खोंड : ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांतून आढळणारी एक जमात. कुटिया खोंड व मैदानात राहणारे खोंड असे त्यांचे दोन वर्ग असून राज खोंड म्हणून आणखी एक वर्ग आहे. त्यास कोंढ, कंध असेही म्हणतात. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची संख्या ८,१९,७०२ होती. कुई ही खोंड जमातीची बोली असून तिचे साधर्म्य गोंडीपेक्षा तेलुगू भाषेशी अधिक आहे.

 खोंड द्रविड वंशाचे असून कुटिया खोंड हे डोंगरवासी आहेत. मैदानात राहणाऱ्या खोंड जमातीत अनेक उपशाखा असून त्यांपैकी राज खोंड उपशाखा सर्वांत श्रेष्ठ समजली जाते. राज खोंड इतर उपशाखांशी रोटीबेटी व्यवहार करत नाहीत.

 शेती व पारध हे खोंडांचे मुख्य धंदे. हे लोक साप, सरडा, उंदीर इत्यादींचे मांस खातात. कुटिया खोंड गोमांस खाण्यापासून परावृत्त होत आहेत.

 मुलाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी आई मुलाचे मुंडण करते. मुलामुलींची नावे मात्र पाचव्या-सहाव्या वर्षी  ठेवतात. पुनर्जन्मावर यांचा विश्वास असल्यामुळे पूर्वजांची नावे मुलांना ठेवण्याची पद्धत आहे. मुलामुलींची लग्ने वयात आल्यावर मोठेपणी करतात. देज देण्याची पद्धत आहे.

 खोंड जमातीमध्ये बत्तीस बहिर्विवाही कुळी आहेत व त्यांत नंतर वाढ झालेली आहे. या सर्व कुळी जडप्राणवादी व चिन्हवादी असून त्या अनेक गटांमध्ये विभागलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे एकाच कुळीच्या लोकांची वस्ती एका परिसरात आढळते.

 खोंड लोक अनेक देवदेवतांची आराधना करीत असले, तरी धरणीमाता व ठाकूरदेव ही त्यांची मुख्य दैवते आहेत. या दैवतांना पशुबळी तर देतातच, पण पूर्वी नरबळीही देण्याची प्रथा होती. बळी व्यक्तीला मरीआह म्हटले जाई. बळी व्यक्तीच्या मांसाचा तुकडा जमिनीत पुरला असता तिची सुपीकता वाढते व त्या तुकड्यांमध्ये अलौकिक शक्ती निर्माण होते, असा खोंड लोकांत समज होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ही नरबळीची प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. सेमी जत्रा, माहुल जत्रा व चावल धूबा असे तीन सण मध्य प्रदेशातील खोंड पाळतात. नव्या शेंगा, मूग, मटकी, चवळी, वाल वगैरे आग्रहायणात खातात. त्याला सेमी म्हणजे शेंगेचे दिवस म्हणतात. दुसरा सण मोहाची फुले खाण्याचा व तिसरा सण दसऱ्याचा.

 खोंड जमातीत मृताला पुरण्याची पद्धत आहे पण अलीकडे जाळण्याची पद्धतही रूढ होऊ लागली आहे. मृताला पुरताना त्याबरोबर एखादे नाणे, भाले, तीरकामठे, कपडे या वस्तूही पुरतात.

मुटाटकर, रामचंद्र