गरुड-१ : (ॲक्विला, व्हल्चर). खगोलीय विषुववृत्तावरील एक तारकासमूह. हा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस रात्री नऊच्या सुमारास मध्यमंडलावर (निरीक्षकाचे ख:स्वस्तिक व खगोलाचे ध्रुवबिंदू यांतून जाणाऱ्या वर्तुळावर) येतो. याच्या उत्तरेस शर, पूर्वेस धनिष्ठा, दक्षिणेस धनू आणि पश्चिमेस शौरी व भुजंग हे तारकासमूह आहेत. यांमधून आकाशगंगा दुभंगून गेली आहे. याच समूहात आकाशगंगेचे विषुववृत्त व खगोलीय विषुववृत्त यांचा छेदनबिंदू [होरा १८ ता. ४० मि. → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] असून त्याच्यापासून पूर्वेकडे आकाशगंगेतील रेखांश मोजतात. यात सहाव्या प्रतिपर्यंतचे [→ प्रत] एकूण चाळीस तारे आहेत. यामध्ये दुर्बिणीतून पुष्कळ तारे, तारकायुग्म व काही विरल तारकागुच्छ (उदा., एम ११) दिसतात. यातील सर्वांत मोठा तारा अल्टेर (आल्फा) याची प्रत ०·८ असून तेजस्वीपणात सर्व आकाशात याचा बारावा क्रमांक लागतो (होरा १९ ता. ४८ मि., क्रांती ८ उ.). तो सूर्यकुलापासून १६ प्रकाशवर्षे दूर म्हणजे अगदी जवळच्या ताऱ्यांपैकीच आहे. त्याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या सु. दीडपट आहे. त्याच्या एका बाजूस बीटा व दुसऱ्या बाजूस गॅमा हे दोन तारे आहेत. या तिन्हींची रेषा उत्तरेकडे वाढविली, तर ती अभिजित या ताऱ्यातून जाते. गरुडातील ईटा व यू हे सेफीड चल (ज्यांची भासमान प्रत ठराविक कक्षेत बदलते असे) तारे आणि आर हा दीर्घकालीन चल तारा आहे. यात नवदीप्त (ज्यांची दीप्ती अचानकपणे कित्येक पटींनी वाढते व लवकर पूर्ववत होते असे) तारेही आढळतात. १९१८ साली ॲक्विली तिसरा हा नवदीप्त तारा आढळला होता, तो व्याधाच्या खालोखाल तेजस्वी होता. यातील आल्फा, बीटा व गॅमा हे तीन तारे मिळून श्रवण नक्षत्र होते. भारतीय पुराणकथेनुसार हा गरुड दक्षकन्या विनतेच्या अंड्यातून जन्माला आला व दास्यमुक्त होण्यासाठी देवांशी युद्ध करून मिळविलेला अमृतकुंभ त्याने नागांना दिला. गॅनीमीडला देवांकडे नेताना जूपिटरने या काळ्या गरुडाचे रूप घेतले होते, अशी ग्रीक पुराणकथा आहे. 

पहा : श्रवण                                                               

ठाकूर, अ. ना.