खोंडालाइट माला : भारतातील एका प्राचीन (आर्कियन कालीन) खडकांच्या गटाचे नाव. या गटातील प्रमुख प्रकार म्हणजे खोंडालाइट होय. तो राखी किंवा फिकट तांबूस रंगाचा असून मुख्यतः गार्नेट व सिलिमनाइट या खनिजांचा बनलेला असतो. शिवाय त्याच्यात क्वॉर्ट्झ व ग्रॅफाइट ही खनिजेही सामान्यतः अल्प प्रमाणात असतात. त्याची संरचना सामान्यतः सुभाज (पानांच्या गठ्ठ्यासारखी) असते म्हणून त्याला गार्नेट-सिलिमनाइट सुभाजा असेही म्हणतात. काही खोंडालाइटांत थोडे फेल्स्पार (ऑर्थोक्लेज, ऑलिगोक्लेज किंवा अँडेसाइन) असते. गाळाच्या खडकांचे उच्च तापमानात व खोल जागी तीव्र रूपांतरण होऊन या मालेचे खडक तयार झालेले आहेत.
ओरिसा व आंध्र या प्रदेशांतील पूर्व घाटाच्या डोंगरांत व त्यांच्या लगतच्या भागांत खोंडालाइट मालेचे खडक मुख्यतः आढळतात. खोंडालाइटाचे काही प्रकार केरळात आणि श्रीलंकेतही आढळतात. त्यांच्यात मधूनमधून ग्रॅफाइटाचे साठे आढळतात.
पूर्व घाटातील काही भागांत प्राचीन काळी राहत असलेल्या खोंड नावाच्या आदिवासी जमातीवरून खोंडालाइट हे नाव दिले गेले. या खडकांचे सविस्तर परीक्षण होण्यापूर्वी, ते प्रथम आढळले त्या स्थानाच्या नावावरून त्यांना बेझवाडा (विजयवाडा) माला किंवा बेझवाडा नाइस (विजयवाडा पट्टिताश्म) अशी नावे दिली जात. नमुनेदार (प्रारूप) विजयवाडा पट्टिताश्म हा खोंडालाइट आणि ॲप्लाइट या खडकांच्या पातळ, एकाआड एक थरांचा बनलेला असतो.
केळकर, क. वा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..