कोर्बा : मध्य प्रदेशाच्या बिलासपूर जिल्ह्यात कोळशाच्या नवीन खाणींजवळचे गाव लोकसंख्या उपनगरांसह ३२,६५४ (१९७१). येथे मोठे औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्र आहे. भिलाई पोलाद प्रकल्पासाठी वीज बव्हंशी येथूनच पुरविण्यात येते. त्या कारखान्यासाठी कोळसादेखील इथलाच उपयोगात येत आहे. या केंद्राची उत्पादनशक्ती तिसऱ्या योजनेत रशियन सहकार्याने १०० पासून ३०० मेगॅवॉटपर्यंत वाढविण्यात आली. बॉक्साइटपासून एक लाख टन ॲल्युमिनियम उत्पादन निघू शकेल, असा प्रकल्प येथे उभारण्याची भारत सरकारची योजना असून कोर्बा येथे कॉस्टिक सोडा, क्लोरिन इत्यादींचे कारखाने काढण्यास खासगी कंपन्यांना परवानगी मिळाली आहे. बिलासपूर–रायगढ हा रेल्वेचा फाटा कोर्बापर्यंत जातो.

ओक, शा. नि.