क्यूव्ह्ये, बाराँ झॉर्झ लेऑपॉल्द क्रेत्यँ फ्रेदेरिक दागॉबेअर : (२३ ऑगस्ट १७६९–१३ मे १८३२). एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वकाळातील एक श्रेष्ठ फ्रेंच प्रकृतिवैज्ञानिक. तुलनात्मक शारीर (शरीररचना शास्त्र) आणि जीवाश्मविज्ञान (शिळारूप अवशेषांवर आधारलेला भूवैज्ञानिक काळातील प्राणिजीवनाचा अभ्यास) या विषयांच्या अध्ययनाचा पाया त्यांनी घातला. त्यांचा जन्म माँटबोलिआर्ड येथे झाला. आपल्या आईच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या मृत भावाचे झॉर्झ हे नाव धारण केले आणि याच नावाने ते ओळखले जात. लहानपणीच त्यांनी ब्युफाँ यांच्या ग्रंथांतील चित्रांच्या नकला केल्या होत्या. त्यांचे रेखाटन आणि रंगकाम अतिशय अचूक होते. यामुळे त्यांच्या ठिकाणी प्रकृतिविज्ञानाची आवड उत्पन्न झाली.

ॲकॅडेमी ऑफ स्टटगार्टमध्ये चार वर्षे प्राणिशास्त्राचे शिक्षण घेतल्यावर वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी नॉर्मंडीमध्ये काँटे द हेरिसी यांच्या कुटुंबात त्यांनी शिक्षकाची जागा पतकरली. तेथे त्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील प्राणी आणि जीवाश्म यांचा अभ्यास केला. याच वेळी कृषितज्ञ टेझिए यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी आपला मित्र आणि सुप्रसिद्ध प्रकृतिवैज्ञानिक ई. झॉफ्रवा सां-तेलेअर यांच्याशी त्यांचा परिचय करून दिला. या परिचयामुळेच पुढे म्युझियम नॅशनल द हिस्टॉरी नॅचरेल या संस्थेत तुलनात्मक शारीराच्या प्राध्यापकाचे साहाय्यक म्हणून १७९५ मध्ये त्यांची नेमणूक झाली. याच वर्षी इन्स्टिट्यूट नॅशनल या संस्थेची स्थापना झाली आणि तिचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली. या संस्थेच्या उद्‍घटनाच्या वेळी त्यांनी जीवाश्मविज्ञानावरील आपला पहिला निबंध वाचला. तो पुढे १८०० मध्ये प्रसिद्ध झाला. १७९८ मध्ये त्यांनी आपला पहिला स्वतंत्र ग्रंथ Tableau e’le’mentaire de l’histoire naturelle des animaux प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या प्राणिसृष्टीच्या स्वाभाविक वर्गीकरणाविषयीचे सर्वसाधारण स्पष्टीकरण आणि त्यांनी सुचविलेल्या वर्गीकरण पद्धतीचा पाया म्हणता येईल. ही पद्धती लिनीअस यांच्या वर्गीकरण पद्धतीपेक्षा जास्त प्रगत होती. क्यूव्ह्ये यांना प्राण्यांची व्हर्टिब्रेट (पृष्ठवंशी), मॉलस्क (मृदुकाय), आर्टिक्युलेट आणि रेडिएट ही चारच प्ररूपे (ज्यावरून जातीचे अगर वंशाचे गुणधर्म ठरवितात असे व्यक्तिगत जीवाचे नमुने) मान्य होती. १७९९ मध्ये कॉलेज द फ्रान्समध्ये ते प्रकृतिविज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी आपला Lecons d’anatomie compare’e हा ख्यातनाम ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथात त्यांनी ‘एखाद्या अंगाचे कार्य जर बदलले तर त्याला अनुसरून त्याच्या संरचनेतही बदल होतो’ या आपल्या कार्य आणि संरचना यांच्या परस्परावलंबित्वाच्या सिद्धांताचे विवरण केले आहे.

मॉलस्कांची संरचना व वर्गीकरण, माशांचे तुलनात्मक शारीर व वर्गीकरण आणि सस्तन प्राणी व सरीसृप (सरपटणारे प्राणी) यांचे जीवाश्म आणि याच वर्गातील जिवंत प्राण्यांचे अस्थिविज्ञान या विषयांच्या संशोधनाला आणि अभ्यासाला त्यांनी आपल्याला वाहून घेतले होते. मॉलस्कांवरील त्यांचा L’Anatomie des mollusques (१८६०) हा या विषयावरील व्यापक ग्रंथ होय. व्हॅलेन्शिएनीस यांच्या मदतीने त्यांनी लिहिलेल्या Histoire naturelle de poisons या ग्रंथात माशांच्या जिवंत व जीवाश्म प्रकारांची समग्र माहिती दिलेली आहे. 

जार्डिन डेस प्लँटेस या संस्थेत ते १८०२ साली नामधारी प्राध्यापक झाले. १८०३ मध्ये ते इन्सिट्यूट नॅशनलचे कायम चिटणीस झाले. १८०८ मध्ये लोकशिक्षणाच्या पुनर्रचनेचे कार्य त्यांनी हाती घेतले आणि नेपोलियन यांचा पाडाव होण्याच्या काही काळ आधी त्यांना कौन्सिल ऑफ स्टेटमध्ये प्रवेश मिळाला. यानंतर ते पॅरिस विद्यापीठाचे कुलगुरू झाले. अठराव्या लुईंनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले पण वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यास त्यांचा विरोध असल्यामुळे ते दहावे चार्ल्‌स यांच्या मर्जीतून उतरले. लुई फिलिप यांनी १८३१ मध्ये त्यांना ‘पिअर’ (बडा सरदार) हा किताब दिला आणि १८३२ मध्ये गृहमंत्रिपदी त्यांची नेमणूक झाली. राष्ट्रीय शिक्षणाची सुधारणा आणि फ्रेंच प्रॉटेस्टंट चर्च व विज्ञानाचा अभ्यास यांच्या प्रगतीसाठी त्यांनी सारख्याच उत्साहाने अविश्रांत काम केले. पण पक्षाघाताने आजारी पडल्यामुळे त्यांचा आयुष्यक्रम एकाएकी खुंटला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.  

जमदाडे, ज. वि.