पूर्वसेचन प्रभाव : (टेलिगॉनी). ग्रेगोर योहान मेंडेल (१८२२ – ८४) यांनी अनेक प्रयोगांनंतर आनुवंशिकतेसंबंधी काही नियम ठरवून ⇨ आनुवंशिकी या शास्त्राचा पाया रचला. मेंडेल यांच्या मते मातापित्यांचे गुण अगर लक्षणे होणाऱ्या संततीमध्ये उतरतात आणि वंशपरंपरेने नंतरच्या पिढ्यांतही ती दिसून येतात. जे.बी.लामार्क (१७४४-१८२९) यांनी मातापित्यांची उपार्जित (संपादन केलेली) लक्षणे संततीमध्ये आढळून येतात, असे दाखवून दिले. भोवतालच्या परिस्थितीमध्ये घडणाऱ्या बदलानुसार प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जनुकांवर [आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या घटकांवर ⟶ जीन] परिणाम घडून त्यांची लक्षणे बदलण्याची शक्यता असते. क्ष-किरण आणि उत्परिवर्तके [ उत्परिवर्तन घडवून आणणारे पदार्थ ⟶ उत्परिवर्तन] यांचा प्राणी व वनस्पती यांच्या जनुकांवर परिणाम होऊन त्यांच्या लक्षणांत बदल घडून येतो. म्हणूनच माता-पित्यांची उपार्जित लक्षणे त्यांच्या संततीमध्ये नेहमी आढळतातच असे नाही. आनुवंशिकीचा एकूण इतिहास पाहता त्यात अनेक भ्रामक समजूती आढळतात. त्यांपैकी पूर्वप्रभाव, मातेचा ठसा, मातापित्यांचा प्रभाव आणि पूर्वसेचन प्रभाव या महत्त्वाच्या आहेत. पूर्वप्रभाव या समजुतीनुसार प्राणी आपल्या अंगभूत लक्षणांचा आपल्या संततीवर प्रभाव पाडतात. मातेचा ठसा आणि मातापित्यांचा प्रभाव या समजुतींनुसार गर्भधारणाकालातील मातेची अवस्था किंवा मातापित्यांनी पाहिलेल्या दृश्यांचा जन्मणाऱ्या संततीवर परिणाम घडतो. बुक ऑफ जेनेसिस या ग्रंथात लेबन यांनी रानात चरणाऱ्या मेंढ्यांच्या कळपातील गाभण मेंढ्यांना हॅझेल या वनस्पतीच्या रंगीबेरंगी पट्टे असणाऱ्या फांद्या दाखविल्यामुळे त्या मेंढ्यांना झालेल्या पिल्लांच्या अंगावर रंगीबेरंगी ठिपके आणि पट्टे उत्पन्न झाल्याचा उल्लेख आढळतो. पूर्वसेचन प्रभाव ह्या समजुतीत मीलनानंतर एखाद्या नराच्या गुणधर्माचा प्रभाव काही अनाकलनीय पद्धतीने प्रकट न होता मादीत तसाच राहतो व कालांतराने मीलनातून निर्माण होणाऱ्या पुढील संततीत प्रकट होतो, असे मानले जाते. तथापि ह्यास शास्त्रीय आधार सापडत नाही. पूर्वसेचन प्रभावाची अनेक उदाहरणे देता येतील. ॲ्रिस्टॉटल यांच्या मते संततीवर केवळ आपल्या मातापित्यांच्याच लक्षणांचा प्रभाव पडतो असे नसून या मातेचे जर अगोदर इतर नराबरोबर मीलन झाले असेल अशा नराच्या लक्षणांचाही प्रभाव पडतो व संततीत ही लक्षणे आढळतात. इ.स. १८६८ मध्ये चार्ल्स डार्विन यांनी असे निरीक्षण केले की, एका घोडीचे नर झीब्र्याबरोबर व नंतर अरबी घोड्याबरोबर मीलन झाल्यावर त्या घोडीला झालेल्या पिलाच्या पायावर झीब्र्याच्या पायावर आढळणाऱ्या रंगीत पट्ट्यांसारखे पट्टे आढळले परंतु अनेक वेळा घोडा-घोडीपासून झालेल्या पिलाच्या पायावरही रंगीत पट्टे आढळतात. म्हणून डार्विन यांचे निरीक्षण पूर्वसेचन प्रभावाला पुष्टीकारक नाही. कुत्र्यांची पैदास करणाऱ्या लोकांमध्ये असा समज आहे की, शुद्ध बीजाच्या कुत्रीचे इतर कनिष्ठ जातीच्या कुत्र्याबरोबर मीलन झाल्यावर तिला संकर जातीची पिले होतात. याच कुत्रीला तिच्याच जातीच्या कुत्र्यापासून झालेल्या पिलातही संकर जातीचे गुण आढळतात. अनेक शास्त्रज्ञांच्या मते मानवाच्या बाबतीतही पूर्वसेचन प्रभाव आढळून येतो. उच्च गटाच्या स्त्री-पुरुष संबंधामुळे उच्च गटाची संतती उत्पन्न होते परंतु या उच्च गटाच्या स्त्रीचा जर यासंबंधापूर्वीच नीच गटाच्या पुरुषाशी संबंध आला असेल, तर तिला उच्च पुरुषापासून होणाऱ्या संततीमध्ये नीच पुरुषाची लक्षणे आढळतात. या गैरसमजामुळेच जास्त काळजी घेण्यासाठी इंग्लंडमधील राजकुमारांना आपल्या अंगावर पाजणाऱ्या दायांना भ्रष्ट करणाऱ्या पुरुषाला देहदंडाची शिक्षा देत असत. कारण या संबंधामुळे राजाच्या कुटुंबातील रक्तात दोष निर्माण होतो, असे मानले जाई.
इ.स. १९३८ – ६३ या दरम्यान रशियन जीववैज्ञानिक टी.डी. लायसेंको व त्यांचे समर्थक यांनी वरील भ्रामक समजुतींना अनेक लेख व पुस्तके लिहून पुष्टी दिला आणि आनुवंशिकीतील अनेक महत्त्वाच्या सिद्धातांवर टीका केली परंतु १९६४ साली इतर शास्त्रज्ञांनी वरील सर्व भ्रामक समजुतींना कायमचे बाद करून आनुवंशिकीतील महत्त्वाची तत्त्वे व सिद्धांत यांना उचलून धरले.
पहा: लायसेंको, ट्रोफीम देनीसोव्ह्यिच.
संदर्भ: Stern. C. Principles of Human Genetics, New Delhi, 1960.
रानडे, द. र.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..