खोबरे : नारळातील गरास खोबरे म्हणतात. ओले खोबरे भाजी, आमटी, चटणी यांत आणि काही पक्वान्नांत वापरतात. ते १ – २ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाही, खवट होते. वाळविल्यास मात्र ते टिकाऊ होते. असे खोबरे वाट्या (फोडलेले) किंवा गोटे (न फोडलेले) या रूपांत बाजारात येते. नारळाच्या उत्पादनाचा बराच मोठा भाग खोबरे करण्यासाठी वापरला जातो. खोबऱ्यापासून तेल (खोबरेल) काढण्याचा उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. हे तेल खाद्य असून त्याचा विविध सौंदर्यप्रसाधनांतही उपयोग करतात. भारतात दरवर्षी सु. दीड अब्ज नारळांचे खोबरे बनवितात. नारळ पिकविणाऱ्या सर्व देशांत खोबऱ्याचे उत्पादन होते.

इतिहास : ज्या प्रदेशांत नारळ पिकतात तेथील व जवळपासच्या लोकांना आपल्या गरजेप्रमाणे जवळजवळ वर्षभर ताजे नारळ मिळतात. त्यामुळे नारळ व खोबरे साठविणे आणि त्यांची निर्यात करणे ह्या गोष्टींचा विचार करण्याची पूर्वी फारशी गरज भासली नसावी. मात्र इ. स. १८६० च्या सुमारास उत्तर यूरोपमध्ये दुग्धोत्पादनातून मिळणाऱ्या चरबीचा तुटवडा पडल्यामुळे स्वयंपाकात लागणारे तेल, लोणी इत्यादींऐवजी खोबरेलाचा वापर करण्याचे प्रयोग करण्यात आले. पश्चिम यूरोपात खोबरेलाचा वापर त्यानंतर विस्तृतपणे होऊ लागला, तरी जवळ जवळ १९१० पर्यंत अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत खोबरेल माहीतसुद्धा नव्हते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खोबरे व खोबरेलाचे जागतिक उत्पादन २२ ते २४ लक्ष शॉर्ट टन (१ शॉर्ट टन ९०७ किग्रॅ. वा २,००० पौंड) एवढे होत आहे. म्हणजे सर्व तेले व चरब्यांचा जागतिक उत्पादनाच्या सु. आठ टक्के उत्पादन केवळ खोबरेलाचे होते. दर वर्षी त्यातील १३ ते १५ लक्ष टन तेलाची जागतिक व्यापारात उलाढाल होते. ते मुख्यतः पश्चिम यूरोपातील देशांत व अमेरिकेत आयात होते.

उत्पादन : नारळ एक वर्षाचे झाल्यानंतर माडावर पक्व व्हायला लागतात  ते खाली पडू लागतात किंवा त्याची उतरणी करतात. पक्व नारळ काढण्याचे काम वर्षभर सर्व हंगामांत चालू असते. उत्तम प्रतीचे खोबरे मिळविण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतात. देशपरत्वे त्या भिन्न आहेत. नारळ काढल्यानंतर काही महिने ते साठवून ठेवण्याची पद्धत भारतात व श्रीलंकेत सर्वत्र आहे. नारळावरील बाहेरची तंतुमय साल (सोडणे) काढण्याचे काम धारदार चाकूने करतात. यास नारळ सोलणे म्हणतात. कुशल मजूर एका दिवसात ३,००० नारळ सोलू शकतो. काही ठिकाणी नारळ न सोलता तसाच कुऱ्हाडीने फोडून खोबरे काढतात. नारळ सोलण्याची यांत्रिक साधनेही उपलब्ध आहेत. परंतु बहुतांशी हे काम सगळीकडे हातानेच करतात. वाटी खोबरे बनविण्यासाठी सामान्यतः नारळ धारदार चाकूने आडवा फोडून त्याचे दोन भाग करतात. नारळात त्याच्या वजनाच्या २८ टक्के ओले खोबरे असते. त्यात ५० टक्के पाणी व ३० – ४० टक्के तेल असते. ४ किग्रॅ. ओल्या खोबऱ्यासाठी सु. तीस नारळ लागतात. खोबरे उन्हात वाळविण्याची पद्ध सर्वांत जुनी  असून अजूनही बहुतेक ठिकाणी तीच वापरली जाते. या पद्धतीने फोडलेले नारळ स्वच्छ जमिनीवर खोबऱ्याची बाजू उन्हाकडे करून एकमेकांना चिकटून पसरून ठेवतात. दोन-तीन दिवस उन्हात ठेवल्यानंतर खोबरे करवंटीपासून कमी जास्त प्रमाणात सुटते. ते काढून त्याच्या वाट्या ४ – ५ दिवस पुन्हा वाळवितात. चांगल्या प्रतीचे खोबरे बनविण्यासाठी ते सतत ५ – ७ दिवस वाळवावे लागते. पावसाळ्यात किंवा ढगाळ दिवसांत बनविलेले खोबरे बुरसट होते किंवा त्याचा रंग पांढरा स्वच्छ होत नाही.

