गंड : (कॉम्प्लेक्स). गंड ही संकल्पना कार्ल युंग (१८७५–१९६१) या प्रसिद्ध मनोविश्लेषकाने प्रचारात आणली असून व्यक्तीच्या वर्तनाची उपपत्ती लावण्याच्या द्दष्टीने ती महत्त्वाची ठरली आहे. व्यक्तीच्या विचारांत सम्यक्तेचा अथवा वाजवीपणाचा अभाव असणे, तिच्या भावनिक प्रतिक्रिया प्राप्त प्रसंगाला अनुरूप नसणे, तिच्या वागण्यात सयुक्तिकतेचा (रॅशनॅलिटी) अभाव असणे वगैरेंची उपपत्ती लावण्यासाठी व्यक्तीच्या अंतरंगात, पण अबोध स्तरावर वास्तव्य करीत असलेला जो मानसिक घटक मानणे आवश्यक ठरते, त्यास युंगने ‘कॉम्प्लेक्स’ (गंड) ही संज्ञा दिली व त्याची पुढीलप्रमाणे व्याख्याही केली ‘व्यक्तीची इतरांकडे तसेच स्वतःकडे पाहण्याची दृष्टी व तिचे वर्तन यांवर प्रभाव गाजवणारे आणि भावनांनी ओथंबलेले असे तिच्या अंतरंगातील विचारांचे पुंज म्हणजे गंड होत’. गंड हा भावनात्मक विचारांचा व स्मृतींचा पुंज असल्याने व भावना हा वर्तनाचा प्रभावी प्रेरक (मोटिव्ह) घटक असल्याने, गंडांची गणना प्रेरक घटकांमध्ये केली गेली आहे. व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या गंडामुळे तिच्या मनात विशिष्ट प्रकारचे विचार येऊ लागतात आणि ते तिच्या ठिकाणी विशिष्ट मन:स्थिती निर्माण करतात. जीवनातील संघर्ष-प्रसंगांशी मुकाबला करण्याची व्यक्तीची शैली वा रीत हीदेखील तिच्या अंतरंगातील गंडामुळेच ठरत असते.
गंड व स्थिरभाव: ए. एफ्. शँड व ⇨ विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) या मानसशास्त्रज्ञांनी मानलेले स्थिरभाव (सेंटिमेंट) नामक मानसिक घटक आणि गंड यांमध्ये स्वरूपत: साधर्म्य आहे व स्थिरभावांच्याच व्यापक सदरामध्ये गंडांची गणना करावी, किंबहुना या दोन्ही संज्ञा समानार्थक मानव्यात, असे काही मानसशास्त्रज्ञांचे (उदा., बर्नार्ड हार्ट) मत आहे व त्यात काहीसा ग्राह्यांशही आहे. एखाद्या विषयाच्या (वस्तू, व्यक्ती, प्रसंग वगैरेंच्या) संबंधात अनेकवार उद्भवलेल्या भावनेचे अथवा भावनांचे जे संस्कार सुस्थिर होऊन राहतात व त्या विषयाच्या दर्शनाने, उल्लेखाने किंवा स्मरणाने तसेच त्या विषयाशी साहचर्यसंबंधाने निगडित होऊन बसलेल्या कशानेही जे उत्तेजित होतात, त्यांना ‘स्थिरभाव’ ही संज्ञा आहे. हे संस्कार एकाच प्रकारच्या किंवा अनेक प्रकारच्या भावनांचे असतात आणि त्यानुसार स्थिरभाव साधे अथवा जटिल असतात. स्थिरभाव हे भावनात्मक असल्याने भावनांप्रमाणेच त्यांच्यातही व्यक्तीला कृतिप्रवृत्त करण्याचे सामर्थ्य असते. म्हणूनच ते व्यक्तीच्या मानसिक घडणीतील प्रेरक घटक ठरून तिची उद्दिष्टे व वर्तनाच्या दिशा ठरवीत असतात तसेच तिच्या प्रतिक्रियांमध्ये व अभिवृत्तींमध्ये सातत्य व सुसंगती राखीत असतात, असे मॅक्डूगलने म्हटले आहे. मातेच्या अपत्याविषयीच्या स्थिरभावाचे तसेच स्वदेशनिष्ठा, मत्सर इ. विविध स्थिरभावांची उदाहरणे देऊन स्थिरभावांची निष्पत्ती व त्यांचे महत्त्व मॅक्डूगलने विशद केले आहे [→ स्थिरभाव].
