खोकली : (हि. खोकली, कुपी गु. वंधी कांतो क. कुप्पी-गिड सं. हरितमंजरी लॅ. ॲकॅलिफा इंडिका कुल-यूफोर्बिएसी). या वर्षांयू (एक वर्ष जगणाऱ्या) व ३०–७५ सेंमी. उंच ओषधीचा [→ ओषधी] प्रसार श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, फिलिपीन्स, भारत इ. प्रदेशांत सर्वत्र आहे. ओसाड जागी किंवा पिकांमध्ये ती तण म्हणून उगवते. फांद्या लांब व कोनीय पाने साधी, अंडाकृती, दंतुर व तीन मुख्य शिरांची. जून–सप्टेंबरात एकलिंगी फुले एकाच झाडावर पानांच्या बगलेतील लांबट उभ्या कणिशावर येतात. पुं-पुष्पे लहान व शेंड्याकडे झुबक्यात आणि स्त्री-पुष्पे विखुरलेली, ३–५ व पानासारख्या छदाने (ज्याच्या बगलेत फुले वा फुलोरे येतात अशा पानाने) वेढलेली असतात. बोंड लहान व एकबीजी असते. खोकली कफोत्सारक (कफ पातळ करणारी) व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून श्वासनलिकेचा दाह, दमा, फुप्फुसाचे विकार व संधिवात यांवर गुणकारी असते. मुळांचा काढा विरेचक (तीव्र रेचक) पाने त्वचारोगावर वाटून किंवा रस काढून लावतात रस वांती होण्यास देतात. या झाडात ॲकॅलिफीन हे द्रव्य असते.
पहा : ॲकॅलिफा, यूफोर्बिएसी.
जमदाडे, ज. वि.
“