क्रिश्चनस्टॅड : स्वीडनच्या क्रिश्चनस्टॅड परगण्याची राजधानी. लोकसंख्या ४२,८१९ (१९६९). हे दक्षिण स्वीडनमध्ये माल्मच्या ईशान्येस ९७ किमी. असून त्याचे ऑर्हूस हे बाल्टिक समुद्रावरील उत्कृष्ट बंदर आग्नेयीस १८ किमी. आहे. हे सडका व लोहमार्ग यांचे महत्त्वाचे केंद्र असून माल्म व स्टॉकहोम यांच्याशी विमानमार्गाने जोडलेले आहे. येथे लोकरी कापड, पुठ्ठा व पीठ यांच्या गिरण्या, बीटसाखर व तेलशुद्धीकरण, यंत्रे, विटा, अन्नप्रक्रिया यांचे कारखाने, कत्तलखने इ. आहेत. हे स्वीडनच्या सरहद्दीवर डॅनिश किल्ला म्हणून १६१२ मध्ये स्थापन झाले. १६५८ मध्ये स्वीडनने, १६७६ मध्ये पुन्हा डेन्मार्कने आणि अखेर १६७८ मध्ये स्वीडनने जिंकून घेतले. तेथील सतराव्या शतकातील चर्च, राजवाडा, त्यातील हल्लीचे संग्रहालय, तांत्रिक महाविद्यालय इ. प्रसिद्ध आहेत.
कुमठेकर, ज. ब.