कोट्टगिरी : कोटागिरी. तमिळनाडू राज्याच्या निलगिरी जिल्ह्यातील प्रसिध्द गिरिविश्रामस्थान व आरोग्यधाम. लोकसंख्या १८,९०९ (१९७१). निलगिरीतील प्रथम वसलेले हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून १,९८५ मी. उंच असून ऊटकमंडच्या पूर्वेस २९ किमी. व कुन्नूरच्या पश्चिमेस २१ किमी. आहे. येथील गोल्फचे मैदान प्रसिद्ध आहे. आजूबाजूचे चहाकॉफीचे मळे, पैकारा, कलहाटी वगैरे नद्यांचे धबधबे, सुळक्यासारखा उंच रंगस्वामीचा डोंगर ही पाहण्यासारखी आहेत. येथे निलगिरी तेलाचे उत्पादन होते.
दातार, नीला