कोठारी, दौलतसिंग : (१९०६–  ). भारतीय भौतिकीविज्ञ. ऊष्मागतिकी (उष्णता व यांत्रिक वा इतर ऊर्जा यांतील संबंधाचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) व खगोलीय भौतिकी या विषयात संशोधन कार्य. त्यांचे शिक्षण उदयपूर, इंदूर, अलाहाबाद व केंब्रिज येथे झाले. अलाहाबाद विद्यापीठात मेघनाद साहा यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी एम्‌.एस्‌सी. पदवी मिळविली आणि नंतर केंब्रिज विद्यापीठाची पीएच्‌.डी. पदवी संपादन केली. १९२८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठात व १९३४ मध्ये दिल्ली विद्यापीठात त्यांची भौतिकीच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. भारताच्या संरक्षण खात्याचे सल्लागार म्हणून १९४८ पासून त्यांनी काम केले. ते १९६१ पासून विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष तसेच १९६४ पासून केंद्रीय शिक्षण समितीचे अध्यक्ष होते.

त्यांचे प्रमुख शास्त्रीय कार्य सांख्यिकीय ऊष्मागतिकी व श्वेत लघुतम ताऱ्यांसंबंधीचा सिध्दांत यांविषयी आहे. नुसत्या प्रचंड दाबानेही अणूंचे आयनीकरण (विद्युत्‌ भारित अणूंत रूपांतर) करणे शक्य आहे, असे त्यांनी दाखविले. त्यांचे वरील विषयांवर अनेक निबंध भारतातील व परदेशातील शास्त्रीय नियतकालिकांतून प्रसिध्द झालेले आहेत. भारताच्या संरक्षण खात्यातर्फे तयार करण्यात आलेल्या न्यूक्लिअर एक्सप्लोजन्स अँड देअर इफेक्ट्‌स (दुसरी आवृत्ती, १९५८) या महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या संपादनात कोठारी यांचा मोठा वाटा आहे.

इंडियन फिजिकल सोसायटीचे ते अध्यक्ष होते. नॅशनल इनस्टिट्यूट ऑफ सायेन्सेस ऑफ इंडिया या संस्थेचे ते फेलो व उपाध्यक्ष आहेत. इंडियन सायन्स काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी (१९६३) त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. भारत सरकारने १९६२ साली त्यांना पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.  

भदे, व. ग.