गटविमा : दहा किंवा अधिक व्यक्तींचा एकत्रितपणे उतरविलेला विमा. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन आदी देशांत विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून गटविम्याची पद्धत सुरू झालेली दिसते. मुख्यत्वेकरून एका कारखानदाराकडे काम करणाऱ्या कामगारांसाठी गटविम्याची तरतूद असली, ती कामगार-संघटना, व्यापारी वा व्यावसायिक संघटना ह्यांनाही सामुदायिकपणे गटविम्याचा फायदा घेता येतो. विमेदार मालकाशी करार करतो व गटविम्याखाली येणाऱ्या कामगारांना तसे प्रमाणपत्र देण्याचे दायित्व मालकावर राहते. गटविम्याचा संपूर्ण हप्ता मालक भरतो क्वचित कामगारांकडून हप्त्याचा काही भाग गोळा करण्यात येतो. अनारोग्य वा अन्य अडचणींमुळे ज्यांना वैयक्तिक रीत्या विमा उतरविणे शक्य नसते, त्यांना गटविम्याची तरतूद फायद्याची ठरते. दलाली, हप्ते गोळा करण्यांचा खर्च आदी वरखर्चांत काटकसर होत असल्याने गटविम्याचा प्रकार कमी खर्चाचा आहे. आयुर्विमा, आरोग्यविमा, अपघातविमा आदी सर्व प्रकार गटविम्याखाली येतात. अमेरिका, ग्रेट ब्रिटन आदी देशांत एकूण आयुर्विम्याच्या एकतृतीयांश विमापत्रे सामूहिकपणे उतरविलेली आढळतात. भारतीय आयुर्विमा महामंडळानेसुद्धा अलिकडे (१९७३) गटविम्याचा विशेष प्रचार करून उत्तर प्रदेशातील सु. २·९४ लाख प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि १६ राज्य वीज मंडळांचे कर्मचारी यांना विम्याचे संरक्षण मिळवून दिले आहे.

भेण्डे, सुभाष