कुलाई : (कुली गु. करलिनी भाजी लॅ. क्लोरोफायटम ट्युबरोजम कुल-लिलिएसी). ही एक वर्षायू (एक वर्ष जगणारी) आकर्षक लहान ⇨ ओषधी भारतात रानावनात (कुरणात) जंगली अवस्थेत आढळते शिवाय ब्रह्मदेश, इथिओपिया इ. देशांतही आढळते. हिची मुळे ग्रंथिल असतात. पाने साधी, मूलज (मुळापासून निघालीत अशी वाटणारी), अवृंत (बिनदेठाची), कोयत्यासारखी, लांबट व तरंगित कडांची असून त्यांच्या झुबक्यातून जुलै-ऑगस्टमध्ये पांढऱ्या फुलांची मंजरी येते. इतर लक्षणे ⇨ लिलिएसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. हिच्या लंबगोल बोंडात १०–१२ काळ्या, गोल बिया असतात. बागेची शोभा वाढविण्यास उपयुक्त. पानांची भाजी (पंचमेळी भाजीपैकी एक) श्रावणात शनिवारी हिंदू धर्मीय खातात.
जगताप, अहिल्या पां.