कोरिऑलिस परिणाम : फ्रेंच गणिती गास्पार ग्यूस्ताव्ह द कोरिऑलिस (१७९२–१८४३) यांनी असे निदर्शनास आणून दिले की, न्यूटन यांचा गतिविषयक दुसरा नियम (प्रेरणा = वस्तुमान x प्रवेग) हा केवळ, प्रवेग (दर सेकंदास होणारा वेगामधील बदल) नसलेल्या संदर्भव्यूहापुरताच (ज्या व्यूहाशी नेहमी निर्देशिला जातो त्या पुरताच) सत्य असतो. प्रवेग असणाऱ्या संदर्भव्यूहात अथवा परिवलन करणाऱ्या संदर्भव्यूहसापेक्ष एखाद्या पदार्थाची गती त्या पदार्थावर लावलेल्या प्रत्यक्ष प्रेरणेच्या अनुरोधाने पूर्णपणे समजू शकत नाही. संदर्भव्यूहाचे परिवलन अपसव्य (घड्याळ्यातील काट्यांच्या गतीच्या विरुद्ध) असेल, तर परिवलनाक्षाला काटकोनात असलेली गती न्यूटन यांच्या नियमानुसार ज्या दिशेस ठरली असती, त्या दिशेच्या उजवीकडे झुकलेली ती प्रत्यक्षात दिसते. संदर्भव्यूहाचे परिवलन सव्य असेल, तर ती गती डावीकडे झुकलेली दिसते. या परिणामास ‘कोरिऑलिस परिणाम’ असे म्हणतात. अन्य शब्दांत असे म्हणता येईल की, परिवलन करणाऱ्या संदर्भव्यूहातील एखाद्या पदार्थाच्या गतीस न्यूटनप्रणीत गतिविषयक दुसरा नियम लागू करावयाचा असल्यास, त्या पदार्थावर लावलेल्या प्रत्यक्ष प्रेरणेव्यतिरिक्त आणखी एक काल्पनिक प्रेरणा त्या पदार्थावर लावलेली आहे, असे मानावे लागते. या प्रेरणेचे परिमाण २ × संदर्भव्यूहाचा कोनीय वेग x पदार्थाचा परिवलनाक्षाला काटकोनात असलेला वेग इतके असते. संदर्भव्यूहाचे परिवलन अपसव्य असताना ही काल्पनिक प्रेरणा गतिमान पदार्थाची गती उजवीकडे वळविते आणि परिवलन सव्य असताना ही प्रेरणा गतिमान पदार्थाची गती डावीकडे वळविते. या प्रकारची काल्पनिक प्रेरणा मानावी लागण्याची आवश्यकता कोरिऑलिस यांनी प्रथम सुचविली म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या प्रेरणेस कोरिऑलिस प्रेरणा म्हणण्याचा प्रघात आहे. कोरिऑलिस प्रेरणेमुळे पदार्थाला जो प्रवेग येतो त्यास कोरिऑलिस प्रवेग म्हणतात.
पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे परिवलन करते त्यामुळे पृथ्वीशी निगडित असलेल्या संदर्भव्यूहातील पदार्थाची गती विचारात घेताना कोरिऑलिस परिणाम विचारात घ्यावा लागतो. पृथ्वीच्या संदर्भात कोरिऑलिस प्रेरणेस ‘भूवलनोत्पन्न प्रेरणा’ असेही म्हटले जाते. कोरिऑलिस परिणामामुळे उत्तर गोलार्धात एखाद्या क्षैतिज प्रतलातील (क्षितिज समांतर पातळीतील) पदार्थाची गती उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळविली जाते. तसेच, पूर्व-पश्चिम उदग्र (उभ्या) प्रतलातील वर जाणारा पदार्थ पश्चिमेकडे वळविला जातो आणि खाली पडणारा पदार्थ पूर्वेकडे वळविला जातो. कोरिऑलिस प्रवेगाच्या क्षैतिज घटकाचे परिमाण विषुववृत्तावर शून्य असते, तर ध्रुवावर ते महत्तम असते. वातावरणविज्ञानात व महासागरविज्ञानात व्यापक स्वरूपाच्या वायुप्रवाहांचा किंवा सागरी प्रवाहांचा विचार करताना कोरिऑलिस परिणाम लक्षात घ्यावा लागतो. प्राक्षेपिकी समस्या (उदा., रॉकेट क्षेपण) सोडविण्यात कोरिऑलिस प्रेरणेचा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
कोरिऑलिस परिणामाची अनेक उदाहरणे दाखविता येतील. उत्तर गोलार्धात उत्तरेकडे रोखलेले तोफांचे गोळे थोडे पूर्वेकडे, पूर्वेकडे रोखलेल्या तोफांचे गोळे थोडे दक्षिणेकडे, दक्षिणेकडे रोखलेल्यांचे थोडे पश्चिमेकडे व पश्चिमेकडे रोखलेल्यांचे थोडे उत्तरेकडे झुकतात. आगगाड्या, विमाने, जहाजे इ. वाहनांच्या गतीवर याच स्वरूपाचा परिणाम होतो. कोरिऑलिस परिणाम हळूहळू नद्यांचे प्रवाह बदलण्यास कारणीभूत असतो. उत्तर गोलार्धातील नद्यांचे प्रवाह या परिणामामुळे उजवीकडे वळविले जातात. त्यामुळेच उत्तर गोलार्धातील नद्यांचे उजवे तीर अधिक उंच चढण असलेले असे होतात. महासागरांतील प्रवाहही कोरिऑलिस परिणामाने प्रभावित झालेले आहेत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून उत्तरेकडे वाहणारा गल्फ स्ट्रीम नावाचा उष्ण सागरी प्रवाह या परिणामामुळेच पुढे पूर्वेकडे वळविला गेला आहे. त्याचा यूरोप खंडाच्या जलवायुमानावर (दीर्घकालीन सरासरी हवामानावर) होणारा परिणाम सुपरिचित आहे.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मानाने कोरिऑलिस प्रेरणा बरीच क्षीण म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या जवळजवळ एक लक्षांश आहे. तथापि, पृथ्वीवरील वायुराशींच्या व जलराशींच्या वेगांवर त्याचा विचारार्ह परिणाम झालेला आढळतो. वातावरणातील अभिसारी व अपसारी चक्रवात (ज्या चक्रवातात हवा अनुक्रमे केंद्रीय प्रदेशाकडे जाते किंवा केंद्रीय प्रदेशातून बाहेर येते असे चक्रवात), तसेच विविध कटिबंधातील वारे कोरिऑलिस परिणामाचेच परिपाक होत.
संदर्भ : 1. Byers, H.R. General Meteorology, New York, 1959.
2. Gordon, A.M. Elements of Dynamic Meteorology, New York, 1962.
3. Haurwitz, B. Dynamic Meteorology, New York, 1941.
गोखले, मो. ना.