पुलगाव: महाराष्ट्र वर्धा जिल्ह्यातील राज्याच्या व्यापारी शहर. लोकसंख्या ३३,३८२ (१९७१). हे लोहमार्ग प्रस्थानक असून वर्ध्याच्या पश्चिमेस सु. ३० किमी. मुंबई-नागपूर लोहमार्गांवर वर्धा नदीकाठी वसले आहे. येथून आर्वीकडे लोहमार्गाचा एक फाटा जातो. कापूस उत्पादक परिसर, मुंबई-नागपूर रस्त्याचे सान्निध्य, लोहमार्गाची व दूरध्वनीची सोय इ. कारणांनी पुलगाव हे कापसाची मोठी बाजारपेठ बनले आहे. येथे नगरपालिका (१९०१) असून, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाच्या सोयी आहेत. शहरात हातमाग कापडउद्योगाचा विकास होत आहे. येथे कापड, सरकी काढण्याच्या व कापसाच्या गाठी बांधण्याच्या गिरण्या आहेत. भारत सरकारचे दारूगोळ्याचे कोठार येथे असल्याने यास सैनिकी दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे बौद्ध, बालाजी, मारूती व विठ्ठल यांची मंदिरे आहेत.
सावंत, प्र. रा.