तथापि गंड ही संज्ञा व्यक्तिमानसाच्या अबोध स्तराच्या संदर्भात प्रथम वापरण्यात आली व त्यामुळे तिला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. गंड हे नेहमी नेणिवेच्या वा अबोधाच्या पातळीवरच असतात काय, या प्रश्नावर एकमत नाही. तरी पण सामान्यत: स्थिरभाव व गंड यांमध्ये जो भेद करण्यात येतो, तो असा : गंड हे नेणिवेच्या स्तरावर असतात. व्यक्तीला स्वतःच्या स्थिरभावांची जाणीव असू शकते, तशी स्वतःच्या मनातील गंडांची नसते. स्थिरभांवानी प्रेरित होऊन केलेल्या कृतींचे स्पष्टीकरण व्यक्ती स्वतःला आणि इतरांना देऊ शकते, तसे गंडप्रेरित वर्तनाचे देऊ शकत नाही. गंडमूलक विचार, भावनाक्षोम व कृती यांचा खरा कार्यकारणभाव व्यक्तीला स्वतःला उमगत नाही. अर्थातच स्वतःच्या अनेक स्थिरभावांच्या बाबतीत व्यक्ती तरतम विवेक करू शकते व त्यांची ‘व्यवस्था’ लावून वागू शकते. गंड मात्र तिच्या जाणिवेबाहेर व म्हणूनच युक्तायुक्त-विवेकबुध्दीच्या आवाक्याबाहेर असतात तसेच अबोध स्तरावरून स्वायत्तपणे आपला प्रभावही गाजवीत असतात या दृष्टीने पाहिल्यास गंड हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अनिष्ट असणारे स्थिरभाव होत, असेही म्हणता येईल.
गंडांची अबोधता हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण मानून गंडाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे : गंड हा जाणिवेपासून व व्यक्तिमत्त्वापासून विलग व स्वायत्त झालेला तसेच नेणिवेच्या स्तरावरून व्यक्तीच्या जाणिवेतील मनोव्यापारांवर आणि क्रियांवर एकतर अवरोधात्मक अथवा प्रचोदनात्मक प्रभाव करणारा मानसिक घटकांचा पुंज होय. या पुंजांमध्ये एक केंद्रघटक वा केंद्रक (न्यूक्लिअस) असून त्यात त्या गंडाचे रहस्य व शक्ती साठवलेली असते तसेच त्या केंद्रघटकाशी अनेक विचार, स्मृती, कल्पना वगैरे कोणत्या तरी विशिष्ट भावनेच्या सूत्राने गुंफलेल्या असतात. एखाद्या बाह्य प्रसंगामुळे अथवा आतून जेव्हा गंडास उत्तेजना मिळते, तेव्हा त्याचा पगडा व्यक्तीवर बसतो व नेहमीच्या वर्तनाहून निराळे वर्तन व अभिवृत्ती त्या व्यक्तीत दिसून येऊ लागते.
गंडनिर्मिती : गंड हे अबोधाच्या वा नेणिवेच्या स्तरावर असल्यामुळे व्यक्तीला अज्ञात असतात. याचे कारण असे, की मानसिक व भावनिक आघात करणाऱ्या असुखद व असह्य अनुभवांना जाणिवेचा दरवाजा व्यक्तीने बंद केलेला असतो व म्हणून त्यांचा तिच्या बाकीच्या व्यक्तिमत्त्वाशी मिलाफ न होता त्यांचे स्वतंत्रपणे संघटन झालेले असते.
गंडांची निर्मिती लहानपणीच व व्यक्तीच्या नकळत होऊन जाते, असे मानण्याकडे मानसशास्त्रज्ञांचा एकंदरीने कल दिसतो. लहानपणी भावनात्मक संघर्षप्रसंग, अप्रिय घटना, वैफल्यभावना, असुरक्षिततेची भावना इत्यादींचे निरोधन अथवा दमन करून टाकण्यात येते परंतु त्या निरोधित भावनांचे संस्कार मनाच्या अबोध स्तरावर दबा धरल्यागत राहतात. त्यांच्याशी अनेक विचार व स्मृती सहयोजित व संघटित होऊन व्यक्तीच्या अंतरंगात त्याचा एक कोश तयार होतो.
