कोटोनिॲस्टर : (कुल-रोझेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका वंशाचे लॅटिन नाव. यामध्ये सु. ५० जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार उ. समशीतोष्ण प्रदेशात (यूरोप, आशिया व उ.आफ्रिका) आहे. भारतात पूर्व समशीतोष्ण हिमालयात (सु. १,२४०–२,४८० मी. उंचीपर्यंत), पंचमढी व काश्मीर ते नेपाळमध्ये को. बॅसिलॅरिस व को ॲक्युमिनेटा (हिं.रिऊ) या जाती आढळतात. कोटोनिॲस्टर वंशातील सर्वच जाती क्षुपे (झुडपे) किंवा लहान वृक्ष आहेत. कित्येक बागांतून शोभेकरिता लावतात कारण त्यांच्या पानांचे शरद ऋतूतील भडक रंग व लाल किंवा काळी फळे आकर्षक असतात. पाने एकाआड एक, अखंड व सोपपर्ण (उपपर्णयुक्त) फुले पांढरी किंवा लालसर, एकेकटी किंवा वल्लरीवर येतात. सामान्य संरचना ⇨रोझेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे. इंडोचायनात को. बॅसिलॅरिसाचे तिरश्चर (मुनवे) स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) म्हणून देतात. को. ॲक्युमिनेटाच्या लाकडापासून हातात धरावयाच्या काठ्या बनवितात .
जमदाडे, ज. वि.
“