात.

 

समुद्रात ५०० पासून १,५०० मी. खोलीवरील गडद अंधाराच्या प्रदेशात लोफिइफॉर्मिस गणाच्या सेरॅटिइडी कुलातले गळवाले मासे राहतात. या माशांची उत्पत्ती समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या गळवाल्या माशांपासून झालेली असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मासे पकडण्याचे साधन असते, पण त्याचे रूपांतर होते. शलाकेच्या टोकावर झोलाऐवजी लहान गोळा असून त्यात प्रदीप्ती (प्रकाश उत्पन्न करणारी) ग्रंथी असते. या गोळ्याच्या उजेडाने भक्ष्याला भुरळ पडते. फक्त मादीच्या डोक्यावरच हे साधन असते, नर लहान आणि मादीच्या शरीरावर परजीवी असतो.

कर्वे, ज. नी.