पूर्वाषाढा : भारतीय नक्षत्रमालिकेतील विसावे नक्षत्र. वृश्चिक तारकासमूहाच्या नांगीच्या टोकाशी हे दिसते, यात तीन वा चार तारे मानतात. याचा अंतर्भाव धनू राशीत असून धनूमधील डेल्टा, गॅमा, लँब्डा व एप्सायलॉन हे तारे यात अंतर्भूत आहेत. यांपैकी डेल्टा [ कॉस मीडिया विषुवांश १८ ता. १७ मि. ३९.८ से., क्रांती – २९° ५१’ ७.७, प्रत २.८ ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत] हा योगतारा (प्रमुख तारा) आहे. एप्सायलॉन (कॉस ऑस्ट्रॅलिस विषुवांश १८ ता. २० मि. ४३.२ से., क्रांती – ३४° २४’ ४०”.३, प्रत १.९) व लँब्डा (कॉस बोरिअलिस विषुवांश १८ ता. २४ मि. ४५.६ से., क्रांती – २५° २७’ ८”.१, प्रत २.९) हे उल्लेखनीय आहेत. या नक्षत्राचा उल्लेख अथर्ववेदात आला असून याची देवता आप व आकृती शय्या आहे. हे नक्षत्र सप्टेंबरमध्ये रात्री ९ च्या सुमारास डोक्यावर दिसते.

पहा : नक्षत्र.

ठाकूर, अ. ना.