गंडाची लक्षणे : अगदी क्षुल्लक गोष्टीला अनुलक्षून होणारी व्यक्तीची प्रतिक्रिया फार तीव्र व भावनात्मक असणे, साध्या साध्या घटनांचा व्यक्तीकडून भलताच अर्थ लावला जाणे, व्यक्तीच्या एकंदर वर्तनात व मनोदशेत चमत्कारिकपणा असणे, सहज आठवण्यासारखी गोष्ट न आठवणे, असंबद्ध गोष्ट स्मरू लागणे इ. प्रकार व्यक्तीच्या मनात गंड असल्याचे सूचक समजले जातात.
व्यक्तीच्या मनातील गंड कोणता आहे, त्याची गंभीरता व सामर्थ्य किती आहे, त्याच्याशी निगडित अशा भावना कोणत्या आहेत, हे शोधून काढण्याची ⇨कार्ल युंगने ‘शब्दसाहचर्य’ नामक पद्धती बसवली आहे. व्यक्तीला निवडक असे शंभर शब्द (उदा., हात, आई, आखूड वगैरे) एकामागोमाग एक असे द्यावयाचे व तो तो शब्द ऐकल्या वा वाचल्याबरोबर प्रथम मनात आलेला विचार त्याच्या प्रशस्त-अप्रशस्ततेकडे न पाहता, त्या व्यक्तीने ताबडतोब शब्दरूपाने उच्चारावयाचा अशी ही पद्धती आहे. जर (अ) व्यक्तीची शब्दप्रतिक्रिया फारच घाईगर्दीची झाल्याचे दिसले, किंवा (आ) तिला वाजवीपोक्षा जास्त विलंब लागला, किंवा (इ) प्रतिक्रिया-शब्द उच्चारताना व्यक्तीच्या ठिकाणी भावनाक्षोभ दिसला, किंवा (ई) मूळ शब्दाचाच तिने पुनरूच्चार केला, किंवा (उ) साधारणतः अपेक्षित नसलेला असा शब्द तिच्या तोंडून आला, किंवा (ऊ) एकचएक शब्द, प्रतिक्रियाशब्द म्हणून अनेक वेळा आला, तर या गोष्टी गंडाचे स्वरूप व सामर्थ्य शोधून काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जातात.
प्रक्षेपणतंत्र म्हणून हेर्मान रोर्शाक (१८८४–१९२२) याने प्रमाणित केलेल्या शाईच्या डागांच्या दहा आकृत्या आणि कथात्मक अर्थ लावण्यासाठी एच्. ए. मरी याने प्रमाणित केलेली चित्रे यांचादेखील यासाठी उपयोग करण्यात येतो.
गंडांचे प्रकार : व्यक्तीच्या मनात सामान्यतः गंड असतातच असे मानण्याकडे जरी मनोविश्लेषकांचा कल असला, तरी कोणते गंड असतात याविषयी त्यांच्यात मतभेद आहेत.
