कूब्लाईखान

कूब्‍लाईखान : (? १२१५ ? — ? १२९४). मंगोल सम्राट. चीनमधील युआन वंशाचा संस्थापक व एक जगप्रसिद्ध राजा. चंगीझखानाचा नातू आणि चीनमधील तोलुई किंवा तुले ह्या चंगीझखानच्या सर्वात धाकट्या मुलाचा चौथा मुलगा. आपल्या मंगू ह्या थोरल्या  भावाच्या मृत्यूनंतर १२५९ मध्ये तो गादीवर आला. मंगूच्या कारकिर्दीत पूर्वेकडील भागावर तो प्रमुख शासक होता. त्यावेळी त्याने सुंग वंशाविरुद्धच्या अनेक लढायांत भाग घेऊन बराचसा प्रदेश मंगोल साम्राज्यात समाविष्ट केला. मंगूच्या मृत्यूनंतर दरबारातील जाणकार अमीरउमरावांनी कूब्‍लाईची वारस म्हणून निवड केली. त्यास प्रथम त्याचा धाकटा भाऊ ह्याचा विरोध झाला, पण तो त्याने मोडून काढला. स्थिरस्थावर झाल्यावर त्याने शेजारील राज्यांना आपले मांडलिक करण्याचे धोरण आखले. जी राज्ये त्याचे धोरण नाकारीत, त्यांवर त्याने चढाई केली. काहींत त्यास यश आले परंतु बहुतेक चढाया अयशस्वी व खर्चाच्या झाल्या. तथापि त्याचे साम्राज्य मंगोल वंशातील इतर कोणत्याही राजापेक्षा विस्ताराने मोठे होते.

त्याने परंपरा आणि रूढी ह्यांना सांभाळून चीनमध्ये अनेक मौलिक सुधारणा केल्या. चीनच्या लोकांना आपलेपणा वाटावा म्हणून प्रथम त्याने त्यांची अनेक बिरुदे धारण केली. चीनची परंपरागत चालत आलेली नोकरशाहीपद्धत बंद करून गुणवान लोकांना त्याने नोकरीत प्रवेश दिला. बहुतेक उच्चाधिकारी मंगोल असत. धर्माच्या बाबतीत सहिष्णुतेचे धोरण ठेऊन, त्याने पोलोबंधूंना पोपकडे धाडून ख्रिस्ती धर्मप्रचारक व शिक्षणतज्ञ यांना प्रथम बोलाविले. परंतु पोपने म्हणावा तसा प्रतिसाद कूब्लाईच्या ह्या धोरणास दिला नाही. म्हणून त्याने तिबेटमधील फॅग्स-पा या लामास चीनमधील बुद्धपीठाचे प्रमुख नेमून बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला. पुढे त्याने चिनी वर्णाक्षरांऐवजी मंगोल वर्णाक्षरे प्रचारात आणली व विद्वानांच्या साहाय्याने चिनी इतिहासग्रंथांचे भाषांतर केले. मात्र त्याची मंगोल लिपी फारशी लोकप्रिय झाली नाही. त्याने तिन्‌त्सी आणि हँगचाऊ ह्यांमधील कालवा दुरुस्त करून शेतीस प्रोत्साहन दिले. तसेच दुष्काळ व नैसर्गिक आपत्तींत धान्य टंचाई पडू नये, म्हणून धान्याची मोठी कोठारे बांधली आणि आणीबाणीच्या वेळी कुळांना शेतसारा माफ केला. सर्व देशात कार्यक्षम टपालखात्याची व्यवस्था त्याने सुरू केली. अपंग, वृद्ध व अनाथ ह्यांच्या संगोपनासाठी व्यवस्था करून त्यांच्या शिक्षणाचीही सोय त्याने केली. त्याच्या काळी काळगणनापद्धतीत आमूलाग्र असे बदल करण्यात आले. त्याने शासनातर्फे अकादमी आणि वेधशाळा स्थापन करून नवीन संशोधनास चालना दिली.

कूब्लाईने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी क्षेत्रांत सुधारणा करून प्रशासन कार्यक्षम केले. तसेच विद्वानांना आश्रय देऊन प्राचीन चिनी संस्कृती, साहित्य आणि परंपरा ह्यांना प्रोत्साहन दिले. मार्को पोलो तर त्याच्या दरबारात वीस वर्षे होता. त्याने आपल्या प्रवासवर्णनात कूब्‍लाईविषयी माहिती दिली आहे. कूब्‍लाई वयाच्या ऐंशीव्यावर्षी मरण पावला. त्याला चार राण्या होत्या. शिवाय त्याच्या जनानखान्यात अनेक सुंदर स्त्रिया असत. त्याने आपला आवडता मुलगा जिंगीम ह्याची वारस म्हणून निवड केली होती परंतु तो १२७३ मध्येच निधन पावला. पौर्वात्य, पाश्चात्त्य तसेच मुसलमान इतिहासकार त्याचे एक थोर राजा असे वर्णन करतात.

देशपांडे, सु. र.