कौरी : (इं. कौरी पाइन लॅ. ॲगॅथीस ऑस्ट्रॅलिस कुल-ॲरॉकॅरिएसी). ह्या इंग्रजी नावाने ओळखला जाणारा हा भव्य वृक्ष ⇨ ॲरॉकॅरियाच्या कुलातील व ॲगॅथीस वंशातील शंकुमंत वृक्ष [→ चिली पाइन] आहे. या वंशातील सु. २० जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत मलायापासून न्यूझीलंडपर्यंत आढळतात. कौरीचा प्रसार न्यूझीलंडच्या उत्तरेच्या बेटावर असून त्याची विस्तीर्ण पण विरळ जंगले आहेत.
ह्या इंग्रजी नावाने ओळखला जाणारा हा भव्य वृक्ष ⇨ ॲरॉकॅरियाच्या कुलातील व ॲगॅथीस वंशातील शंकुमंत वृक्ष [→ चिली पाइन] आहे. या वंशातील सु. २० जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत मलायापासून न्यूझीलंडपर्यंत आढळतात. कौरीचा प्रसार न्यूझीलंडच्या उत्तरेच्या बेटावर असून त्याची विस्तीर्ण पण विरळ जंगले आहेत.
हा राळयुक्त वृक्ष सामान्यपणे २५–३० मी. (क्वचित ४५ मी.) उंच असून त्याच्या सरळ खोडावर गोलसर घुमटासारखा माथा असतो. व्यास सामान्यतः १–३ मी., क्वचित ४–६ मी., खोडावरची साल मोठ्या, सपाट खवल्यांनी सुटून जाते. कोवळ्या वृक्षावरची पाने बिनदेठाची, विरळ, रेषाकृती, लांबट भाल्यासारखी, ५–१० X १·५ सेंमी., जून वृक्षावर पाने अंडाकृती, पण लांबट (१·८–३·८ सेंमी. लांब) जाड व चिवट सिराविन्यास (शिरांची मांडणी) समांतर केसरदलांची लोंबती कणिशे एकाकी पक्व शंकू ५–७ सेंमी. व्यासाचे, उभे व गोलसर त्यांची रुंद, सपाट, पातळ शल्के (खवले) सुटून पडतात व प्रत्येकावर एकच चापट व सपक्ष बी असते.
याचे लाकूड मजबूत, टिकाऊ व सुतारकामास चांगले जहाजबांधणी, डोलकाठ्या, सजावटी सामान इत्यादींसाठी वापरतात. कोपल रेझीन (कौरी गम) या नावाची राळ, पूर्वी या वृक्षांची जंगले असलेल्या जमिनीत, मोठ्या प्रमाणावर साठलेली, १ – २ मी. खोलीवर सापडते. ती गर्द पिंगट किंवा रंगहीन व अर्धवट पारदर्शक असून रोगणाकरिता उपयुक्त असते.
जमदाडे, ज. वि.
“