कोरफड:(हिं. घी-कुंवारगु. कडवी-न्हानी कुंवरक.लोळिसर सं. इक्षुर्मल्लिका, कुमारी, घृत-कुमारी, अतिपिच्छला इं. इंडियन ॲलो लॅ.ॲलो वेरा कुल-लिलिएसी). या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) लहान मांसल ओषधीचे[→ओषधि] मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून उष्णकटिबंधात ती सर्वत्र पसरली आहे. द. भारतात ती रानटी अवस्थेतही आढळते. वेस्ट इंडिजमध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे. कोरफडीच्याॲलोवंशातील कित्येक जाती फक्त शोभेकरिता बागेत लावतात. अनेक उद्यानांत व घरी कुंड्यांत ती लावलेली दिसते. उष्ण हवा, कोरडी खडकाळ जमीन, समुद्रकिनारा अशा ठिकाणी ती चांगली वाढते. मूलक्षोड (जमिनीत आडवे वाढणारे खोड) लहान, जाड, थोडेफार विभागलेले ओषधी जास्तीत जास्त ०·६–०·९ मी. उंचपाने मांसल, ०·४–०·६ मी. लांब, एकांतरित (एकाआड एक), मूलज (मुळापासून निघाली आहेत अशी वाटणारी), अवृंत (बिनदेठाची), कुंतसम (भाल्यासारखी)अग्र व धारा कंटकित (लहान काटे असलेली)फिकट हिरव्या पानावर पांढरट ठिपक्यांच्या रांगा असतात. सर्व पानांचा एक झुबका बनतो व त्यामधून ऑगस्ट–डिसेंबरमध्ये लांब दांड्यावर अनेक लोंबत्या पिवळसर केशरी रंगाच्या लांबट फुलांचा फुलोरा (मंजरी) येतो. फुलांची संरचना व इतर सामान्य लक्षणे ⇨लिलिएसीकुलात वर्णिल्याप्रमाणे. बोंडे त्रिकोणी व अनेकबीजी असतात. पाने औषधी आहेत ती दीपक (भूक वाढविणारी), रेचक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी), कृमिनाशक, शामकमूळ शूलावर (तीव्र वेदनांवर) देतात. पाने कडवट, थंडावा देणारी व आरोग्य पुनःस्थापक असून नेत्र, प्लीहा (पानथरी), यकृत, श्वासनलिका इत्यादींच्या विकारावर व ज्वरामध्ये उपयुक्त. जुनाट जखमांवर पान बाहेरून लावण्यास गुणकारी ठरले आहे. गुजरातेत कोरफडीचे लोणचे करतात. पानांच्या रसापासून ‘काळा बोळ’ (एलिया) बनवितात तो पानाप्रमाणेच गुणकारी आहे. नवीन लागवड बियांनी व तिरश्चरापासून (मुनव्यापासून) रेताड जमिनीत करतात. द.आफ्रिकेतील रूक्ष प्रदेशात कोरफडीच्या वंशातीलकाही मोठ्या जाती लहान वृक्षासारख्या आहेत आणि त्यांच्याखोडात अनित्य द्वितीयक वृद्धी [→शारीर, वनस्पतींचे] आढळते.
जगताप, अहिल्या पां.
“