कोणिकांतर : (ॲनॉमली). एखाद्या खस्थ ज्योतीभोवती दुसरी खस्थ ज्योती फिरते तेव्हा ती दुसरी खस्थ ज्योती कक्षेत कोठे आहे, हे दर्शविण्यासाठी कोणिकांतर ही संज्ञा वापरतात.
पृथ्वी–चंद्र, सूर्य–ग्रह, ग्रह–उपग्रह किंवा तारा-तारा या कोणत्याही संबंधात ही संज्ञा वापरता येईल. सूर्य-ग्रह या संबंधात सूर्यमध्य व उपसूर्यबिंदू (कक्षेत ग्रह सूर्याच्या सर्वांत जवळ येतो तो बिंदू) आणि सूर्यमध्य ग्रह यांना सांधणाऱ्या रेषांमधील सूर्यमध्यापाशी होणाऱ्या कोनास कोणिकांतर असे म्हणतात. हे कोनीय अंतर ग्रहाच्या गतीच्या दिशेने व त्याच्या कक्षेच्या पातळीत मोजतात. वास्तविक ‘ॲनॉमली’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ विसंगती असा आहे. पूर्वी ग्रहाचे गणिताने काढलेले स्थान व प्रत्य़क्ष स्थान यांच्यात विसंगती आढळली म्हणून ॲनॉमली ही संज्ञा आली. पूर्वी हे कोनीय अंतर अपसूर्यबिंदूपासून (कक्षेत ग्रह सूर्यापासून सर्वांत दूर जातो त्या बिंदूपासून) मोजीत. परंतु धूमकेतूंचे अपसूर्यबिंदू निरीक्षणाच्या कक्षेबाहेर येत असल्याने हे अंतर उपसूर्यबिंदूपासून मोजणे सोयीचे ठरते. या वर उल्लेखिलेल्या कोणिकांतरासच सत् कोणिकांतर म्हणतात. याखेरीज कोणिकांतराचे आणखी दोन प्रकार आहेत.
ग्रहाची कक्षा वर्तुळाकार मानली, या वर्तुळाची त्रिज्या सूर्यापासून ग्रहाच्या सरासरी अंतराएवढी घेतली आणि ग्रह एकविध (एक सारख्या) गतीने त्या वर्तुळावर फिरत आहे असे मानले, तर सूर्यमध्याशी उपसूर्यबिंदू व असा काल्पनिक ग्रह जोडणाऱ्या रेषांमधील कोनास माध्य कोणिकांतर (M) म्हणतात. समजा, विवृत्त (लंबवर्तुळाकार) कक्षेचा म हा मध्य कल्पून विवृत्ताच्या अर्ध बृहदक्षाइतक्या (लंबवर्तुळाच्या मोठ्या अक्षाच्या निम्म्या इतक्या) त्रिज्येने वर्तुळ काढले. कक्षेतील ग या ग्रहापासून बृहदक्षाला गल लंब काढला. लग वाढविली असता ती वर्तुळास ग१ मध्ये छेदील . उ हा उपसूर्यबिंदू असेल,तर ∠ गसउ हे सत् कोणिकांतर (V) आणि ∠ग१मउ या कोणीय अंतरास विमध्यी कोणिकांतर (E) म्हणतात. ग्रह गतिमान असल्याने तिन्ही कोणिकांतरांमध्ये बदल होत असले, तरी माध्य कोणिकांतर समवेगाने बदलत असते. e ही विवृत्तकक्षेची विमध्यता (वर्तुळाकार कक्षेपासून होणारे विचलन) मानून तिन्ही कोणिकांतरांमधील संबंध केप्लर यांनी मांडलेल्या पुढील समीकरणांनी दाखविता येतात.
एकदा पृथ्वी उपसूर्यी येऊन गेल्यावर पुन्हा उपसूर्यी येण्यास जो काळ लागतो, त्यास कोणिकांतरीय वर्ष म्हणतात. हे वर्ष ३६५ दि. ६ ता. १३ मि. ५३ से.एवढे म्हणजे सांपातिक वर्षापेक्षा २५ मि. ७ से. एवढ्या काळाने मोठे असते. कारण उपसूर्यबिंदू पृथ्वीच्या गतीच्या दिशेतच पुढे सरकत असतो. हे वर्ष क्वचितच वापरतात.
ठाकूर, अ. ना.
“