फ्रॉइडच्या मते व्यक्तीची जीवन शक्ती स्वरूपतः कामवासनात्मक (सेक्शुअलाइझ्ड एलान व्हायटल) असते व प्रत्येक बालकाचा विकास कुटुंबीय परिसरात होत असताना, या मूलभूत कामवासनेशी संबंधित असे काही ठरीव स्वरूपाचे (टाइप फॉर्म्स) गंड निर्माण होत असतात. प्रांरभी बालक स्वतःच्याच मुख, गुद, लिंग आदी स्थानांच्या उद्दीपनाने कामुक सुख अनुभवते पण लवकरच ही स्वशरीररती मागे पडते व विविध प्रसंगी त्याच्या अधिक संपर्कात येणारे मातापिता, त्याच्या कामुक प्रीतीचे विषय बनतात. आई ही मुलाचा आणि वडील हे मुलीचा प्रीतिविषय बनतात कारण भिन्नलिंगी आकर्षण निसर्गसिद्धच असते व त्यामुळे आईचाही मुलाकडे व वडिलांचाही मुलीकडे अधिक ओढा असतो. अशा रीतीने ही मातृरती व पितृरती जोपासली जाते. मातेविषयीच्या या कामुक वासनेत (इन्सेस्वअस डिझायर) पिता हा बालकाला आपला प्रतिस्पर्धी भासतो व त्याला पित्याचा द्वेष वाटू लागतो पण त्याबरोबर त्याला आपल्यापेक्षा बलवान असलेल्या पित्याची भीतीही वाटते. ही भीतियुक्त द्वेषभावना जाणिवेतून दडपून टाकली जाते व मुलगा पित्याविषयी प्रेम ‘वाटवून’ घेऊ लागतो. ही घटना, स्वतःचे मातापिता कोण, हे ठाऊक नसलेल्या ग्रीक पुराणकथेतील ईडिपस नावाच्या राजपुत्राने आपल्या पित्यास युद्धात ठार मारले व त्याच्या पत्नीशी (म्हणजे स्वतःच्याच जन्मदात्रीशी) विवाह केला, या कथेची आठवण करून देणारी आहे, असे वाटून फ्रॉइडने या मातृगंडास ⇨ ईडिपस गंड हे नाव दिले. स्वतःच्या वडिलांविषयीच्या मुलाच्या ह्या भीतीला, ‘ते माझे लिंग कापून टाकतील व मी मरून जाईन’ या कल्पनेचे रूप प्राप्त होते आणि तशी शाब्दिक धमकी त्यास कोणाकडूनही लटक्या रागाने वा थट्टेने मिळत गेली. तर ती भीती विशेष बळावते तथापि ही असह्य भीतीची भावना तो मुलगा दडपून टाकतो. अशा रीतीने त्याच्या मनात लिंग-छेदन गंड, लिंग-लघुत्व गंड व मृत्युभय गंड वगैरे लहानपणीच घर करतात, फ्रॉइडचा हा ‘कामसिद्धांत’ व ‘गंड-सिद्धांत’ समग्र मानवजातीला लागू असेल, तर मुलींनाही काही ना काही करून, त्यात बसविले पाहिजे. या विचाराने फ्रॉइड संप्रदायात असे प्रतिपादन करण्यात आले आहे, की आपणास मुलांसारखे लिंग नाही, हे मुलीच्या लक्षात येऊन त्याची तिला खंत वाटते आणि या उणिवेस आपली जन्मदात्रीच जबाबदार आहे, असे समजून आईविषयी द्वेष व पित्याविषयी अधिकच आकर्षण तिला वाटत असते. ग्रीक पुराणकथेतील स्वतःच्या पित्याशी चुकून विवाह केलेल्या ‘इलेक्ट्रा’ नावाच्या मुलीची आठवण करून देणारा हा प्रकार असल्याने. मनोविश्लेषणात या पितृगंडास ‘इलेक्ट्रा गंड’ हे नाव देण्यात आले आहे. स्त्रियांनी पुरुषी पोषाख करणे आणि पुरुषी रीतीने वर्तन करणे, यांमागे त्यांचा पुल्लिंगत्वाचा हव्यास असतो, असे फ्रॉइड सांप्रदायिक म्हणतात.
या ‘ईडिपस’ व ‘इलेक्ट्रा’ प्रसंगातून प्रत्येक मुला-मुलीला यशस्वीपणे बाहेर पडता आले पाहिजे. काहींना तसे करता येत नाही व म्हणून त्यांच्या कामप्रेरणेला इष्ट वळण मिळत नाही आणि ते निरामय कामजीवन उपभोगू शकत नाहीत तसेच हे गंड सर्व मनोविकृतींच्या मुळाशी असतात, असे फ्रॉइड संप्रदाय मानतो. काही छिन्नमानस रुग्णांना आपण आपल्या आईवडिलांचे अपत्य नाही असे, किंवा आपल्याला कधीच वडील नव्हते असे, किंवा आपल्याला खच्ची (कॅस्ट्रेट) करण्यात आलेले आहे असे, जे वाटते त्याचे कारण त्यांचा ईडिपस गंड कायम व काबूबाहेर गेलेला असतो, असे फ्रॉइडचे निदान आहे [→ मनोविश्लेषण फ्रॉइड, सिग्मंड].
