गवत, रोशा : ( हिं. रूसघास, गंधेजघास क. वसनचुल्लू सं. रोहिश इं. जिंजर ग्रास, रोशा ग्रास, पाम-रोझा लॅ. सिंबो पोगॉन मार्टिनी कुल-ग्रॅमिनी ). ह्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या ) सु. १·५–२·४ मी. उंच वाढणाऱ्या व गोड वासाच्या गवताची लागवड भारतात खानदेश, नासिक, बडोदे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हैदराबाद इ. भागांत करतात. त्याचा प्रसार पंजाब, सिंध, अफगाणिस्तान, उ. आफ्रिका ते मोरोक्कोपर्यंत आहे. जावात व सुमात्रातही याच्या लागवडी आहेत. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), सापेक्षतः अधिक पसरट, रुंद, काहीशी
ह्रदयाकृती किंवा तळाशी गोल व खाली निळसर असतात. फुले १२–१८ मीमी. लांब, तिरप्या कणिशात ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात. ‘मोतिया’ व ‘सोफिया’ असे याचे दोन प्रकार असून ते भिन्न परिस्थितीत वाढतात आणि त्यांच्या स्वरूपात किरकोळ फरक दिसतात. फुलांपासून ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव अलग करण्याच्या क्रियेने) सुगंधी तेल मिळते. मोतिया प्रकारापासून मिळणारे सुवासिक तेल उच्च प्रतीचे असून त्याला ‘पाम-रोझा तेल’ म्हणतात ते गुलाबाच्या अत्तरात मिसळतात. त्यालाच रोशा किंवा ‘ ईस्ट इंडियन जिरेनियम तेल’ म्हणतात. इतर कित्येक अत्तरे, तंबाखू, सौदर्यप्रसाधने, साबण इत्यादींत ते वापरतात. सोफिया प्रकारापासून काढलेले तेल हलक्या प्रतीचे असून त्याला ‘जिंजरग्रास तेल’ म्हणतात. व ते विशेषतः सुवासिक साबणाकरिता वापरतात. भारतात तयार होणाऱ्या बाष्पनशील (उडून जाणाऱ्या) तेलांमध्ये चंदनाच्या खालोखाल या तेलांचा क्रमांक लागतो
पाम-रोझापासून उत्तम जिरॅनिऑल काढतात व त्याचा उपयोग सुगंधी द्रव्यांच्या धंद्यात बराच करतात.
पहा : ग्रॅमिनी गवते.
जमदाडे, ज. वि.
“