कोकिळ : पक्षिवर्गातल्या क्युक्युलिडी कुलातला हा पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव यूडिनॅमिस स्कोलोपेशियस आहे.
कोकिळ भारतात सगळीकडे आढळतो. हिमालयात तो आढळत नाही पण त्याच्या पायथ्याच्या टेकड्यांत क्वचित दृष्टीस पडतो. हा वृक्षवासी आहे. झाडांची दाट राई, गर्द पालवी असणारी मोठी झाडे, बागा इ. ठिकाणी हा राहतो. कित्येकांनी कोकिळ प्रत्यक्ष पाहिला नसेल, पण त्याचा कुऽऽऊ, कुऽऽऊ आवाज सर्वांच्या परिचयाचा आहे.
कोकिळ कावळ्याएवढा पण त्याच्यापेक्षा सडपातळ असतो आणि शेपटीही जास्त लांब असते. कोकिळ (नर) तकतकीत काळ्या रंगाचा असतो. कोकिळा (मादी) तपकिरी रंगाची असते तिचे पंख, शेपूट, छाती आणि पोट यांवर पांढरे पट्टे आणि शरीराच्या बाकीच्या भागावर पांढरे ठिपके असतात. डोळे किरमिजी रंगाचे आणि चोच मळकट हिरव्या रंगाची असते. पाय काळसर रंगाचे असतात.
कोकिळ वड, पिंपळ व याच प्रकारच्या इतर झाडांची फळे खाऊन उदरनिर्वाह करतो. पण यांशिवाय सुरवंट, किडे, गोगलगायीदेखील तो खातो.
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर यालाही कंठ फुटून तो गाऊ लागतो याचा कुऽऽऊ, कुऽऽऊ आवाज कानाला गोड लागतो. श्रावण महिन्यापर्यंत याचे गाणे ऐकू येते पण पुढे ते बंद होते सबंध हिवाळाभर तो मौन पाळतो. आपल्याला ऐकू येणारा परिचित आवाज कोकिळाचा असतो कोकिळेला गाता येत नाही. गायला सुरुवात करताना कोकिळ प्रथम हळूहळू गाऊ लागतो पण थोड्याच वेळाने गाण्याचा वेग वाढत जाऊन सूरही चढत जातो. गाणे रंगात आले असतानाच एकदम थांबते व थोड्या वेळाने पुन्हा सुरू होते. कोकिळा झाडावर बसून बुड् बुड् बुड् असा आवाज काढते किंवा एका झाडावरून दुसऱ्यावर उडत जातांना किक् किक् किक् असे सूर काढते.
कोकिळ हा सगळ्यांचा एक आवडता पक्षी आहे. त्याच्या पंचमस्वरातील गायनात जी एक प्रकारची आर्तता असते ती कलावंताच्या मनाची पकड घेणारी असल्यामुळे बऱ्याच कवींनी याच्यावर काव्ये लिहिले आहेत. लावणीकारांनी शृंगारिक लावण्या रचिल्या आहेत आणि पुष्कळ संगीतकारांनी चिजा बांधल्या आहेत.
कोकिळांचा विणीचा हंगाम एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असून तो कावळ्याच्या हंगामाशी जुळणारा आहे. कोकिळ घरटे कधीही बांधीत नाहीत. कोकिळा आपली अंडी बहुधा कावळ्याच्या पण कधीकधी डोमकावळ्याच्या घरट्यात घालते, पण हे काम सोपे नसल्यामुळे कोकिळ युक्तीचा अवलंब करतात. अंडी घालण्याच्या वेळी कोकिळा कावळ्याच्या घरटयाजवळ लपून बसते आणि कोकिळ सरळ कावळ्याच्या घरट्याजवळ जातो. कावळा आणि कोकिळ यांचे वैर असल्यामुळे कोकिळाला पाहताच कावळा त्याच्यावर तुटून पडतो कोकिळ चलाख असल्यामुळे हुलकावण्या दाखवीत तो कावळ्याला घरट्यापासून दूर नेतो. कोकिळा या संधीचा फायदा घेऊन कावळ्याच्या घरट्यात अंडे घालते आणि त्यातले कावळ्याचे एक अंडे उचलून बाहेर फेकते. अंडे घातल्यावर कोकिळा एक प्रकारचा आवाज काढते त्यावरून काम फत्ते झाल्याचे नराला कळते व कावळ्याला गुंगारा देऊन तो नाहीसा होतो. अशा प्रकारे कावळ्यांच्या कित्येक घरट्यांत ती अंडी घालते. साधारणपणे कोकिळा कावळ्याच्या एका घरट्यात एक किंवा दोनच अंडी घालते पण एकाच घरट्यात काेकिळेची ११-१३ अंडी आढळली आहेत. याचे कारण एकीहून अधिक कोकिळांनी एकाच घरट्यात अंडी घातली असली पाहिजेत हे उघड आहे.
अंड्यांतून पिल्ले बाहेर पडल्यावर कावळे आपल्या पिल्लांच्याबरोबरच कोकिळाच्या पिल्लांचेही लालन-पालन करतात. पुष्कळदा कोकिळाची पिल्ले घरट्यातील कावळ्याच्या काही पिल्लांना घरट्याबाहेर ढकलून देतात. कोकिळेचे नर पिल्लू काळ्या रंगाचे असते, मादी पिल्लूदेखील प्रौढ कोकिळेपेक्षा जास्त गहिऱ्या रंगाचे-जवळजवळ काळे असते. कोकिळाची पिल्ले मोठी होऊन स्वतःचा चरितार्थ चालविण्यास समर्थ झाली म्हणजे कावळ्यांचा आणि त्यांचा संबंध तुटतो.
कोकिळेचे अंडे कावळ्याच्या अंड्यासारखेच पण काहीसे लहान असते. त्याचा रंग करडा हिरवा किंवा स्लेट पाटीच्या रंगाप्रमाणे निळा काळा असून त्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात.
कर्वे, ज. नी.
“