मुलाचा मातेकडे ओढा असतो ही वस्तुस्थिती आहे व अनेक मनोरुग्ण मातृपाशात गुंतलेले व मातृरत असल्याचे दिसून येते, हेही खरे आहे तथापि ते आकर्षण कामुक असते, असे गृहीत धरण्यात व त्या आधारे या विविध गंडांची नाट्यपूर्ण कल्पना करण्यात फ्रॉइडने बालकाच्या ठिकाणी नसलेली परिपक्वता बालकाला बहाल करण्याची चूक केली आहे, अशी टीका युंग, मॅक्डूगल वगैरेंनी केली आहे. मातृपितृरतीच्या फ्रॉइडकृत मीमांसेवर संस्कृतिशास्त्रज्ञांनीही आक्षेप घेतले आहेत. युंगच्या मते मातेविषयीच्या आकर्षणात आई आपल्या मालकीची असावी हीच इच्छा असते. ⇨ ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०–१९३७) याच्या मते, वडिलांऐवजी आपले स्वतःचे वर्चस्व तिच्यावर असावे, ही इच्छाच त्या आकर्षणात असते.
न्यूनगंड : ॲल्फ्रेड ॲड्लरने मानवी मनातील वर्चस्वाची वा प्रभुत्वाची इच्छा ही मूलभूत मानली व तिच्याशी गंडनिर्मितीचा संबंध जोडला. बालकाला स्वतःच्या लहानपणामुळे, अल्पसामर्थ्यामुळे तसेच परावलंबित्वामुळे आपण आईवडिलांपेक्षा कमी आहोत असे वाटते व म्हणून त्याच्या ठिकाणी जो लघुत्वाची अभिवृत्ती निर्माण होते, ती जाणिवेच्या वा बोधमनाच्या पातळीवरच असते. तथापि याशिवाय, जर त्याच्या ठिकाणी काही शारीरिक न्यून किंवा वैगुण्य असेल, तर आपण इतरांपेक्षा कमी आहोत व त्या वैगुण्याची भरपाई करून आपली श्रेष्ठता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न विफल होणार, अशी त्याला भीती वाटते व त्यामुळे रागही येतो पण या अप्रिय व खुपणाऱ्या भावनांचे बालक निरोधक करते व अशा रीतीने त्याचा त्यालाच अज्ञात असलेला न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यापायी त्याच्या वर्तनात विपरीतपणा डोकावू लागतो. उदा., स्वतः श्रेष्ठ असल्याच्या येनकेन आविर्भावाने ते वागू लागते, असे ॲड्लरचे मत आहे. बालपणीच्या ईडिपस-प्रसंगातून समायोजनात्मक सुटका करून घेणे जमले नाही म्हणजे न्यूनगंड निर्माण होतो, हे फ्रॉइड संप्रदायाचे मत ॲड्लरला अमान्य आहे [→ न्यूनगंड].
युंगच्या मते व्यक्तीच्या ठिकाणी एखादा गंड असला, तर ते विकृतीचेच लक्षण आहे, असे मानण्याचे कारण नाही. गंड असला तर त्याचा अर्थ इतकाच की व्यक्तीच्या मानसजीवनाशी अद्यापि एकसंध न झालेले काहीतरी आहे. व्यक्तीच्या ठिकाणी असलेला गंड विकृतिरूप आहे की नाही, हे त्या गंडाची शक्ती, गंभीरता व त्याच्यामुळे व्यक्तीच्या जीवनात होणाऱ्या उलथापालथींचे स्वरूप यांवर अवलंबून राहील.
संदर्भ : 1. Freud, S.The Basic Writings of Sigmund Freud, New York, 1938.
2. Jacobi, J.The Psychology of C.G. Jung, London, 1951.
3. Jastrow, Joseph, The House That Freud Built, Greenberg, 1932.
4. McDougall, William, Outline of Psychology, New York, 1923.
अकोलकर, व. वि.
“