गरजते चाळीस : मध्यम ते अतिद्रुतवेगी पश्चिमी वाऱ्यांची, दक्षिण गोलार्धातील ४०० ते ५०० कटिबंधातील अक्षवृत्ते.
दक्षिण गोलार्धात ३०० ते ४०० अक्षवृत्तांच्या पट्ट्यात हवेचा दाब सातत्याने अधिक असतो. उपोष्ण कटिबंधीय उच्च वातावरणीय दाबांची क्षेत्रे ह्याच भागात आढळतात. येथपासून तो थेट ६०० द. अक्षवृत्तावरील उपध्रुवीय क्षेत्रापर्यंत हवेचा दाब कमी होत जातो. अंटार्क्टिक वर्तुळानंतर न्यून (कमी) वातावरणीय दाबाचे क्षेत्रच निर्माण झालेले असते. त्यामुळे ३५० ते ६०० द. अक्षाशांच्या पट्ट्यात वाहणारे वारे पश्चिमी असतात. वर्षभर ते जोरदारपणे वाहत असतात. सरासरी मानाने त्यांचा वेग ताशी ३० ते ५० किमी. असतो. ह्याच मध्य कटिबंधीय प्रदेशात अनेक अभिसारी चक्रवात [→ चक्रवात] निर्माण होऊन ते पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. त्यांच्या अंमलाखाली वाऱ्यांच्या दिशांत (घड्याळाच्या काट्यांच्या) उलटसुलट दिशेने बदल झाले तरी मुख्यत्वेकरून प्रचलित वाऱ्यांची दिशा पश्चिम हीच राहते. दक्षिण गोलार्धातील ३५० ते ६०० ह्या अक्षवृत्तांच्या पट्ट्यात महासागरांचे जवळजवळ अखंडित जलपृष्ठ असल्यामुळे वाऱ्यांच्या गतीत फारसा फरक पडत नाही. ते बहुधा स्थिरगती व स्थिरमार्गी राहतात. उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तातील वारे ऋतुमानाप्रमाणे जशी आपली गती आणि दिशा बदलतात, तसे दक्षिण गोलार्धातील त्याच अक्षवृत्तीय पट्ट्यातील वारे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपली दिशा व वेग बदलत नाहीत. उलट ते सातत्याने पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदारपणे वाहतात, हे मध्ययुगीन नावाड्यांच्या प्रत्ययाला आले होते. त्यामुळे त्या नावाड्यांनीच दक्षिण गोलार्धातील सतत द्रुतगती पश्चिमी वाऱ्यांच्या ४०० ते ५०० द. अक्षवृत्तीय पट्ट्याला ‘गरजते चाळीस’ हे नाव दिले.
ही प्रतिव्यापारी वाऱ्यांची अक्षवृत्ते आहेत. येथे चक्रवातांच्या मालिकेबरोबर वर्षभर झंझावाती वारे वाहत असतात, नीच स्तरीय मेघांनी आकाश आच्छादिलेले असते, हवा अतिशय थंड व आर्द्र असते, मोठ्या प्रमाणावर पर्जन्य व हिमवृष्टी होत असते. क्वचित प्रसंगी मोठे हिमनग दक्षिणेकडून येऊन इतस्तत: फिरत असतात. मोठ्या जहाजांनाही ह्या गरजत्या चाळीस अक्षवृत्तातील प्रवास धोक्याचा असतो. उत्तर अटलांटिकमधील ४०० ते ५०० उ. अक्षवृत्तांमधील पट्ट्यासही काही वेळा ‘गरजते चाळीस’ हे नाव देण्यात येते.
गोखले, मो. ना.