गणपति : गणपती किंवा गणेश म्हणजे गणाचा स्वामी. गण म्हणजे समुदाय अथवा जमात. ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात ‘गणपति’ हे विशेषण वरील अर्थी योजले आहे. ब्रह्मणस्पती हा स्वतंत्र देव इंद्रादिकांसारखा ऋग्वेदात वर्णिला आहे. वेदांच्या संहिता व ब्राह्मणग्रंथ यांमध्ये गणपती ही स्वतंत्र देवता म्हणून कोठेही निर्देशिलेली नाही. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन, ‘तत्पुरुष’, ‘वक्रतुंड’ व ‘दंति’ या विशेषणांनी मैत्रायणी संहितेत आणि तैत्तिरीय आरण्यकातील ‘नारायणोपनिषद’ नामक अखेरच्या विभागात आले आहे. मूर्तिपूजकांच्या गरूड, दुर्गा, स्कंद इ. देवतांचाही त्याच संदर्भात निर्देश व वर्णन आले आहे. नारायणोपनिषद, आरण्यकाचा भाग असल्यामुळे त्याचा काल इ.स.पू.सहाव्या-पाचव्या शतकांपर्यंत पोहोचतो. परंतु हे मूर्तिपूजकांच्या देवतांचे निर्देश त्यात मागाहून आले आहेत, असे वा.वी.मिराशी यांचे मत आहे. गणपत्यथर्वशीर्ष  ह्या उपनिषदात गणपती देवाच्या मूर्तीचे वर्णन आले आहे परंतु हेही उपनिषद ईशादी प्राचीन उपनिषदांत इतिहासज्ञ अंतर्भूत करीत नाहीत. हे उपनिषद गुप्तकाळाच्या सुमाराचे असावे अशी उत्तरकालीन उपनिषदे शेकडो आहेत त्यांतच हेही गणले जाते.

लिंग, अग्नि, शिव, भविष्य इ. पुराणांमध्ये गजाननाच्या अवताराची कथा निरनिराळ्या प्रकारे आलेली आहे. गणेशपुराण नावाचे उपपुराणही आहे परंतु पुराणांमध्ये प्राचीन व अर्वाचीन असे पुष्कळ भाग मिसळले आहेत. पुराणांमध्ये भर पडत गेली व काही प्राचीन भागही त्यांतून गळत गेले आहेत. म्हणून ‘गजानन’ किंवा ‘गणपती’ या सद्यःस्वरूपातील देवतेचा कालनिर्णय करण्यास पुराणांचा फारसा उपयोग नाही. महाभारताच्या आदिपर्वात अशी सुप्रसिद्ध कथा आहे, की महाभारत लिहिले तेव्हा व्यासमुनींचा लेखक गणपती हा देव होता. परंतु ही कथा आदिपर्वात मागाहून निविष्ट केली असावी, असे महाभारत-संशोधकांचे मत आहे. भांडारकर संस्थेच्या संशोधित आवृत्तीतून ही कथा वगळली आहे.

