कूमासी : घाना देशाच्या अशांटी प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,८१,६०० (१९६८). आफ्रिकेच्या घनदाट जंगलप्रदेशात, कोको लागवडीच्या क्षेत्रात वसलेले हे व्यापारी व लोहमार्ग आणि सडका यांचे केंद्र ॲक्रापासून सु. २०० किमी. आहे. येथे कोको, प्राणी, कातडी, फळे, इमारती लाकूड इत्यादींचा मोठा व्यापार चालतो. कापड विणणे, सोने व चांदी यांचे काम, सुतारकाम, पादत्राणे बनविणे, छपाई हे येथील इतर उद्योग होत. इंग्रजांनी दोनदा उद्ध्वस्त केल्यानंतरची नगररचना आधुनिक धर्तीवर आहे. रुंद बांधीव रस्ते, सार्वजनिक उद्याने, विद्यालये, शेतीसंशोधन केंद्र, अशांटी संस्कृती केंद्र, वस्तुसंग्रहालय, प्राणिसंग्रहालय, रुग्णालय, न्यायालय, ग्रंथालय, प्रार्थना मंदिरे, कूमासी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, स्वातंत्र्यप्राप्तीचे स्मारक म्हणून उभारलेले क्रीडाप्रेक्षागृह इ. आधुनिक संस्था व इमारती येथे आहेत. घानाच्या स्वातंत्र्यचळवळीचे हे एक प्रमुख केंद्र होते.
कुमठेकर, ज. ब.