कोंबड्यांची झुंज : लढाऊ जातीच्या कोंबड्यांची परस्परांशी लढत. कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ खरा पौर्वात्य असून तो इ. स. पू. पाचव्या शतकात यूरोपात गेला. थीमिस्टोक्लिझ याने प्रथम तो ग्रीसमध्ये नेला व पुढे रोमन साम्राज्यात त्याचा प्रसार झाला. इंग्लंडमध्ये राजघराण्यापर्यंत या खेळाची आवड निर्माण झाली होती. दुसरा व आठवा हेन्‍री, पहिला जेम्स व दुसरा चार्ल्‍स यांना या लढतीची विशेष आवड होती. स्पॅनिश लोकांनी हा खेळ आपल्या दक्षिण अमेरिकेतील वसाहतींत नेला, तर इंग्लिश लोकांनी तो उत्तर अमेरिकेत नेला. सध्या इंग्लंड, कॅनडा व अमेरिका या देशांत या झुंजीवर कायद्याने बंदी घालण्यात आली असली, तरी तेथे बेकायदेशीर रीत्या हा जुगारी खेळ चालतो. आशियात फिलिपीन, चीन, भारत, मलाया या देशांत कोंबड्यांच्या झुंजी अजून लढवल्या जातात. भारतात विशेषतः उत्तर प्रदेशात हा खेळ लोकप्रिय आहे.

मनोरंजनाशिवाय पैशाचा जुगारही या झुंजीवर खेळला जातो. या लढतीचे मैदान वर्तुळाकार ५/ ते ६ मी. व्यासाचे असते आणि भोवती वर्तुळाकार १/२ मी. उंचीचा कट्टा असतो. झुंजीचे दोन्ही कोंबडे एकमेकांबरोबर एकाचा मृत्यू होईपर्यंत वा एकजण माघार घेईपर्यंत लढतात. तथापि एखादा कोंबडा जखमी झाला असता त्याला माघार देण्यात येते. काही ठिकाणी वेळेचे बंधन घालतात. झुंजीच्या कोंबड्यांना त्यांचे मालक हातात घेऊन उभे राहतात व कोंबडे एकमेकांकडे बघून त्यांना जेव्हा त्वेष चढतो, तेव्हा त्यांना मैदानात सोडण्यात येते.

झुंजीतील बेफाम झालेले कोंबडे

झुंजीचे कोंबडे तयार करण्याचे एक शास्त्र आहे. त्यांची कातडी कडक करण्याच्या दृष्टीने त्यांना अल्कोहॉल व अमोनिया यांनी मालिश करतात. त्यांचा आहारसुद्धा ठराविक व विशिष्ट असा असतो. त्यामध्ये शिजविलेले धान्य, उकडलेल्या अंड्यांचे तुकडे व गोमांस यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लढतीचे शिक्षण त्यांना देण्यात येते. त्यांची ताकद, चापल्य आणि धैर्य वाढेल याकडे लक्ष देतात. त्यांचे वजन २ ते ३ किग्रॅ. असते. हे लढाऊ कोंबडे रंगाने तजेलदार असतात. त्यांच्या पायाला पोलादी वा पितळी नख्या बांधतात. झुंजीत प्रतिस्पर्धी कोंबड्यास ओरबाडण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. लढाऊ कोंबड्यांच्या व्हाइटहॅकल्स, क्लायबोर्न्स, रेडहॉर्सेस, लॉ-ग्रेज इ. १०० वर जाती आहेत.

आपटे, अ. बा.