गंधपुरा : (सं. हेमंत-हरित इं. विटरग्रीन लॅ. गॉल्थेरिया फ्रॅग्रँटिसिमा कुल-एरिकेसी). हे सु. ३ मी. उंच, बहुशाखित (खूप फांद्या असलेले), सदापर्णी व सुगंधी क्षुप (झुडूप) पूर्व हिमालय, खासी टेकड्या, दक्षिण भारत (निलगिरी) येथे आढळते. याचे खासी नाव ‘जिऱ्हाप’ आहे. साल शेंदरट तपकिरी पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), चिवट, दातेरी, प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त). फुले लहान, हिरवट पांढरी, कक्षास्थ (बगलेतील) मंजरीवर येतात. बोंडे गोलसर, निळ्या मांसल संवर्ताने (पुष्पकोशाने) वेढलेली व खाद्य असतात [→ एरिकेलीझ].

ताज्या पानांपासून बाष्पनशील (उडून जाणारे) तेल (‘विंटरग्रीन तेल’) काढतात ते संधिवातावर लावतात, मलमे व लेपात घालतात आणि अंकुशकृमीवर (तोंडात आकड्यासारखी संरचना असलेल्या कृमीवर) पोटात देतात. ते जंतुनाशक, उत्तेजक व वायुनाशी असते. ते रंगहीन असून त्याचा स्वाद सौम्य असतो पेये, मिठाई व दंतधावनात घालतात. कर्करोग व गुल्मावर ते परिणामकारक असल्याचे काही प्राण्यांवरील प्रयोगांत आढळले आहे. अमेरिकेत गॉल्थेरि या प्रोकंबेन्स या जातीपासून ‘गॉल्थेरिया तेल’ काढतात, तेही विंटरग्रीन तेलाप्रमाणेच असते. गॉल्थेरियाच्या काही जाती शोभेकरिता बागेत लावतात.  

परांडेकर, शं. आ.