क्यँताल, आंतेरु द: (१८ एप्रिल १८४२–११ सप्टेंबर १८९१). एक श्रेष्ठ पोर्तुगीज कवी व तात्त्विक प्रवृत्तीचा गद्यलेखक. जन्म अझोर्समधील पाँता देल्गादा ह्या शहरी. १८६४ मध्ये त्याने कोईंब्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. सोनेतुश (इं. शी. सॉनेट्स) हा पहिला सुनीत संग्रह १८६१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर ऑदिश मोदेर्नाश (इं. शी. मॉडर्न ओड्स, १८६५) आणि प्रिमाव्हेराश रोमांतिकाश (इं. शी. रोमँटिक स्प्रिंग्ज, १८७२) यांसारखे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘मॉडर्न ओड्स’ मधील उद्देशिका तात्त्विक व संसृतिटीकात्मक आहेत. ‘रोमँटिक स्प्रिंग्ज’ मध्ये त्याच्या भावकविता आहेत. पारंपरिक धर्मश्रद्धेपासून शून्यवादी तत्त्वज्ञानापर्यंत आणि अखेर आध्यात्मिक आशावादाकडे कवीची वैचारिक उत्क्रांती कशी झाली, याचे दर्शन सोनेतुश काँप्लेतुश (इं. शी. कंप्लीट सॉनेट्स, १८८६) या त्याच्या सुनीतसंग्रहात घडते.
काव्झाश द देकादेंसिआ दुश पॉव्हुश पेनिन्सुलारिश (इं. शी. कॉजेस ऑफ डेकडन्स ऑफ द पिनिन्स्यूलर पीपल्स, १८७१) हे त्याचे वैशिष्ट्यपूर्ण गद्यलेखन होय.
असाधारण व संकुल व्यक्तिमत्त्वाचा हा कवी तत्कालीन वाङ्मयीन संप्रदायात बसविणे अशक्य आहे कारण भावनासंवेदनांना विवेकाचे व विवेकाला भावना संवेदनांचे रूप देऊन विचारभावांचे तात्त्विक संकल्पन साधणे व त्यातून आपले विचार, शब्द आणि कृती यांत संपूर्ण सुसंवाद साधणे, असे त्याच्या काव्याचे आगळे स्वरूप होते. कामाँइशच्या खालोखाल व बुकाज्यनंतर पोर्तुगीज सुनीतांत त्याचे उच्च स्थान आहे. बंदुकीची गोळी झाडून त्याने पाँता देल्गादा येथे आत्महत्या केली.
रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)