टपाल विक्री व्यवसाय : मालाच्या किरकोळ विक्रीची एक पद्धत. या पद्धतीनुसार विक्रेत्याने जाहिरात केलेल्या मालाची मागणी ग्राहक त्याच्याकडे टपालने नोंदवितो व विक्रेता तो माल मागणीनुसार टपालनेच पुरवितो. एकूण किरकोळ विक्रीपैकी अमेरिकेतील शेकडा १ व ब्रिटनमधील शेकडा ३ इतकी किरकोळ विक्री टपाल  विक्री व्यवसायामार्फत होत असते. हा व्यवसाय अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत वसाहतयुगातच सुरू झाला असला, तरी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोहमार्गाचे जाळे दूरवर पसरल्यानंतरच येथे त्याची वाढ खरी झाली. यूरोपमध्ये टपाल विक्रीची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस झाली तिची अतिशय जलद वाढ १९४५ नंतर होत गेली. १९७० पासून हा व्यवसाय ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी, स्वीडन आणि स्वित्झर्लंडमध्ये जोरात चालू असून फ्रान्स व नेदर्लंड्समध्येही त्याची वाढ होत आहे. १९७०–७५ च्या सुमारास टपाल विक्री व्यवसाय करणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या कंपन्या अमेरिकेत असून त्यांची नावे ‘सिअर्स, रोबक अँड कंपनी’ आणि ‘माँगमरी वॉर्ड अँड कंपनी’ अशी आहेत.

जर्मनी व फ्रान्स या देशांत या व्यवसायाची कापड आणि वस्त्रे, सिगारेटी किंवा रत्ने व दागिने यांसारख्या विशिष्ट वस्तूंचीच विक्री करावी याची प्रवृत्ती विशेषेकरून आढळते, तर ग्रेट ब्रिटनसारख्या देशांत टपाल विक्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर सुविख्यात कंपन्यांची विविध ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करतात. ग्राहकांच्या आवडीनिवडींतील वाढती एकविधता लक्षात घेऊन कित्येक यूरोपीय कंपन्या आंतरराष्ट्रीय स्तरांवर आपल्या शाखा उघडण्यास प्रवृत्त झालेल्या आढळतात. उदा., ग्रेट ब्रिटनमधील ‘ग्रेट युनिव्हर्सल स्टोअर्स लिमिटेड’ या कंपनीने फ्रान्स आणि नेदर्लंड्स या देशांत आपल्या शाखा उघडलेल्या आहेत.

इतर किरकोळ विक्रीच्या पद्धतींशी तुलना करता, टपाल विक्री व्यवसायाची काही वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याची वाढ होऊ शकली. एक तर, मोठमोठ्या कंपन्या हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करीत असल्यामुळे व त्यांचा प्रचालन खर्च बराच कमी असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणाच्या काटकसरींचा फायदा घेऊन खात्रीलायक माल विकता येतो. गिऱ्हाइकांसही माल टपालाने घरपोच येत असल्याने खरेदीची दगदग आणि बाजारातील गर्दी टाळता येऊन त्यांच्या वेळेची बचत होते. शिवाय इतर किरकोळ विक्रीदुकानांतील मालाच्या मर्यादित साठ्यापेक्षा टपाल विक्री कंपनीने सूचीमध्ये दिलेल्या मुबलक साठ्यातून माल निवडणे ग्राहक पसंत करतात. विवाहित स्त्रियांना जास्त प्रमाणावर रोजगार करावा लागत असल्यामुळे त्यांना बाजारात जाऊन खरेदी करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही व परिणामतः बरीच कुटुंबे विशिष्ट मालाची खरेदी टपालनेच करतात. टपाल विक्री कंपन्याही गिऱ्हाइकांच्या सेवेस तत्पर राहतात विकलेला माल त्यांना पसंत नसल्यास परत घेण्याचीही तयारी दर्शवितात व जरूर तर उधारीनेही विक्री करून गिऱ्हाइकांचा विश्वास संपादन करतात. मालाची वास्तवपूर्ण व विस्तृत माहिती टपालने ग्राहकांस पुरवितात व त्यांनी दूरध्वनीद्वारा मागविलेला मालसुद्धा २४ किंवा ४८ तासांत टपालने किंवा ट्रकने त्यांना घरपोच मिळेल, अशी व्यवस्था करतात. प्रचालन खर्चात शक्य तेवढी काटकसर करून व ग्राहकांच्या विशिष्ट गरजा भागविण्याची तत्परता दाखवून टपाल विक्री व्यवसाय आपली भरभराट साधू शकतो. भारतातही  काही प्रमाणात टपाल विक्री होत असते परंतु ह्या व्यवसायाकडे अद्याप फारसे लक्ष पुरविण्यात आले नसल्यामुळे त्याचे स्वरूप व आवाका अजून तरी अत्यंत मर्यादित आहे.   

           धोंगडे, ए. रा.