बऱ्याच चांगल्या प्रतीचे खोबरे भट्टीच्या योगाने पावसाळ्यातही बनविता येते. त्यासाठी योग्य अभिकल्पाच्या (आराखड्याच्या) भट्ट्या लागतात. निरनिराळ्या आकाराच्या आणि आकारमानाच्या भट्ट्या निरनिराळ्या देशांत प्रचलित आहेत. प्राथमिक स्वरूपाच्या भट्टीला ‘धूम्र शुष्कक’ म्हणतात. तीमध्ये करवंट्या सरपण म्हणून वापरतात व त्यांपासून निघणारे उष्ण वायू व धूर खोबऱ्यावरून जाऊ देतात. त्यामुळे ते वाळते. या पद्धतीने धुरी दिलेले खोबरे हलक्या प्रतीचे असते. भट्ट्यांत अनेक सुधारणा करण्यात आल्या असून त्यांची पेटंटेही घेण्यात आलेली आहेत. विविध प्रकारच्या भट्ट्यांत खोबरे वाळण्यास लागणारा संपूर्ण काळ भिन्न असून तो १५ – ४० तासांपर्यंत असतो. अशा भट्ट्यांचा वापर फिलिपीन्समध्ये सर्वत्र होतो. खोबऱ्याच्या जागतिक निर्यातीच्या ५० टक्के निर्यात फिलिपीन्समधून होते. येथे खोबऱ्याला मुद्दाम धुरी देतात. त्यामुळे खोबरे पूर्णपणे वाळले नसले, तरी गोदामात खराब होत नाही. उष्ण हवेच्या झोताने खोबरे वाळविण्याची दुसरी एक पद्धत असून ती प्रथम भारतात व सामोआ बेटांत (द. पॅसिफिक महासागर) वापरण्यात आली. ह्या पद्धतीत खोबरे उष्ण हवेचा झोत सोडतात. तो खोबऱ्यातील पाण्याचा अंश वाहून नेतो. या पद्धतीने केलेले खोबरे पांढरे, एकाच प्रतीचे व उन्हात वाळवून केलेल्या खोबऱ्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असते. जागतिक बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या उत्तम प्रतीच्या खोबऱ्यात ४ – ५ टक्के पाणी व ६३ – ७० टक्के तेल असते.

गोटा खोबरे सबंध नारळापासून बनवितात. त्यासाठी १२ – १४ महिन्यांचे पक्क नारळ दोन मजली विटा व चुन्याच्या पक्क्या बांधणीच्या कोठडीत लाकडी माळ्यांवर साठवून आपोआप वाळू देतात किंवा पूर्ण वाळेपर्यंत त्यांना धुरी देतात. पूर्ण वाळलेला नारळ हातात धरून हलविला असता सुट्या खोबऱ्याचा खुळखूळ आवाज ऐकू येतो व त्यावरून तो पूर्ण वाळला आहे हे समजते. त्यानंतर तो सोलून आणि करवंटी फोडून त्यातील खोबऱ्याचे गोटे वेगळे करतात व सोईप्रमाणे विक्रीला पाठवितात. नारळाचे सोडणे, वाळलेली पाने, भाताचा भुसा किंवा इथर स्वस्त सरपण धुरी देण्यासाठी वापरतात. ही प्रक्रिया पुरी होण्यास ८ – १२ महिने लागतात. गोटा खोबरे बनविण्यासाठी लहान आकाराचे नारळ चांगले असतात. अर्धवट वाळलेल्या खोबऱ्यावर बुरशी लवकर वाढते व त्याला किडीचाही उपद्रव होतो. त्यातील तेल खवट होते व त्याला विशिष्ट वास येतो व कधीकधी सर्व खोबरे वाया जाते.