गणपती किंवा गणेश ही विशेषणे मुळात रुद्र-शिवाची असावीत. मरूत् गणांचा स्वामी किंवा पिता म्हणून ऋग्वेदात रुद्राचा निर्देश अनेक वेळा आला आहे. भरताच्या नाटयशास्त्रात गणपती, गणेश, गणराज अशा अर्थाची विशेषणे वारंवार रूद्रालाच लावली आहेत. कौटिलीय अर्थशास्त्रात निरनिराळ्या देवांची देवळे कोठे बांधावीत, हे नगररचनेच्या संदर्भात सांगितले आहे. त्यांत गजानन ही देवता नाही. शिवपुत्र स्कंद हा मात्र सूत्रकालीन देव आहे, याबद्दल शंका नाही. बौधायन सूत्रात विनायकशांती आहे. हा विनायक गजानन किंवा गणपती म्हणून मानता येत नाही. हा एक विघ्नकर्ता, दुष्ट ग्रह आहे. याज्ञवल्क्यस्मृतीतही ही विनायकशांती सांगितली आहे. वायुपुराणात शिवाला ‘लंबोदर’ व ‘गजेंद्रकर्ण’ अशी विशेषणे लावली आहेत. गणपती हा शिवपुत्र होय, अशा कल्पनेचे हे मूळचे बीज होय. रुद्र-शिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतींच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबर, आर्यांनी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत हेही इ.स.पूर्व काळात गजानन हा देव आर्यपरंपरेत समाविष्ट झाला नव्हता, याचेच सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानाप्रमाणे ग्रामदेवता असावी. गणपती, हनुमान, देवी, वेताळ, आसरा (ऱ्या) इ. देवतांना शेंदूर फासतात. पूजाद्रव्यांतील शेंदूर हे द्रव्य आहे.

गणपती हा विघ्नकर्ता व विघ्नहर्ता असल्यामुळे, प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा सर्व हिंदू, बौद्ध व जैन यांच्यामध्ये आहे. शुभकार्यारंभी पूजनाच्या वेळी गणपतीची मूर्तीच असावी असे नाही. तांदूळ, सातू किंवा गहू यांच्या पुंजीवर सुपारी किंवा नारळ ठेऊन. त्यावर गणपतीचे आवाहन करून पूजा होते व अखेर त्याचे विसर्जन होते.

गणपतीचे शिर हे गजाचे असले, तरी त्याचा एक तुटलेला दात हातात असतो व दुसरा मुखाला असतो. त्याचे उंदीर हे वाहन आहे. तो चतुर्हस्त असून दात, पाश, अंकुश अशा वस्तू त्याने निरनिराळ्या हातांत धारण केलेल्या असून चौथा हात वरद असतो. ऋद्धी व सिद्धी ह्या त्याच्या पार्श्वदेवता होत. प्रारंभी तो द्विभुज असावा नंतर तो चार, आठ, दहा व सोळा हातांचा झाला. त्रिमुख गणपतीच्या मूर्ती जपानमध्ये व चतुर्मुख मूर्ती ख्मेरमध्ये आढळतात. शंकराप्रमाणेच काही मूर्तीच्या कमरेभोवती किंवा गळ्याभोवती सर्पाचे वेष्टन असते. तिबेटात गणपतीला नारीरूपातही भजतात. त्याचे उंदीर हे वाहन प्रसिद्ध असले, तरी सिंह हेही त्याचे वाहन नेपाळातील मूर्तींत दिसते. हिंदूंच्या घराच्या अथवा मंदिराच्या मुख्य द्वारावर गणपतीची मूर्ती कोरण्याची जुनी प्रथा आहे.

शिवपुत्र गणपतीच्या अनेक कथांपैकी एक कथा अशी : गणपती हा केवळ शिवाचा पुत्र होय. शिवाने आपल्या तपःसामर्थ्याने एक सुंदर पुत्र निर्माण केला. पार्वतीने त्यास पाहिले व ती क्रुद्ध झाली. एकट्या शिवाने आपणास वगळून पुत्र निर्माण केला, हे तिला आवडले नाही. तिने त्या बालकास शाप देऊन बेडौल व गजमुख बनविले.

दुसरी एक निराळ्या प्रकारची कथा आहे : एकदा पार्वती स्नान गृहात स्नान करीत होती. आपल्या अंगचा मळ काढून त्यातून तिने एक पुरूष बनविला व स्नानगृहाचा द्वाररक्षक म्हणून उभा केला. थोड्याच वेळात शिव तेथे आला त्याला द्वाररक्षकाने अडविले, तेव्हा शिवाने क्रुद्ध होऊन त्याचे मस्तक उडविले. पार्वती दुःखी झाली. तिच्या सांत्वनार्थ शिवाने इंद्राच्या हत्तीचे मस्तक आणून या द्वाररक्षकाच्या धडाला जोडले तोच गणपती होय.


