कोडियम : (इ. क्रोटॉन लॅ. कोडियम व्हॅरिगेटम कुल – यूफोर्बिएसी). या नावाने ओळखली जाणारी, विविध प्रकारची पाने असलेली झाडे बागेत नेहमी लावलेली आढळतात. मूळची ती मोल्यूका बेटातील आहेत. ती सदापर्णी, काटक व सु. २-४ मी. उंच व चिकाळ असतात. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), जाडसर, चिवट, भिन्न आकारांची असून त्यांवर अनेक रंगीत ठिपके असतात. फुले एकलिंगी, लहान, हिरवट, पिवळसर असून ती कक्षास्थ (बगलेतील) मजंऱ्यांवर येतात [→ यूफोर्बिएसी]. लहानमोठ्या सार्वजनिक बागांत अथवा बंगल्यात लावण्याकरिता ही झाडे लोकप्रिय झाली आहेत. फुलदाणीत बरेच दिवस टिकतात फांदीला मुळेही फुटतात व त्यांनंतर बागेत किंवा कुंडीत लावल्यास नवीन झाड वाढते. या झाडांचे सु. ३० प्रकार उपलब्ध आहेत.
पटवर्धन, शां. द.
“