खोबऱ्याचा उतारा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. हवामान, जमीन, माडाची अनुहरित (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरलेली) लक्षणे, त्याचे वय, नारळाची पक्वता, हंगाम, साठवणीचा काळ इत्यादींचा त्यांमध्ये समावेश होतो. भारतात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा उतारा येतो. मलबारमध्ये व कारवारात एक टन खोबऱ्यासाठी ६,२२५ नारळ, गोदावरी (आंध्रप्रदेश) येथे ७,००० नारळ, त्रावणकोर आणि कोचीनमध्ये ६,८५० नारळ व कर्नाटकमध्ये ८,००० नारळ लागतात. श्रीलंकेत ४,८०० नारळांपासून एक टन खोबरे मिळते, तर वेस्ट इंडीज व फिलिपीन्स येथे अनुक्रमे ६,२५० व ४,४०० नारळ लागतात. खोबऱ्याची प्रतवारी सामान्यतः त्याचा रंग, स्वच्छपणा, पाण्याचे आणि बुरसटपणाचे प्रमाण यांवरून लावतात.

उपयोग : खोबरे खाद्य असून त्याच्यापासून तेलही काढतात. खोबरे नुसतेच किंवा तिखटमिठाच्या किंवा गोड पदार्थांत मिसळून जातात. त्याचा मिठाईत उपयोग करतात. भाजीच्या मसाल्यात त्याचा समावेश असतो. मेजवानीच्या वेळी काही खाद्यपदार्थांवर त्याचा कीस पेरतात. त्यामुळे ते जास्त आकर्षक होतात. काही धार्मिक विधींमध्ये खोबऱ्याच्या वाट्या व गोटे वापरतात.


‘सुके नारळ’ : हे तयार करण्यासाठी प्रथम नारळावरील साल काढून टाकतात व मग त्यातील ओले खोबरे वेगळे करून त्याची तपकिरी पाठ खरवडून काढून टाकतात व पांढऱ्या खोबऱ्याचे यंत्राच्या साहाय्याने पातळ काप किंवा कीस बनवितात व ते नंतर उष्ण वात शुष्ककात घालून वाळवितात. कथिलाचे अस्तर असलेल्या खोक्यांत भरून याची निर्यात करतात. श्रीलंकेत सु. ६,९०० नारळांपासून एक टन ‘सुके नारळ’ बनवितात. अमेरिकेत हे ‘मॅकॅरून’, ‘थ्रेड’ व ‘रिबन’ या व्यापारी नावांनी विकले जातात. याचा उपयोग मेवामिठाई, केक, बिस्किटे, पुडिंग इ. बनविताना होतो.

टेंड – ओ – नट : मऊ व गोड केलेल्या सुक्या नारळांचे ‘टेंड – ओ – नट’ हे व्यापारी नाव आहे. सध्या त्याचे श्रीलंकेत उत्पादन करतात. त्यामध्ये ६० टक्के शुद्ध खोबरे, ३८ टक्के साखर व दोन टक्के पाणी असते. ते गुलाबी, फिकट गुलाबी, तपकिरी, हिरव्या, पिवळ्या, मरून व मॉव्ह या सात आल्हाददायक रंगांचे बनवितात. ते रुचकर असून केक सुशोभित करण्यासाठी किंवा केकमध्ये भरण्यासाठी वापरतात. गरम दूध, चहा किंवा पाणी यांत मिसळूनही हे खातात.

भारतातील गळतीसाठी तयार केलेल्या खोबऱ्याचे उत्पादन, खोबऱ्याची आयात व खोबरेलाचे उत्पादन (आकडे टनांत).