या कथांत गणपती हा शिवपार्वतीचा पुत्र असला, तरी तो ‘अयोनिज’ आहे हे सूचित होते. यावरून असेही सूचित होते, की शिवपार्वती ह्या आर्यांच्या देवता बनल्यानंतर कालांतराने गणपती ही देवता आर्येतरांकडून स्वीकारून शिवगणात सामील केली. शिवपार्वतींनी गजरूप घेऊन रतिक्रीडा केली त्यामुळे गजमुख गणपतीचा जन्म झाला, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. गणपतीला आणि शिवाला पुराणांत रुद्र, शिव, विनायक, गणेश, त्रिपुरांतक, लंबोदर इ. समान विशेषणे लावलेली आढळतात.

गणपतीला एकच दात आहे, दुसरा तुटलेला दात त्याच्या हातात आहे. यासंबंधीही निरनिराळ्या उपपत्ती सांगणाऱ्या कथा आहेत : शंकराने एका प्रसंगी क्रुद्ध होऊन त्याचा एक दात मोडून फेकून दिला किंवा युद्धप्रसंगी परशुरामाने गणपतीचा एक दात परशू फेकून तोडला किंवा गणपतीने रागाच्या भरात आपला एक दात मोडून त्याचा तुकडा चंद्रावर फेकला किंवा गजमुख नावाच्या असुराशी युद्ध झाले, त्या असुराने गणपतीचा एक दात मोडला, तो मोडलेला दात गणपतीने उचलून त्या असुराला फेकून मारला किंवा विनायक या स्वरूपातील अवतारात देवांतक असुराशी जे युद्ध झाले त्यात गणपतीचा एक दात मोडला परंतु त्याच दाताने प्रहार करून गजांतकाचा नाश गणपतीने केला. 

गणपती ही देवता गुप्तकाळात शुभदेवता बनली व त्याचा सुमारास ती क्रूर-ग्रह म्हणून पूर्वी जे वर्णन येत होते, त्याच्याऐवजी त्याचा शुभदेवता म्हणून महिमा वाढला. गुप्तकाळ हा त्याचा ऐतिहासिक दृष्ट्या पहिला उत्कर्ष बिंदू होय. या काळातच तो भारताबाहेरही म्हणजे तिबेट, चीन, जपान, कोरिया इ. पूर्वेकडील आशिया खंडात पूजेस पात्र झाला. गणेशपुराण आणि मुद्‌गल पुराण असी दोन स्वतंत्र उपपुराणे, गणपतीचे माहात्म्य वर्णन करणारी, महाराष्ट्रात गणेशभक्तांनी रचली, असे काही संशोधकांचे मत आहे. गणपत्यथर्वशीर्षा  परब्रह्म  हे तात्त्विक स्वरूप त्यास देण्यात आले. मुळात तो रानटी लोकांचा रक्तवर्ण देव असावा. पशुपूजेच्या संप्रदायात त्याला महत्त्व असावे. रानटी लोक व्याघ्रदेवाची जशी अजून पूजा करतात, तशीच ही गजदेवाची पूजा, मुळात होत असावी. लाल शेंदूर, रक्त वस्त्र, रक्त पुष्प, दूर्वांकुर, मोदक अथवा लाडू इ. त्याच्या पूजेची सामग्री होय. त्याला प्राथमिक स्थितीमध्ये रक्ताचा अभिषेक होत असावा, असे काही पश्चिमी संशोधकांचे मत आहे. परंतु गज हा हनुमानाप्रमाणेच शाकाहारी प्राणी असल्यामुळे. प्राण्यांचे बलिदान त्याच्या बाबतीत प्रथमपासूनच वर्ज्य असणे शक्य आहे. शिव, भैरव, पार्वती किंवा देवी यांनाच प्राण्यांचे बलिदान करण्याची प्रथा आतापर्यंत चालू आहे. बिहारमध्ये शिवाच्या (वैद्यनाथाच्या) मंदिरात अजूनही बोकडांचे बलिदान चालते.

