क्रेमर, पॉल जॅक्सन : (८ मे १९०४– ). अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पती व पाणी यांच्या परस्परसंबंधाच्या संशोधनामुळे त्यांची विशेष ख्याती झाली आहे. त्यांचा जन्म अमेरिकेतील ब्रुकव्हिल, इंडियाना येथे झाला व त्यांचे शिक्षण मियामी विद्यापीठ, ऑक्सफर्ड (ओहायओ) येथे झाले. नंतर ओहायओ राज्य विद्यापीठात त्यांनी वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास केला व १९३१ मध्ये पीएच्. डी. पदवी संपादन केली. पुढे ड्यूक विद्यापीठात ते जेम्स बी. ड्यूक प्राध्यापक, सारा पी. ड्यूक उद्यानाचे संचालक व फायटोट्रॉन कमिटीचे अध्यक्ष झाले. १९६०-६१ मध्ये नॅशनल सायन्स फौंडेशन संस्थेत ते नियामक जीवविज्ञानाचे कार्यक्रम-संचालक होते. १९६२ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली.
वनस्पतीतील जलशोषणामध्ये दोन यंत्रणा असतात, ह्या ओटो रेनर (१९१५) यांच्या मताला क्रेमर यांनी पुष्टी देऊन त्याला बळकटी आणली. पाण्याचे जास्तीतजास्त शोषण मुळांच्या टोकाशी होत नसून त्यामागे जेथे ⇨प्रकाष्ठाचे प्रभेदन (कार्य-विभागणीनुसार होणारे रूपांतरण) पूर्ण झाले आहे तेथे होते. तसेच पाण्याचे बरेचसे शोषण वृक्ष व इतर बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणाऱ्या) क्षुपांच्या (झुडपांच्या) बाबतीत स्यूबेरीनवेष्टित मुळांच्या द्वारे होत असावे, असे क्रेमर यांनी प्रतिपादन केले. प्लँट अँड सॉइल वॉटर रिलेशनशिप्स (१९४९) व टी. टी. कोझ्लोस्कीसमवेत फिजिऑलॉजी ऑफ ट्रीज (१९६०) हे ग्रंथ आणि शास्त्रीय नियतकालिकांतून अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत.
पहा : वनस्पति व पाणी.
परांडेकर, शं. आ.