पुसान : द. कोरियाचे प्रमुख बंदर आणि क्यंगसंग प्रांताची राजधानी. लोकसंख्या २४,५४,०५१ (१९७५). केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील खास शहराचा दर्जा त्याला दिलेला आहे (१९६३). हे कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर, सेऊलच्या आग्नेयीस ३२२ किमी. नाकताँग नदीखाडीच्या पूर्वेस सु. ८ किमी. वर वसले आहे. हे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग व जलमार्ग यांचे महत्त्वाचे केंद्र असून अत्यंत सुरक्षित व विकसित असे बंदर आहे. हे ऐतिहासिक शहर असून चीनच्या अंमलात यास प्रमुख बंदर म्हणून स्थान मिळाले. १५९२ मध्ये हिडेयोशीच्या नेतृत्वाखाली जपान्यांनी यावर स्वारी केली होती. हे बंदर १८७६ पासून जपानी व्यापाऱ्यांना आणि १८८३ पासून इतर देशांनाही खुले करण्यात आले. जपानी अंमलात (१९१०–४५) त्याचे पूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले. कोरियन युद्धकाळात (१९५०–५३) कोरियन प्रजासत्ताकाची हंगामी राजधानी येथे होती. संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याचा तळही येथे होता. येथे सूत, कातडी, तांदूळ, सुकी मासळी, पेट्रोल, सोयाबीन इत्यादींचा व्यापार चालत असून, येथील मत्स्योद्योगही भरभराटीत आहे. पुसान येथे जहाज व मोटारबांधणी, रसायने, कागदनिर्मिती, सुती कापड, यंत्रोद्योग इ. उद्योग विकसित झाले असून स्तरकाष्ठनिर्मितीचा (प्लायवुडचा) देशातील सर्वांत मोठा कारखाना येथेच आहे. पुसानमध्ये दोन विद्यापीठे, मत्स्योद्योग व महासागरविज्ञान यांची महाविद्यालये आणि इतर पाच महाविद्यालये आहेत. कँबॉक राजवाडा (१३९४), चंग्डॉक राजवाडा आणि तोक्सू राजवाडा (१५९३) तद्वत त्यातील राष्ट्रीय संग्रहालय व कलावीथी प्रेक्षणीय आहेत.
ओक, द. ह.
“