विघ्नहर्त्या गणपतीच्या उपासनेचे माहात्म्य वाढीस लागल्यावर ‘गाणपत्य संप्रदाय’ नावाचा एक गणपत्युपासकांचा स्वतंत्र संप्रदाय इ. श. पाचवे ते नववे शतक या दरम्यानच्या काळात उदयास आला व स्थिर झाला [→ गाणपत्य संप्रदाय].

तांत्रिक मार्गात गणेशाची स्वतंत्र पूजापद्धती सांगितलेली आहे व त्याचे अनेक बीजमंत्रही सांगितले आहेत. वाममार्गी तंत्रांमध्ये ‘गणेशतंत्र’ म्हणून एक स्वतंत्र तंत्र मानले जाते. यात मद्यपान, स्वैर मैथुन इ. आचार पूजेचे अंग मानले आहेत. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोहोचलेल्या काही ब्राह्मण जहागिरदार-सरदारांमध्ये हे वाममार्गी ‘गणेशतंत्र’ चालत असे. बौद्ध धर्मात तंत्र संप्रदाय अंतर्भूत झाला, तेव्हा त्या तंत्रमार्गाचा गणपती हा मुख्य देव मानला गेला.

ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशाचे रूपक ॐकारावर बसविले आहे. वेदादी सर्व विद्यांचे मूळ ‘प्रवण’ म्हणजे ॐकार असून, सर्व विद्यांचे तो विकसित रूप होय, असे या रूपकाने सूचित केले आहे. संस्कृतमधील वा प्राकृतमधील धार्मिक ग्रंथांच्या प्रारंभी ‘श्री गणेशाय नमः ।’ असे लिहिलेले असते तसे नसेल तर ते गृहीत धरूनच ग्रंथपठन करावयाचे असते.

महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत. त्यांत ⇨अष्टविनायकांची स्थाने ही प्रमुख होत. पेशवाईत गणेशोपासनेचा संप्रदाय अधिक वाढला आणि लोकमान्य टिळकांनी ⇨गणेशोत्सवाला एक वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून फार महत्त्व दिले. त्यामुळे भाद्रपदातील गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. गणेश स्थापनेच्या वेळेस व विसर्जनाच्या वेळेस प्रचंड मिरवणुका निघतात. गणपतीची प्रिय तिथी चतुर्थी असून शुक्लपक्षातील चतुर्थीस ‘विनायकी’ व कृष्णपक्षातील चतुर्थीस ‘संकष्टी’ म्हणतात. ह्या दोन्ही दिवशी गणेशव्रत सांगितले असून महाराष्ट्रात अनेकजण त्याचे विधियुक्त पालन करतात. 

संदर्भ : 1. Getty, A. Ganesa : A Monograph on the Elephant-Faced God, Oxford, 1936.

     2. Mitra, Haridas, Ganapati, Santiniketan, 1966.

     ३. गाडगीळ, अमरेंद्र, संपा. श्री गणेशकोश, मुंबई, १९६८.

जोशी, लक्ष्मणशास्त्री


गणपतिशिल्प, खजुराहो. गृत्यमग्न गणेश, ब्राँझ, नेपाळ. उच्छिष्ट गणपतीची पाषाणमुर्ती, नंजनगोडू. कापालिक गणपतीचे शिल्प, जावा. हस्तिदंती केवल गणपती, त्रिवेंद्रम. द्विभुजगणेश, व्हिएटनाम.  हेरंब गणपती, ब्राँझ, नेगापटम्. नर्तक गणपती, ओरिसा. महागणपतीची पाषाणप्रतिमा, बिहार.