ट्रोजन ग्रह : ज्यांचा कक्षीय भ्रमणकाल साधारणपणे गुरूच्या कक्षीय भ्रमणकालाइतका असतो असे गुरूच्या कक्षेत सूर्योभोवती फिरणारे जे ⇨लघुग्रह असतात त्यांना ट्रोजन ग्रह म्हणतात. ट्रोजन ग्रह हे नाव होमर यांच्या ⇨इलिअड या ग्रीक महाकाव्यातील व्यक्तींवरून देण्यात आलेले आहे. हे दोन गटांत असून एक गट गुरूपासून सु.६०ºपुढे आणि दुसरा गट सु. ६०ºमागे असे असतात. हे सर्व आकारमानाने फक्त सु. २० ते ८० किमी. व्यासाचे आहेत, त्यामुळे दूरदर्शकाशिवाय दिसत नाहीत.

गुरूच्या कक्षेतील ट्रोजन ग्रहांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानांमागील तत्त्व फ्रेंच गणिती जे. एल्, लाग्रांझ यांनी ट्रोजन ग्रहांचा शोध लागण्याच्या अगोदरच १७७२ साली मांडले होते. कोणतेही तीन खगोलीय पदार्थ एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणात फिरत असून त्यांचा समभुज त्रिकोण होत असेल, तर हे कायम समभुज त्रिकोणात बद्ध होतात. गुरूच्या कक्षेत गुरू व सूर्य यांच्याशी समभुज त्रिकोण करणारे गुरूच्या मागे एक व पुढे एक असे दोन बिंदू (लाग्रांझ बिंदू) मिळतात [⟶ खगोलीय यामिकी ] म्हणून ट्रोजन ग्रह दोन गटांत सापडतात. आकिलीझ हा पहिला ट्रोजन ग्रह माक्स व्होल्फ यांनी १९०६ साली पाहिला. असे एकूण सोळा सापडले, परंतु त्यांपैकी दोन निसटले असावेत. उरलेल्यांपैकी ९ पुढच्या व ५ मागच्या गटात आहेत. ट्रोजन ग्रहांची हि स्थानेसुद्धा सर्वसाधारण स्थितीपासून २४º ते ४०º पर्यंत चळतात. त्यांच्या कक्षाही १०º ते २०º पर्यंत गुरूच्या कक्षेशी कललेल्या असतात. शनीच्या आकर्षणामुळे पर्यास (अनियमित बदल) घडून त्यांच्यापैकी एखादा दुसरा गटातून बाहेर पडण्याची, तसेच नवीन येण्याचीही शक्यता आहे. तसेच सध्या ज्ञात असलेल्या ट्रोजन ग्रहांखेरीज अधिक अस्पष्ट व लहान लघुग्रहही या गटांत असण्याची शक्यता आहे.

मराठे, स. चिं.