वर्ष

खोबऱ्याचे उत्पादन

खोबऱ्याची आयात

एकूण

खोबरेलाचे उत्पादन

१९६६ – ६७

३,०९,३७५

२८,७६६

३,३८,१४१

२,१३,०२९

१९६७ – ६८

३,१७,०८०

२४,८७०

३,४१,९५०

२,१५,४२८

१९६८ – ६९

३,३०,४८१

१४,७८८

३,४५,२६९

२,१७,५१९

१९६९ – ७०

३,४९,१०२

१४,७०३

३,६३,८०५

२,२९,१९७

१९७० – ७१

३,६२,१५१

१७,३६८

३,७९,५१९

२,३९,०९७

१९७१ – ७२

३,६९,४३९

१०,३३५

३,७९,७७४

२,३९,२२८

खोबरेल : भारतातील खोबऱ्याच्या उत्पादनापैकी ८० टक्के भाग तेल काढण्यासाठी वापरला जातो. साधे घाणे, फिरते घाणे व एक्सपेलर यांच्या साहाय्याने खोबऱ्याचे तेल काढतात. साधे घाणे बैल किंवा गाढवे ओढतात. माणसांनी ओढण्याचे काही घाणेही आहेत. बैल घाण्यात दहा तासांत ५०—८० किग्रॅ. खोबऱ्याचे तेल निघते. माणसांनी ओढण्याच्या घाण्यात मात्र सु. २० किग्रॅ. खोबऱ्याचे गळीत होते. घाण्याने खोबऱ्यातील तेलाच्या ७५ टक्के इतके तेल निघते व बाकीचे पेंडीत राहते.

फिरते घाणे म्हणजे एंजिन किंवा इतर यांत्रिक शक्तीवर चालणारे साधे घाणे होत. त्यामध्ये घाणा व लाट दोन्हीही फिरतात. साध्या घाण्यांची जागा आता ह्या घाण्यांनी घेतलेली आहे. त्यांची गाळप शक्ती दहा तासांत सु. २५० ते ३२५ किग्रॅ. असते. पेंड एकजीव व्हावी व तेल निघणे सुकर व्हावे म्हणून १०० किग्रॅ. खोबऱ्यात एक किग्रॅ. बाभळीचा डिंक मिसळतात. पेंडीमध्ये सु. ३-४ टक्के तेल राहते.

खोबरेलाच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी एक्सपेलर वापरतात. एका गिरणीत १ ते ६ एक्सपेलर बसविलेले असतात. सर्वसाधारण आकारमानाच्या एक्सपेलराची गाळप शक्ती दिवसाला दोन ते तीन टनांपर्यंत असते. तथापि काही गिरण्यांत ह्याहीपेक्षा जास्त गाळप शक्तीचे एक्सपेलर असतात.

यूरोप व अमेरिकेत खनिज तेल विद्रावकाच्या (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या, हेक्झेन प्रकार) साहाय्याने खोबरेलाचे निष्कर्षण (वेगळे काढण्याची क्रिया) करतात. त्याकरिता प्रथम मोठाल्या अखंड यांत्रिक मळसूत्री दाबयंत्रांनी खोबऱ्यातील बहुतांश तेल काढून घेतात. अशा यंत्रांची दिवसाची गाळप शक्ती २५ – ६५ टनांपर्यंत असते. खाली उरलेल्या खोबऱ्याच्या पेंडीत तेलाचे प्रमाण १५ – २० टक्के असते. अशी पेंड एका विशिष्ट उपकरणातील चाळणीसारख्या पात्रात भरतात. या पात्राच्या बुडांना भोके असल्यामुळे विद्रावक त्यातून पार जाऊ शकतो. ही पात्रे एका दिशेने जात असताना विद्रावकाचा प्रवेश त्यांच्या विरुद्ध दिशेने होईल अशी योजना असते. त्यामुळे कमी विद्रावक वापरूनही पेंडीतील बहुतेक सर्व तेल विद्रावरूपाने मिळविता येते. उरलेल्या पेंडीत फक्त ०.५ – १.०० टक्का इतकेच तेल राहते. विद्रावात विद्रावक ऊर्ध्वपातनाने (प्रथम वाफ करून आणि ती थंड करून द्रव पदार्थ परत मिळविण्याच्या प्रक्रियेने) परत मिळवितात. जो लेशमात्र विद्रावक पेंडीमध्ये राहतो तोही बाष्प – ऊर्ध्वपातनाने करून परत मिळविला जातो.

खोबरेल तेल वर्णहीन ते पिवळसर दिसते. थिजलेले तेल सु. २३ से. ला वितळते. अशुद्ध तेलाला नारळाचा विशिष्ट वास येतो. इतर बहुसंख्य चरब्यांपेक्षा खोबरेलातील वसाम्लांचा (फॅटी असिडांचा) सरासरी रेणुभार कमी आहे.

तेल शुद्ध केल्यावर खाण्यास योग्य होते. त्यासाठी ते जाड कापडातून गाळून घेतात. त्यातील मुक्त वसाम्ले काढून टाकतात व नंतर त्याचे विरंजन करतात (रंग घालवितात). खोबरेलात लॉरिक अम्ल या तृप्त (ज्यातील कोणत्याही कार्बन अणूंचा रासायनिक बंध मोकळा नाही अशा) अम्लाचे प्रमाण उच्च आहे (४८ टक्के). त्यामुळे शुद्ध तेल लवकर खवट होत नाही आणि म्हणूनच मेवा – मिठाईच्या व बेकरीच्या पदार्थांत ते वापरता येते. दुसऱ्या जागतिक महायुद्धापर्यंत अमेरिकेत या तेलाचा उपयोग मार्गारीन उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर करीत, पण नंतर तो कमी झाला. यूरोप व इतरत्र मात्र मार्गारीन उत्पादनाकरिता त्याचा उपयोग कायम होत आहे. हायड्रोजनीकरण (हायड्रोजनाचा समावेश करून केलेल्या विक्रियेने) केलेले खोबरेल स्वयंपाकात वापरले जाते. तसेच त्याचा उपयोग केसांना व अंगाला लावण्यासाठी होतो. त्यापासून सुवासिक तेलाचे उत्पादनही करतात. चेहऱ्याला लावायची क्रीम्स, शांपू इ. सौंदर्यप्रसाधने बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यापासून सुवासिक तेलाचे उत्पादनही करतात. चेहऱ्याला लावायची कॉस्टिक (दाहक) सोड्यासारखे क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ, अल्कली) वापरून खोबरेलापासून सुलभतेने साबण बनविता येतो. हा साबण पांढरा व कठीण असून पाणी अफेनद (फेस न होणारे) असले, तरी त्याचा फेस होतो. त्यामुळे समुद्राच्या पाण्यातही तो वापरता येतो.

पेंड : पेंडीमध्ये ५ – ७ टक्के तेल व १९ – २१ टक्के प्रथिन असते. दुभत्या जनावरांना खुराक म्हणून व इतर जनावरे लठ्ठ बनविण्यासाठी ती उपयोगी पडते. अगदी क्वचितच कार्बनी (सेंद्रिय) खत म्हणून तिचा उपयोग करतात.

भारतातील उत्पादन : केरळ, कर्नाटक इ. नारळ पिकविणाऱ्या मुख्य राज्यांत खोबऱ्याचे उत्पादन होते. केरळात तयार झालेल्या खोबऱ्याचा तेल मिळविण्यासाठी जास्त प्रमाणावर उपयोग होतो, तर कर्नाटकात तयार झालेले खोबरे खाण्यासाठी वापरतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, अंदमान व निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे येथेही अल्प प्रमाणावर खोबऱ्याचे उत्पादन होते. केरळात २,३३,००० टन खोबऱ्याचे उत्पादन होते.

खोबरेलाचे उत्पादन करणारी भारतातील प्रमुख केंद्रे म्हणजे मुंबई व केरळातील अलेप्पी, कोचीन, कालिकत इ. होत. केरळातील २,३३,००० टन खोबऱ्यापैकी सु. १ लक्ष टन खोबरे गाळून ६२,००० टन खोबरेलाचे उत्पादन होते. उरलेल्या १,३३,००० टन खोबऱ्याचे मुंबईत गळीत होते.

पहा : तेले व वसा नारळ.

संदर्भ : 1. Menon, K. P. V. Pandalai, K. M. The Coconut palm : A Monograph, Ernakulam, 1960.

          2. Piggot, C. J. Coconut Growing, London, 1964.

जमदाडे, ज. वि.